Agripedia

अलीकडील काळात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रूगिपेर्डा) या अत्यंत विध्वंसक किडीचा प्रकोप दिसत आहे. अमेरिकेतून उदयास आलेली ही अळी सर्वप्रथम भारतातील कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात मे २०१८ मध्ये आढळून आली. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध राज्यात या अळीचे वास्तव्य आढळून आले. या किडीमुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. प्रामुख्याने मका या पिकावर दिसून येणार्‍या या अळीचा प्रादुर्भाव ज्वारी, बाजरी, भात पिकांवर देखील दिसून येतो.

Updated on 23 April, 2020 10:06 AM IST


अलीकडील काळात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रूगिपेर्डा) या अत्यंत विध्वंसक किडीचा प्रकोप दिसत आहे. अमेरिकेतून उदयास आलेली ही अळी सर्वप्रथम भारतातील कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात मे २०१८ मध्ये आढळून आली. त्यानंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध राज्यात या अळीचे वास्तव्य आढळून आले. या किडीमुळे मक्याचे २० ते ६० टक्के नुकसान झाल्याच्या नोंदी आहेत. प्रामुख्याने मका या पिकावर दिसून येणार्‍या या अळीचा प्रादुर्भाव ज्वारी, बाजरी, भात पिकांवर देखील दिसून येतो.

किडीचा जीवनक्रमही कीड अंडी-अळी-कोष-पतंग अशा चार अवस्थांमध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करते.

  • अंडी: अंडी अवस्था २-३ दिवसाची असून, अंडी पुंजक्यावर पांढरे केसाळ आवरण असते जे पिवळसर-काळे झाले की त्यातून अळ्या बाहेर येतात.
  • अळी: अळी अवस्था सहा टप्प्यात पूर्ण होत असून १४-२२ दिवसांची असते. सुरवातीच्या तीन अवस्थांमध्ये अळीचे नियंत्रण करणे सोपे असते. चौथ्या, पाचव्या अवस्थेतील अळी खादाड असून तिचे नियंत्रण करणे अवघड असते. सहाव्या अवस्थेतील अळी पूर्ण परिपक्व असून तिच्या अंगावरील ठिपके ठळकपणे दिसतात. तिच्या डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलटा इंग्रजी ‘Y’ दिसतो. ही अवस्था ३-४ दिवसांची असून या अवस्थेत अळी पिकाचे अतोनात नुकसान करते व नंतर जमिनीत जाऊन कोषावस्थेत जाते.
  • कोष: ही अवस्था ९-३० दिवसांची असून, कोष जमिनीत २-८ सेमी खोल, मातीच्या आवेष्टनात गुंडाळलेला आढळतो. कोष लालसर तपकिरी रंगाचे, १४-१८ मिमी लांबीचे असतात.
  • पतंग: पतंग करड्या रंगाचे असतात. मादी पतंग मक्याच्या पोंग्यात पुंजक्यात अंडी घालते. एक मादी पतंग साधारणतः १०००-२००० अंडी घालते. पतंग एका रात्रीत ५०-६० कि.मी चे अंतर पार करून जाऊ शकतात.

किडीचा जीवनचक्र

नुकसानीचे स्वरूप:

या किडीची अळी अवस्था ही पिकासाठी नुकसान कारक असते. अळीच्या सुरवातीच्या अवस्था पानावर उपजीविका करतात. नंतर पोंग्यात शिरून आतील भाग खातात. पोग्यात खात असताना तिची विष्ठा तिथेच साठून राहते त्यामुळे पानांची प्रत खराब होते. वाढीचा भाग खाल्यामुळे तुरा बाहेर येत नाही. काही वेळा कीड कणसावरील केस तसेच कोवळी कणसे खाते. 


एकात्मिक कीड व्यवस्थापन (आय पी एम):

पिकांची नियमित पाहणी करावी व  लष्करी अळीची लक्षणे आढळून आल्यास सर्व उपाययोजनांचा एकात्मिक पद्धतीने अवलंब करून अळीचे व्यवस्थापन करावे.

१) पारंपारिक पद्धती:

  • जमिनीची खोल नांगरणी करावी व मशागतीच्या वेळी ५०० किलो निंबोळी पेंड प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावी.
  • शेत तणमुक्त व स्वच्छ ठेवावे.
  • अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा उदा. मका+तुर/मुग तसेच बांधावर नेपियर गवताची लागवड करावी.

२) यांत्रिक पद्धती:

  • कीडीच्या नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी अथवा रोपे उगवण्याच्या वेळी एकरी ५ कामगंध सापळे लावावेत. तसेच मोठ्या प्रमाणात नरपतंग आकर्षित करण्यासाठी एकरी १५ कामगंध सापळे लावावेत.
  • शेतात संध्याकाळी ६ ते ९ या कालावधीत प्रकाश सापळ्याचा वापर करावा.
  • पिकावर अंडी अथवा अळी सापडल्यास ती लगेच मारून टाकावी.

३) जैविक पद्धती:

  • एकरी १० पक्षी मचाण उभे केल्यास पक्ष्यांच्या साहाय्याने अळ्यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो.
  • पहिल्या व दुसऱ्या अवस्थेतील अळी पाने खरवडून खाते त्यामुळे पानांवर पारदर्शी चट्टे/पट्टे तयार होतात. या अवस्थेत वनस्पतिजन्य किटकनाशक (५% निंबोळी अर्क) आणि ब्यासीलस थुरिंजींसिस क्रस्ताकी म्हणजेच दैपेल २ मिली/ली वापरावे, तसेच  डेल्फिन ५ डब्लूजी २ ग्रॅम/ली पाण्यामधे मिसळून वापरावे.
  • बुरशिजन्य कीटनाशक उदा. मेटाराइजियम अनिसोप्लिए ५ ग्रॅम/ली, नोमोरिय रिले ५ ग्रॅम/ली या प्रमाणे फवारणी करावी.

४) रासायनिक पद्धती:

  • बीजप्रक्रिया: सायन्ट्रॅनिलीप्रोल १९.८%+थायोमिथॉक्झॅम १९.८% ४ मिली/किलो बियाण्यास वापरावे यामुळे रोपे २ ते ३ आठवड्यांची होईपर्यंत त्यांचे रक्षण होते.
  • तिसऱ्या आणि चौथ्या अवस्थेतील अळी पाने खाते त्यामुळे पाणांच्या कडा जीर्ण होतात तसेच पानांवर छोटी छिद्रे दिसू लागतात. अळीच्या वाढीबरोबर छिद्रे मोठी होतात यावेळी इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी ०.४ ग्रॅम/ली किंवा स्पिनोसॅड 45 एससी ०.३ मिली/ली किंवा कोराजेन १८.५ एससी ०.४ मिली/ली पाणी याप्रमाणे किटकनाशकांची फवारणी करावी.
  • पाचव्या आणि सहाव्या अवस्थेतील अळीचा बंदोबस्त करण्यासाठी विष अमिष सापळे जसे कि, १० किलो गव्हाचा कोंडा+२ किलो गुळ+२-३ लीटर पाणी+१० ग्रॅम थायोडीकार्ब ७५% डब्लू पी या मिश्रणाचे ०.५ ते १ सेमी जाडीचे गोळे तयार करून ते पानांच्या देठाजवळ ठेवावेत.

लेखक:
राजकुमार. वी, उदय. एस. बोराटे आणि जगदीश राणे
आयसीएआर-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगांव, बारामती, पुणे 
7028053855

English Summary: How to identify fall armyworm and its management
Published on: 22 April 2020, 10:40 IST