पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतरपिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत होती,आज व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबतांना पूर्वीचीच एकात्मिक शेती पद्धती कालसुसंगत असून शाश्वत शेतीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड, पिकांची फेरपालट, शेण, गोमूत्र, दुधासह शेतकामासाठी पशुधन आणि परिवारातील सदस्यांचे योगदान काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. विस्तार शिक्षण संचालनालय द्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्प क्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट, पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी
पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला आहे अशा परिस्थितीमध्ये कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतरपीकाची लागवड करून पावसाच्या लहरीपण मुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉ. भाले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सोयाबीन पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करणे तसेच कापूस पिकामध्ये तूर सोयाबीन उडीद मूग यासारख्या आंतरपीकांची लागवड करणे कालसुसंगत ठरते असे देखील डॉ. भाले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात सांगितले.याप्रसंगी डॉ. डी. बी. उंदीरवाडे संचालक विस्तार शिक्षण, डॉ. व्हि के खर्चे संचालक संशोधन, डॉ. वाय. बी. तायडे अधिष्ठाता (कृषी), डॉ. एस बी वडतकर अधिष्ठाता (कृषी अभियांत्रिकी) अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. प्रकाश नागरे, प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे (जि. अकोला ) तसेच श्री विजयजी दीपके (खामगाव जिल्हा बुलढाणा) हे व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी बी उंदिरवाडे यांनी या मेळाव्याच्या निमित्ताने शेतकरी बांधवांच्या पिकांसंबंधीच्या समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन निराकरण होत असल्याचे म्हटले. कृषी विद्यापीठाची *कृषी संवादिनी* शेतकऱ्यांकरिता ग्रामगीता असल्याचे सांगून विद्यापीठाच्या या प्रकाशनामध्ये सर्व पिकांच्या लागवड तंत्राविषयीची अद्यायावत माहिती प्रकाशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या विविध पिकांवरील किडी व रोगांचे आक्रमण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहायला हवे. त्याचप्रमाणे वेळीच शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. उंदीरवाडे यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी तसेच सोयाबीन मूग उडीद तूर व मका पिकावरील किडी-रोगांच्या सम्बन्धी विस्तृत मार्गदर्शन करून येणाऱ्या खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांनी
एकत्रितपणे व्यवस्थापनत्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.प्रगतिशील शेतकरी श्री श्रीकृष्ण ठोंबरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महाबीज चे बियाणे उत्कृष्ट प्रतीचे असल्याचे नमूद करून आपण स्वतः विद्यापीठ निर्मित बीज वाणांचा नियमित वापर करत असल्याचे सांगितले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आमच्या करिता *गुरुकिल्ली* चे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुग्ध व्यवसायच्या विकासासाठी शासकीय दुग्ध खरेदी केंद्रांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. श्री विजय दटके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या ज्ञानाची भूक शमवीण्याकरिता विद्यापीठाकडे आधुनिक कृषी तंत्राची भक्कम शिदोरी उपलब्ध असल्याचे नमूद करून रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर पिकांना सेंद्रिय खत देणे हा एक उत्तम तोडगा असल्याचे म्हटले. यावेळी शेतीमध्ये ते प्रयोग करीत असलेल्या काही स्वनिर्मिती कृषी तंत्रांचा त्यांनी ऊहापोह केला.
Published on: 29 May 2022, 08:42 IST