कांदा उत्पादनात देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. महाराष्ट्रात देशातील ३० टक्क्यांपेक्षा जास्त कांदा पिकवला जातो. नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा हेक्टरी जिल्ह्यांमध्ये कांदा पिकविण्याबाबत प्रसिद्ध आहेत. कॅश क्रॉप म्हणून या पिकांकडे पाहिले जात असल्याने इतर राज्येही कांद्याचे उत्पादन घेऊ लागली आहेत. आता २६ राज्यांमध्ये कांदा पिकू लागला आहे. परंतु ज्यावेळी कांद्याची काढणी चालू असते त्यावेळी मात्र कांद्याला खूप कमी बाजारभाव मिळतो. कांद्याची आवक वाढल्यानंतर बऱ्याच वेळा कांद्याचा भाव घसरत असतो.
काही दिवासांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याची शक्यता वर्तवली होती. बाजारातील अस्थिरता पाहता शेतकरी कांदा काही दिवस साठवून ठेवत असतो. भाव कमी असताना कांदा विकल्यास शेतकऱ्यांना तोटा होतो. त्यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करण्याचा निर्णय घेतात. कांदा साठवणूक करण्यासाठी आपल्याकडे चाळ असावी लागते. विशिष्ट प्रकारची चाळ असल्याच आपल्या मालाचे कमी नुकसान होत असते. चाळ बांधण्यासाठी सुधारित पद्धत वापरल्यास चाळीत हवा खेळती राहत कांदा सुरक्षित राहतो. आज आपण या लेखात चाळविषयी माहिती घेणार आहोत. चाळ कशाप्रकारे तयार करावी? चाळीसाठी काही शासकीय मदत मिळते का? याची माहिती आपण घेणार आहोत.
आधुनिक पद्धतीने कांदा चाळ जर तुम्हाला बनवायची असेल तर राज्याच्या कृषी विभागाकडून त्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्याला कृषी विभागाकडे रीतसर अर्ज करावा लागतो. चाळ मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना ८० हजार रुपांपर्यंतचे अनुदान दिले जाते. कृषी विभागाने चाळ मंजूर केल्यावर शेतकऱ्याने ५×३ फूट लांबी रुंदीचे कप्पे तयार करावेत. म्हणजे एकूण अंतर ४० फूट असल्यास त्यात प्रत्येकी ५ फुटांवर एक असे ८ कप्पे तयार करावेत, तसेच या कप्प्यांची रुंदी ही ३ फूट असली पाहिजे.
या चाळीची उंची ही जमिनीपासून एक फूट अंतर ठेवून त्याठिकाणी तळात बांबू टाकावेत. जेणेकरून बांबूच्या फटीमधून लागणारी हवा ही खेळती राहील. बांबूपासून चाळीची एकूण उंची ही 6 फूट असली पाहिजे. या सहा फूट उंच आणि तीन फूट रुंद बाजूला लोखंडी जाळी लावावी. जाळी लावल्याने कांद्याला हवा लागेल आणि कांदा फ्रेश राहील तसेच कांदा खराब होण्यापासून तो वाचले. चाळीला छप्पर बनवण्यासाठी पत्र्याचा वापर करावा. पत्रा सिमेंटचा असेल तर उत्तम कारण हा पत्रा जास्त गरम होत नाही. त्यामुळे कांद्याला नुकसान कमी पोहचते.
कांदा चाळीत टाकताना घ्यावी ही काळजी
शेतात कांदा काढणी सुरू केल्यानंतर कांदा लगेच चाळीत टाकू नये. कांदा प्रथम सुकू द्यावा. कमीत-कमी 8 दिवस उन्हात कांदा सुकावल्याने त्याचा ओलसरपणा निघून जातो. त्यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण खूप कमी होते. कांदा सुकल्यानंतर चाळीत टाकण्यापूर्वी खाली बीसी पावडर टाकावी. तसेच दोन फूट कांदा टाकल्यानंतर पुन्हा बीसी पावडर टाकावी असे केल्याने कांद्याला कीड लागत नाही तसेच कांदा कोरडा राहतो व खराब होण्यापासून वाचतो.
अशा पद्धतीने कांद्याची साठवणूक केल्याने कांदा खराब होत नाही तसेच 5 ते 6 महिन्यांपर्यंत टिकून राहू शकतो. दरम्यान 2 महिन्यांनंतर जर तुम्ही कांद्याची पलटी केली. जो काही खराब झालेला कांदा असेल तो बाजूला काढला तर उरलेला कांदा अधिक सुरक्षित राहू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही साठवणूक केली तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो.
Published on: 15 May 2020, 06:57 IST