Agripedia

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तीळ लागवडीचे सुधारित तंत्र विकसित केले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची चांगली व्यवस्था आहे, त्यांना उन्हाळी तिळाची लागवड करून कमी कालावधीत चांगला आर्थिक नफा मिळविता येऊ शकतो.

Updated on 07 December, 2021 9:01 PM IST

अनेक शेतकरी तीळ लागवड फक्त घरगुती उपयोगाकरिता शेताच्या बांधावर किंवा पडित जमिनीवर करताना दिसतात, त्यामुळे उत्पन्न कमी येऊन आर्थिक नफा कमी मिळतो; परंतु ज्यांच्याकडे ओलिताची चांगली व्यवस्था आहे, त्यांनी उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली तर कमी कालावधीत नफा मिळविता येईल. उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने "एकेटी-101' ही तिळाची जात प्रसारित केली आहे. या वाणाचे गुणधर्म म्हणजे हा वाण उन्हाळी हंगामात 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल मिळते. 

मशागत ः 

तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. काडीकचरा वेचून उभी-आडवी वखरणी करावी व पठार फिरवून सपाट करावी. जमीन तयार करताना प्रति हेक्‍टरी दहा टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. 

बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया ः
उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्‌भवणाऱ्या रोगांना आळा बसतो, तसेच बियाण्याची उगवण चांगली होते. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपून घ्यावी. पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसात सापडण्याची भीती असते. बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू/गाळलेले शेणखत/राख/माती मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी.

आंतरपिके ः


तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्रपीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीने तीळ + मूग (3ः3) फायदेशीर आढळून आलेले आहे. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा, तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खताच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात दिले असता उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत.

पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. 

 

पाण्याचे नियोजन ः 

उन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

 

कीड-रोगांपासून संरक्षण ः 

उन्हाळी तीळ पिकावर कीड व रोगांचे प्रमाण फारच अल्प असते, तरीपण कधी-कधी रोप अवस्थेत पीक असताना पाने गुंडाळणाऱ्या/खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही अळी कोवळी पाने खाते व पानाची गुंडाळी करून त्यात राहते. या किडीच्या नियंत्रणाकरिता 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पीक फुलोऱ्यात असताना व पुढे परिपक्वतेपर्यंत पर्णगुच्छ या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा रोग विषाणूजन्य रोग असून, याचा प्रसार तुडतुड्यामार्फत होतो. फुलाच्या भागाचे हिरव्या पर्णसदृश भागात रूपांतर होते व परिणामी उत्पादन कमी येते.

तुडतुडे नियंत्रणासाठी 4 मि.लि. इमिडाक्लोप्रिड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगट झाडे दिसल्यास उपटून टाकून त्यांचा नाश करावा. तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते, त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडांची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच, पीक कापणीस तयार झाले असे समजावे. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. तीन-चार दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास चार-पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. सुधारित लागवड पद्धतीमुळे हेक्‍टरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते.

 

अखिल भारतीय तेलबियाणे संशोधन केंद्र, (जवस/तीळ), कृषी महाविद्यालय, नागपूर

English Summary: If sesame planting is arranged olita.
Published on: 07 December 2021, 08:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)