Agripedia

शेतकरी बंधुंनो मागील काही वर्षात तूर या पिकात पाने पिवळे पडून झाडे वाळणे जळणे उबळणे ही लक्षणे दिसून मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शेतकरी बंधूंनो ही जी लक्षणे सांगितली ती तूर पिकात दिवसेंदिवस का वाढत आहेत? कोणत्या या रोगामुळे ती दिसतात?

Updated on 23 May, 2021 6:01 AM IST

शेतकरी बंधुंनो मागील काही वर्षात तूर या पिकात पाने पिवळे पडून झाडे वाळणे जळणे उबळणे ही लक्षणे दिसून मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. शेतकरी बंधूंनो ही जी लक्षणे सांगितली ती तूर पिकात दिवसेंदिवस का वाढत आहेत? कोणत्या या रोगामुळे ती दिसतात?

? तसेच त्यासाठी करावयाच्या एकात्मिक व्यवस्थापन योजना याविषयी थोडं जाणून घेऊया. तूर पिकात वर निर्देशित लक्षणे प्रामुख्याने खालील निर्देशित रोगांमुळे दिसून येतात

तुरीवरील मर रोग :

हा रोग फ्युजॅरियम उडम या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. पेरणीपासून सुमारे ५ ते ६ आठवड्यात तुरीच्या झाडावर मर रोगाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. भारी जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. या रोगाची बुरशी तुरीच्या रोपात घुसल्यानंतर हळू-हळू झाडात वाढते व पाने पिवळसर पडतात किंवा शिरांमधील भाग हलका पिवळा किंवा गर्द पिवळा होतो. मूळ चिरले असता मुळाच्या आत मध्ये मध्यभागी हलक्या तपकिरी रंगाची रेघ दिसते.

कधी-कधी खोडावर पांढरी बुरशी सुद्धा आढळते. या रोगात झाडाचे शेंडे मलूल होतात व कोमजतात. झाड बऱ्याच वेळा हिरव्या स्थितीत वाळते. मूळ उभे चिरले असता मुळाचा मध्यभाग काळा दिसतो. यात बुरशीची वाढ झालेली दिसते. या रोगामुळे शेतकऱ्याची बरीचशी झाडे वाळल्या मुळे तुरीच्या उत्पादनात घट येते.

तुरीवरील मूळकुजव्या रोग :

तुरीवरील मूळकुजव्या हा रोग Rhizoctonia bataticola किंवा Rhizoctonia solani या बुरशीमुळे होतो जमिनीचे तापमान 35 अंश से. किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास हा रोग तीव्र स्वरुपात आढळतो. तुरीची रोप चार ते पाच आठवड्याचे असताना या रोगाची लक्षणे दिसू लागतात. या रोगामध्ये रोपे कोमजतात,पाने वाळतात व गळून पडतात. रोगट मुळे पूर्णपणे कुजलेली असतात. झाड उपटून काढत असताना तंतुमय मुळे जमीनीतच राहतात व फक्त सोटमूळ वर येते. सोटमुळावरील साल सोट मुळापासून अलग होते.

 

कोलेतोट्रायकम करपा :

हा रोग कोलेतोट्रायकम या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे तुरीची रोपे तीन ते चार आठवड्याची असताना दिसून येतात पानावर खोडावर व फांद्यावर काया करड्या रंगाचे ठिपके आढळतात. रोगट रोप वाळते व मरते पाऊस व हवेद्वारे या रोगाच्या बीजाणूचा प्रसार होतो.

तुरीवरील वांझ रोग किंवा स्टरीलिटी मोझाइक :

हा विषाणूजन्य रोग असून या रोगात झाड झुडूपा सारखे वाढते व पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो पानावर पिवळे गोलाकार ठिपके दिसतात. झाडावर अत्यंत कमी शेंगधारणा होते किंवा कधीकधी शेंगधारणा होत नाही या रोगाचा प्रसार ईरीयोफाईड कोळ्यांमुळे होतो. या रोगाची चर्चा आत्ता करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शेतकरी गांभीर्याने घेतात परंतु या रोगांवर नंतर उपाययोजना करणे म्हणजे डोक्याला जखम व पायाला मलम अशी गोष्ट घडू शकते. प्रतिबंधात्मक व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केल्याशिवाय या समस्येवर व्यवस्थापन मिळत नाही.

कृपया खालील निर्देशित उपायोजना यासंदर्भात नोंद घेऊन नियोजन करून पेरणीपूर्व काही बाबीचा तर पेरणीनंतर काही बगीचा अंगीकार करून प्रभावी व्यवस्थापन करा यातील बहुतांश रोग वरून फवारण्या करून दुरुस्त होण्याची शक्यता कमी असते म्हणून

खालील उपाययोजनांची नोंद घेऊन त्यांचा अंगीकार करा.


तुरीवरील जळने मरणे किंवा उबळणे याकरता एकात्मिक उपायोजना

(१) त्याच त्या शेतात तुरीचे एक सारखे पीक घेणे टाळा व पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा तुरीच्या शेतात दुसरे पीक घ्या. ज्वारीचे पीक किमान तीन वर्षातून एकदा तुरीच्या शेतात घेतल्यास तुरीवरील मर रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे आढळून आले आहे.
(२) तूर पीक पेरणी पूर्वी किमान १० ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत प्रती प्रती एकर व त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक या प्रमाणात मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्या व वखर पाळी देऊन चांगले जमिनीत मिसळून घ्या. यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची व ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होते जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो
(३) मारोती हा तुरी चा वान मर व वांझ रोगाला बळी पडत असल्याचे आढळून येत आहे त्यामुळे या वाणाची पेरणी टाळावी.
(४) जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले नवीन शिफारशीत वाण उदाहरणार्थ पीकेव्ही तारा, बीएसएमआर 736, बीडीएन 716, बीएसएमआर 853 यासारख्या वाणाची पेरणी करावी परंतु वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची इतर वैशिष्ट्ये लक्षात घेऊन या संदर्भात तज्ञांचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच वाण निवडावे.

(५) पेरणीपूर्वी प्रथम Carboxin 37.5 टक्के अधिक Thiram 37.5 टक्के या मिश्र बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी व नंतर 15 ते 30 मिनिटानंतर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची दहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करून घ्यावी.
(६) रोगग्रस्त शेतात तसेच पाणी असणाऱ्या जमिनीत तुरीचे पिक घेणे टाळावे आणि रोगट अवशेष जाळून नष्ट करावेत. (७) उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी त्यामुळे जमिनीतील शत्रु बुरशी जास्त तापमानामुळे निष्क्रिय होतील (८) तुरीवरील ईरीयो फाईंड कोळीकरिता लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे किंवा तज्ञांचा सल्ला घेऊनच कोळी नाशक वापरावे.
वर निर्देशित एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा किंवा प्रतिबंधात्मक बाबीचा अंगीकार केल्यास तुरीवरील मर जळणे इत्यादी बाबीचा प्रतिबंध मिळू शकतो.

 

व नंतर होणारा अविवेकी व अवास्तव फवारणीचा खर्च सुद्धा कमी होतो. कृपया जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगा करिता वर निर्देशित उपाय योजना आहेत आणि नंतर विनाकारण फवारणीचा खर्च टाळा व व आपल्या हातात असलेले वर निर्देशित कमी खर्चाचे उपाय अमलात आणा

लेखक - राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.
प्रतिनिधी- गोपाल उगले

English Summary: If there is an outbreak of these diseases in the tur crop
Published on: 23 May 2021, 05:48 IST