कापसाचे पीक फुलोर्यात असताना पानावर हा रोग पडतो. म्हणजेच सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये पाऊस अधिक झाला किंवा पाण्याचा ताण पडला की झाडाची हिरवी पाने लाल होतात. पानाच्या शिरा मात्र हिरव्याच असतात. पाने लाल झाल्याने ५० % प्रकाश संश्लेषणाचे कार्य कमी होते. परिणामी पात्या व बोंड गळ होते. अन्नरस शोषणार्या किडींचा (मावा, तुडतुडे, फुलकिडे) प्रादुर्भाव अधिक झाल्यास तसेच जमिनीतील मॅग्नेशियम व नायट्रोजनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो.
कपाशीवरील लाल्या रोगाची लक्षणे : पानाच्या कडा तांबूस दिसतात. शेंड्यावरील पाने लालसर तांबूस झालेली आढळतात व शेवटी पाने वाळून गळून पडतात. लाल्या हा कोणत्याही जीवाणू अथवा विषाणूमुळे होणारा रोग नसून अन्नद्रव्यांच्या कमतरमुळे दिसून येणारी शरीरशास्त्र विकृती आहे.उच्च उत्पादकता असलेल्या संकरीत व बी. टी. वाणांची लागवड हलक्या जमिनीवर केल्यास अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते व लाल्याची लक्षणे दिसून येतात.
कापसाची लागवड पाणथळ जमिनीत केल्यामुळे झाडास नत्र घेण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पाने लाल होऊन झाडांची वाढ खुंटते.सर्व साधारण परिस्थितीमुळे फुले येणे ते बोंडे तयार होण्याच्या कालावधीत नत्राची कमतरता झाल्यास वरील लक्षणे दिसतात. बी.टी. कापसासाठी केलेल्या खताच्या शिफारशीप्रमाणे खते न दिल्यास पात्यांच्या पोषणासाठी झाडांच्या खालच्या पानातील अन्नद्रव्य उपयोगात येते, त्यामुळे पाने लाल पडतात. मॅग्नेशियम या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता हे देखील पाने लाल पडण्याचे एक कारण आहे. अचानक उष्ण वारे वाहू लागल्यास तसेच दिवस व रात्रीच्या
तापमानात जास्त फरक पडल्यास पाने लाल होतात. एकाच जमिनीत वारंवार कापसाचे पीक घेतल्यामुळे झाडाला पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही, त्यामुळे लाल्या उद्भवतो. रस शोषण करणर्या किडींमुळे देखील पाने लाल पडतात.लाल्यावरील उपाययोजना :- खताची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. तसेच लागवडीचे अंतरही शिफारशीप्रमाणे ठेवावे. संकरित व बी. टी. वाणाची लागवड हलक्या जमिनीमध्ये करू नये. पाणथळ जमिनी कापूस लागवडीसाठी टाळाव्यात.लाल्याची लक्षणे दिसताच १ टक्का मॅग्नेशियम सल्फेट फवारावे किंवा प्रति हेक्टरी २० ते ३० किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत टाकावे.
Published on: 09 July 2022, 04:40 IST