Agripedia

खरीप पिके नियोजन प्रमुख खरीप पिकांचे पूर्व नियोजन कसे करावे व पिकांचे संकरित व सुधारित वाण याविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.

Updated on 10 May, 2020 10:10 AM IST


खरीप पिक नियोजन

प्रमुख खरीप पिकांचे पूर्व नियोजन कसे करावे व पिकांचे संकरित व सुधारित वाण याविषयी माहिती खालीलप्रमाणे आहे.

  • पीक व्यवस्थापन करतांना खालील मुद्यांचा अवलंब करावा.
  • मृद व जलसंधारण करण्याकरिता बांध बंदिस्ती, ओघळ व नाल्याचे उपचाराची निगराणी व दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करण्यात यावी.
  • जमीन व पाऊसमानानुसार पीक पद्धती निवडावी.
  • मध्यम ते भारी जमीनीत कापूस, तुर, खरीप ज्वारी व सोयाबीन सारखी पिके घ्यावीत.
  • मध्यम जमिनीत सूर्यफुल, तुर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी सारखी पिके घ्यावीत.
  • हलक्या जमिनीत बाजरी, कुलथी, तीळ, कारळ, एरंडी यासारखी पिके घ्यावीत.
  • पेरणी योग्य पाऊस होताच (७५ ते १०० मि. मी.) पिकांची पेरणी करावी.
  • धुळ पेरणी करिता २५ टक्के क्षेत्रावर ज्वारी, मुग/उडीद सारख्या पिकाची निवड करावी.
  • आंतरपिक पध्दतीमध्ये सं.ज्वारी+तुर (४:२), बाजरी+तुर (३.३), सोयाबीन+तुर (४:२), कापूस+उडिद/सोयाबीन (१:१) पीक पध्दतीचा अवलंब करावा.
  • आवश्यकतेनुसार आपत्कालीन पीक नियाजन करावे.
  • लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी, बियाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे व बीज प्रक्रिया करावी.
  • झाडांची योग्य संख्या ठेवावी. त्याकरीता दोन ओळीतील व दोन झाडात योग्य अंतर ठेवावे.
  • पेरणी पूर्व मशागत, आंतरमशागत, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, एकात्मिक तण नियंत्रण व पीक संरक्षणाबरोबर, शेत पातळीवर जलसंधारणाकरीता परिस्थितीनुरुप योग्य मुलस्थानी जलसंधारण पध्दतीचा अवलंब करावा.
  • अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे व एकात्मिक कीड व रोग नियंत्रण करावे.
  • अतिवृष्टी दरम्यान शेतात साचलेले पाणी लवकरात लवकर शेताबाहेर काढण्यात यावे.

पिकांचे सुधारित आणि संकरित वाण

अ.क्र

वाण

पीक तयार होण्यास लागणारा कालावधी (दिवस)

हेक्टरी उत्पादन (क्विंटल)

प्रमुख वैशिष्टये

सोयाबीन: अ) अति लवकर येणारा

१

परभणी सोना (एमएयुएस -४७)

८०-८५

२०-२५

झाडावर पिंगट लव असून पक्वतेनंतर शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. संकरित कापूस, ज्वारी आणि तुरीमध्ये आंतरपिकास योग्य, पक्वतेनंतर लवकरात लवकर काढणी करावी. पक्वतेनंतर शेंगा फुटण्यास बळी पडतो.

ब) लवकर येणारा

२

जवाहर (जेएस ३३५)

९५-९८

२८-३०

फुलांचा रंग जांभळा असून दाणा मध्यम आकाराचा असतो. पक्वतेनंतर ५-७ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य.

३

समृध्दी (एमएयुएस ७१)  

९३-९६

२८-३०

फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य.

४

शक्ती (एमएयुएस ८१)  

९७-९८

२५-३०

फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य.

५

एमएयुएस १५८  

९५-९८

२६-३१

फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाही. खोडमाशीसाठी सहनशिल, आंतरपिकास योग्य.

क) मध्यम उशिरा येणारे

६

प्रसाद (एमएयुएस ३२)

१०५-११०

२५-३०

फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा गुलाबी आहे. पीक पक्वतेनंतर १२-१५ दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. आणि शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (१६०-१७० दिवस) आंतरपिकास योग्य.

७

प्रतिकार (एमएयुएस ६१)   

९५-११०

२५-३०

फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर शेंगाचा रंग बदामी होतो. पक्वतेनंतर ८-१० दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (१६०-१७० दिवस) आंतरपिकास योग्य.

८

प्रतिष्ठा (एमएयुएस-६१-२)

१००-११०

२५-३०

फुलांचा रंग लालसर असून लव तपकिरी रंगाचे आहे व दाणा टपोरा आहे. पक्वतेनंतर ८-१० दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. तांबेरा रोगास मध्यम प्रतिबंधक, आंतरपिकास योग्य.

९

एमएयुएस-१६२  

१००-१०३

२८-३०

यंत्राव्दारे काढणीस उपयुक्त. तसेच शारीरीक पक्वतेनंतर १०-१२ दिवस शेंगा फुटत नाही.

कडधान्य: अ) तूर

१

बदनापूर-२

१६०-१६५

१०-११

मध्यम मुदतीचा, पांढरा दाणा असलेला, अंतर पिकासाठी योग्य.

२

बीएसएमआर-७३६

१७५-१८०

१५-१६

या वाणाच्या दाण्याचा रंग लाल असून मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक. सोयाबीन व उडीद अंतर पिकासाठी योग्य.

३

बीएसएमआर-८५३ (वैशाली)     

१७०-१७५

१५-१६

मध्यम कालावधीचा, पांढरा दाणा असलेला, मर आणि रोग प्रतिकारक. फुलाचा रंग लाल व सोयाबीन व उडीद अंतर पिकासाठी योग्य. खते व पाण्यास योग्य प्रतिसाद.

४

बीडीएन- ७०८ (अमोल)

२००-२१०

१६-१८

मध्यम कालावधीचा, लाल रंगाचा दाणा असून कमी पावसाच्या प्रदेशासाठी योग्य, मर रोग प्रतिकारक.

५

आयसीपीएल-८७११९(आशा)

२००-२१०

१०-१२

उशिरा तयार होणारा, मर आणि वंध्यत्व रोगास प्रतिकारक, दाण्याचा रंग लाल.

६

बीडीएन- ७११

१५०-१६०

१६-१८

कमी कालावधीत तयार होणारा वाण, मर व वांझ प्रतिबंधक.

ब) मूग

१

बीएम -४

६०-६५

१०-१२

हा वाण विषाणूजन्य व भुरी रोगास प्रतिबंधक आहे. दाणे हिरवे, मध्यम.

२

कोपरगाव

६०-६५

९-१०

दाणे टपोरे, हिरवे, चमकदार, भुरी रोगास बळी पडतो.

३

बीपीएमआर- १४५

६५-७०

१०-१२

दाणे हिरवे, चमकदार, टपोरे, भुरी रोगप्रतिकारक. खरीप व उन्हाळी हंगामात चांगला येतो.

४

बीएम -२००२-०१

६५-७०

१०-१२

एकाच वेळी काढणीस येणारा, टपोरे दाणे.

५

बीएम-२००३-०२   

६५-७०

१२-१४

एकाच वेळी काढणीस येणारा, भूरीरोग प्रतिबंधक, टपोरा चमकदार.

क) उडीद

१

बीडीयु- १

७०-७५

११-१२

दाणे टपोरे, भुरी रोग प्रतिकारक, शेंग काळी चोपडी.

२

टीएयु- १

७०-७५

१०-१२

दाण्याचा आकार मध्यम, भुरी रोग प्रतिकारक, शेंग काळी चोपडी.

ड) चवळी

१

सी- १५२

९५-१००

१०-११

दाणा बारीक व लाल.

खरीप ज्वारी: अ) संकरित वाण

१

सीएसएच-१४

११०-११५

३६-३८

हलक्या ते मध्यम जमिनीसाठी योग्य. कमी पावसाच्या भागासाठी शिफारस केलेला, लवकर येणारा संकरीत वाण, दाणा टपोरा व दाण्याची प्रत उत्तम, ताटांची उंची मध्यम व कडबा मध्यम प्रतीचा.

२

सीएसएच-१६

११०-१२०

४०-४२

मध्यम ते भारी जमिनीस आणि हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य. पावसात सापडल्यास दाणे काळे पडत नाहीत.

३

परभणी साईनाथ

११५-१२०

४२-४५

दुहेरी उपयुक्त संकरित वाण,बुरशी रोगास प्रतिकराक्षम, कडब्याचे उत्पादन ११०-११५ क्वि./हे. उंच वाढणारे, ज्वारी आणि कडब्याची प्रत चांगली.

ब) सुधारीत वाण

१

पीव्हीके-४०० (एसपीव्ही- ९६०)

११५-१२०

३४-४०

मध्यम ते भारी जमीन. हमखास पर्जन्यमान असणाऱ्या भागासाठी योग्य वाढणारी बुरशीसाठी रोग प्रतिबंधक, साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या समुहात मोडते. (१८ टक्के टी.एस.एस.) कडब्याची प्रत उत्तम, दाणा पांढरा टपोरा आणि शंखाकृती.      

२

सीएसव्ही-१५ (एसपीव्ही-९४६)

११०-११५

३५-४०

दाणे आणि कडबा (कडबा ११०-१२० क्विंटल/हेक्टर) यांचे अधिक उत्पादन देणारा वाण. उंच वाढणारा व भाकरीची प्रत उत्तम.

३

पीव्हीके-८०१ (१३३३) (परभणी श्वेता)

११५-१२०

४०-५०

मध्यम ते भारी जमिनीस योग्य, हा वाण संकरित वाणासारखा दिसतो. पावसात सापडल्यास इतर वाणाच्या तुलनेने या वाणाचे दाणे कमी काळे पडतात. उंची (६-७ फुट) संकरित वाणाइतकी असल्यामुळे प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा जमिनीवर लोळत नाही. सर्व खरीप वाणापेक्षा भाकरीची प्रत चांगली, कडबा चवदार, पौष्टिक व पचण्यास सुलभ, सरळ वाण असल्यामुळे शेतकरी स्वतःचे बियाणे स्वतः पुन्हा वापरु शकतो.    

४

पीव्हीके-८०९

११५-१२०

४०-४५

मध्य ते भारी जमिनीस योग्य. अधिक दाणे आणि कडबा उत्पादन दुहेरी उपयुक्त वाण. काळया बुरशीस प्रतिकारक्षम. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम.

बाजरी: अ) संकरित वाण

१

जीएचबी-५५८

७५-८०

३०-३५

उंची (१८०-१८५) से.मी. फुटव्याची संख्या ३ ते ५, कणसाची लांबी २२-२५ सेंमी. दाणा टपोरा एक हजार दाण्याचे वजन (१२ ग्रॅम), कडब्याचे उत्पन्न ५०-५५ क्वि./हे. उन्हाळयासाठी उपयुक्त वाण.

२

सबुरी

८५-९०

३०-३५

कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. फुटवे २-३, उंची १७०-२०० सेंमी. हा वाण मध्यम ते भारी जमिनीस योग्य.

३

श्रध्दा

७५-८०

२५-३०

कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. फुटवे २-३, उंची १८०-१९० सेंमी. हलक्या व मध्यम जमिनीस्तव कमी मध्यम पावसासाठी योग्य वाण.

४

एएचबी-१६६६

७५-८०

३०-३५

या वाणाने प्रचलित संकर वाण सबुरीपेक्षा १५-२० टक्के दाण्याचे व २० टक्के कडब्याचे अधिक उत्पन्न दिलेले आहे. यापासून दाण्याचे उत्पन्न ३०-३५ क्विं/हे. व कडब्याचे ५०-६० क्वि./हे. गोसावी रोगास प्रतिकारक आहे.

५

शांती

८५-९०

२५-२६

कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे. उंची १४५-१९० सेंमी. हा वाण गोसावी रोगास प्रतिकारक असून दाण्याचा रंग राखी, कणीस घट्ट, दाणे टपोरे, महाराष्ट्रातील अवर्षण भागासाठी प्रसारीत.

६

पीकेव्ही-राज

८०-८५

२८-३०

कडब्याचे उत्पन्न ५०-५५ क्वि./हे., हजार दाण्याचे वजन १२.० ग्रॅ. असून रोगास प्रतिकारक.

ब) सुधारित वाण

१

आयसीटीपी

८५-९०

२२-२५

(धान्य) ४०-४२ (कडबा) २ ते ३ फुटवे, लोळत नाही, मध्यम उंचीचा (१८०-१८५ सेंमी), कणसाची लांबी २०-२२ सेंमी, दाणा टपोरा (एक हजार दाण्याचे वजन ११-१२ ग्रॅ) दाण्याचा रंग करडा, कडब्याचे उत्पन्न ४० क्वि./हे.

२

एआयएमपी-९२९०१ (समृध्दी)     

८५-९०

२०-२५

कडब्याचे उत्पन्न ३५-४० क्वि./हे., दाण्याचा रंग हिरवा व टपोरा, भाकरीची गुणवत्ता उत्तम. गोसावी रोगप्रतिकारक व अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

३

पीपीसी-6 (परभणी संपदा)

८५-९०

२५-३०

कडब्याचे उत्पन्न ४०-४५ क्वि./हे.,भाकरीची गुणवत्ता उत्तम. फुटवे २-२.५, गोसावी रोगप्रतिकारक व अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी योग्य.

४

एबीपीसी-४-३

८०-८५

२७-३०

कडब्याचे उत्पन्न २७-३० क्वि./हे., गोसावी रोगप्रतिकारक असून दाण्याचा रंग किंचित हिरवा आहे.

पेरसाळ

१

अंबिका

११०-११५

१७-२०

पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता चांगली, फुटवे जास्त आणि एकाच वेळी पक्व होतात. करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. कोरडवाहूसाठी योग्य.

२

तेरणा (एमएयु-९)

१००-१०२

१९-२२

वाणाची उत्पादन क्षमता अंबिका या वाणापेक्षा अधिक असून हा वाण अंबिकापेक्षा १० ते १२ दिवस लवकर तयार होतो. तांदुळाची प्रत उत्तम असून करपा रोगास कमी प्रमाणात बळी पडतो. कोरडवाहूसाठी योग्य.

३

प्रभावती (परभणी-१)

११५-१२०

३५-४०

मध्यम बुटका वाण. फुटवे प्रमाण चांगले. जमिनीवर लोळत नाही. दाणा मध्यम आणि सुवासिक. भारी काळया जमिनीत बागायतीसाठी योग्य, लोह कमतरता सहन करतो. पाणी व खतास उत्तम प्रतिसाद.

४

सुगंधा

११०-११५

३९-४४

बुटका वाण, ओलिसात उत्तम प्रतिसाद, दाणे सुवासिक व लांबट आकाराचे, करपा रोगास बळी पडत नाही.

५

पराग

१०५-११०

४०-४२

मध्यम बुटका वाण, तांदळाची प्रत उत्तम, असून लोहद्रव्य कमतरतेस बळी पडत नाही. हा वाण प्रभावती व बासमती-३७० या संकरापासून पेशीसंवर्धनाचे तंत्र वापरुन तयार करण्यात आला आहे.

६

परभणी

अविष्कार

११२-११५

३६-३९

मध्यम बुटका वाण, लोहद्रव्य कमतरतेस बळी पडत नाही. तांदूळ सुवासिक असून तांदळाची लांबी पराग व सुगंधी वाणापेक्षा जास्त आहे. बागायतीस उत्तम प्रतिसाद.

७

टीजेपी-४८

११०-११५

२२-२४

मध्यम बुटका, सुवासिक, न लोळणारा वाण.

कापूस: अ) देशी वाण

१

परभणी तुराब (पीए-२५५)

११०-११५

२२-२४

हा वाण सर्वसामान्य शेतक-यांना परवडणारा असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारा धाग्याची लांबी २७-२८ मिमी. व रुईचा उतारा ३८ टक्के असून सुताचा नंबर ३५-४० एस आहे.

२

विनायक (पीए-४०२)

१५०-१६०

१६-१८

बोंडाचे वजन २.५ ते ३ ग्रॅ. धाग्याची लांबी २५ ते २६ मिमी. सुताचा नंबर ४० एस असून रुईचा उतारा ३८ टक्के आहे. हा वाण दहिया रोगास प्रतिकारक्षम आहे.

३

पीए-०८

१६०-१७०

१७-१८

पीए-२२५ व पीए-४०२ पेक्षा १६ टक्के अधिक उत्पादन, तंतुविरहित सरकी, मध्यम बुटका वाण. किड रोगास सहनशील

ब) अमेरिकन वाण

१

रेणूका (एनएच ४५२)

१६०-१७०

१०-१२

हा अमेरिकन सरळ वाण बहुगुणी असून रोग व किडीस कमी बळी पडतो. रूईचा उतारा ४० टक्के असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वाणात आहे.

२

एनएच. ५४५

१६५-१७०

१२-१५

हा वाण रेणूकापेक्षा अधिक उत्पादन देणारा असून रुईचे उत्पादन २० टक्के जास्त आहे. रोग व किडीस प्रतिकारक्षम

३

यमुना (पीएच ३४८)

१६५-१७०

१६-१७

या वाणाचे एनएच-५४५ पेक्षा १५ टक्के उत्पन्न जास्त आहे. धाग्याची लांबी २७-२८ मिमी. असून रुईचा उतारा ३८ टक्के आहे. या वाणाची वैशिष्टये म्हणजे झाडाची वाढ उभट असून झाळ विरळ आहे. त्यामुळे हा वाण रोगराईस कमी प्रमाणात बळी पडतो व बोंडे चांगली पक्व होतात. या वाणाच्या बोंडाचे वनज ३.५ ग्रॅम असून बोंडे चांगली फुटतात त्यामुळे कपाशी वेचणीस सुलभ होते.

क) अमेरिकन संकरित वाण

१

एनएचएच-४४

१६०-१७०

१९-२२

संकर-४ पेक्षा उत्पादन सरस, लवकर तयार होत असल्याने गहू किंवा भुईमुगासारखे दुबार पीक घेता येते. धाग्याची लांबी मध्यम (२४-२५ मिमी.) रस शोषण करणा-या किडींना प्रतिबंधक, बागायती आणि कोरडवाहूसाठी उपयुक्त, विविध हवामानात उत्पादनात स्थैर्य व पुनर्बहाराची क्षमता.  

२

गंगा (पी.एच.एच. ३१६)

१६०-१७०

१७-१८

एनएचएच-४४ पेक्षा १५ टक्के उत्पादन जास्त, धाग्याची लांबी एनएचएच-४४ पेक्षा ३ मिमी. ने आणि रुईचा उतारा ४ टक्के जास्त. मर रोगास प्रतिबंधक, झाडाची वाढ उभट व बोंडाचा आकार मोठा.

 

लेखक:
प्रा. अपेक्षा कसबे (शास्त्रज्ञ, कृषिविद्या)
प्रा. सचिन सुर्यवंशी (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख) 
कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर
02471-243275

English Summary: How to plan kharif crops ?
Published on: 30 June 2018, 01:29 IST