जमीन हा निसर्गाकडून मिळालेला अनमोल ठेवा आहे. परंतु, बहुसंख्य शेतकरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. गेल्या २५ ते ३० वर्षांत जमिनीची सुपीकता वेगाने ऱ्हास होत असल्याचे दिसून येते. वेळीच दखल न घेतल्यास अशा जमिनीत पिके घेणे अवघड होईल. जमिनीचा सजीवपणा टिकवून ठेवला तरच सुपीकता व उत्पादनक्षमता टिकून राहणार आहे.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सर्व सूक्ष्म जीवाणूंची, गांडूळाची संख्या व कार्यक्षमता ही सदैव उच्च पातळीवर राहावयास पाहिजे. याशिवाय जमिनीच्या विविध गुणधर्मांवरही सुपीकता अवलंबून असते.
माती परीक्षण आवश्यक
जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मावर व अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेवर सुपीकता ठरविली जाते. सूक्ष्म जीवाणू व गांडूळ यांच्या कार्यक्षमतेनुसार जमिनीचे सर्व गुण बदलतात. प्रत्येक कृषी हवामान विभागातील जमिनीचे गुणधर्म वेगळे असतात. जमिनीची चाचणी केल्याशिवाय तिच्या गुणधर्माचे व दोषांचे स्वरूप कळत नाही. गुणधर्म व दोष कळाल्याशिवाय जमीन व पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येत नाही. आराखडा तयार केला नाही, तर जमिनीची पीक उत्पादनक्षमता वाढविता येणार नाही. त्यामुळे मातीपरीक्षण आवश्यक आहे.
हेही वाचा : मातीचे आरोग्य आणि शेती
जमिनीची प्रत किंवा सुपीकता पातळी
जी जमीन पूर्णपणे सजीव आहे, जिच्यात कमीत कमी दोष (उदा. क्षारता, आम्लता, विम्लता, चोपणपणा, घट्टपणा, निचरा नसणे, चुनखडीचे प्रमाण जास्त, जमिनीची धूप, उथळ अथवा बरड जमीन इ.) व जास्तीत जास्त उपयुक्त गुण आहेत तसेच पीक वाढीस अतिशय पोषक वातावरण आहे अशा जमिनीला उत्कृष्ट प्रतिची म्हणता येईल.
जमिनीचे गुणधर्म व पीक उत्पादन संबंध जमिनीचा सामू व क्षारतेचे प्रमाण यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येते. सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरून जमिनीची घडण, जलधारण क्षमता, निचऱ्याचे प्रमाण, जीवाणूंच्या कार्यक्षमतेची पातळी यांची कल्पना येते. भौतिक गुणधर्मावरून पोत, मुळांच्या वाढीस अनुकूल वातावरण याची कल्पना येते. जैविक गुणधर्मावरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवठ्याचे प्रमाण व वेग, सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाचा वेग व त्याचा भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते.
जमिनीची सुपीकता पातळी वाढली की, पीक उत्पादन पातळी आपोआप वाढते. तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादन पातळीही वाढते. क्षारयुक्त जमिनीत पीक उत्पादन घटते. चोपण व चुनखडीच्या जमिनीत स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. जमीन घट्ट असेल किंवा फार उथळ असेल तर पिकांची मुळे फार खोलवर जाऊ शकत नाही. परिणामी पाणी व अन्नद्रव्य शोषणावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादन घटते. वरील निकषावरून स्पष्ट होते की, पीक उत्पादनाच्या दृष्टीने जमीन सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर नियोजनाच्या माध्यमातून तिच्यात अपेक्षित बदल करणे गरजेचे आहे.
गांडुळे ही जमिनीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय खत निर्माण करणारे कारखानदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. जमिनीचे आरोग्य, शाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची पातळी २ टक्क्यांच्यावर राहील याची सतत काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांच्या जमिनी खराब झालेल्या आहेत किंवा खराब होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांनी वरील माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करावा.
सुपीकता नियोजनाची (जमीन प्रत सुधार) तत्त्वे
जमिनीची उत्तम भौतिक स्थिती, जमिनीतील आर्द्रतेचे योग्य प्रमाण, वरखतांचा संतुलित वापर, अनुकूल हवामान व वेळेवर मशागत या पंचसूत्रांचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता पातळी टिकून राहते. पीक उत्पादन पातळी वाढण्यास भरीव मदत होते.
विशिष्ट परिस्थितीत क्षारता व चोपणपणा होणार नाही याची काळजी घेणे, ओलितासाठी खारे किंवा मचूळ पाणी न वापरण्याचा निर्धार, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर, क्षारता व चोपणपणा सहनशील वाणांची निवड या गोष्टी कराव्या लागतील.
सुपीकता पातळी वाढविण्याचे मार्ग, भरखतांचा भरपूर प्रमाणात वापर,पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश,योग्य वेळी व योग्य प्रमाणात जमिनीची पूर्व मशागत,जैविक खतांचा वापर,सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शक्यतो सेंद्रिय खतांबरोबर वापर,माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर,क्षारयुक्त व चोपण जमिनीतभूसुधारकांचा वापर,सेंद्रिय स्वरुपात नत्राचा पुरवठा,सेंद्रिय तसेच एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब,मृदसंधारणाची वे.ळोवेळी कामे,पाणलोट क्षेत्र विकासाची कामे,जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मानुसार पीक नियोजन,एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा,जैविक कीटकनाशकांचा जास्तीत जास्त वापर,आच्छादन तंत्राचा वापर,जमीन निचरा व्यवस्था,गांडूळखत, कंपोस्टखत, हिरवळीचे खत यांचा जास्तीत जास्त वापर,जमिनीतून निघणारे सेंद्रिय पदार्थ जाळून न टाकता, शेतातच पुनर्वापर करा.
प्रतिनिधी गोपाल उगले
Published on: 20 August 2021, 04:19 IST