1. कृषीपीडिया

कमी मजुर असतांना कशी कराल भात पेरणी ? जाणून घ्या लावणीचे सुधारित यंत्र

KJ Staff
KJ Staff


कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्रांना फटका बसल्याने जागतिक तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्था वाईटरीत्या मंदावली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भारतामध्ये कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ४.७ लाखाहुन अधिक झाली आहे आणि अधिक चिंताजनक दराने वाढत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात, हे संक्रमण फक्त शहरांपुरतेच मर्यादित होते, परंतु आता लोक ग्रामीण भागात स्थलांतरित होत आहेत आणि त्यांच्या स्थलांतरामुळे हा विषाणू ग्रामीण भागात पसरत आहे. आगामी खरीप हंगामात शेतीची कामे करण्यासाठी, मोठ्या संख्येने शेतकामगार आवश्यक असतील. म्हणूनच, कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून कृषी कामगारांचे संरक्षण करणे या काळात सर्वात मोठे आव्हान आहे.

खरीप पिकांच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सरकारने मार्गदर्शक सूचना कार्यप्रणाली प्रकाशित केली असली तरी नवीन तंत्रज्ञान व तंत्राच्या उपलब्धतेविषयी शेतकऱ्यांना जागरूक केले पाहिजे, जे त्यांना शक्यतो संक्रमणापासून दूर ठेऊ शकेल. अशात जागोजागी शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई होणार आहे. इतकेच काय उद्योग क्षेत्रातही कुशल कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे. अशा परिस्थिती आपण आपले काम कसे पुर्ण करणार ही चिंता अनेकांना सतावत आहे. या लेखात प्रामुख्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आगामी खरीप हंगामामध्ये भात पेरणी आणि लावणीसाठी देशभर उद्भवलेल्या कामगार टंचाईची समस्या आणि त्यांची सुरक्षा यांवर भर देण्यात आला आहे.

 

 

कोरोनाव्हायरस (कोविड-१९) सिंगल-स्ट्रँडेड आर.एन.ए. विषाणू आहेत.  ज्यामुळे श्वसनमार्गाचे संक्रमण होते आणि सौम्य ते प्राणघातक नुकसान होऊ शकते. कोरोनाव्हायरस संसर्गावर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल औषधे अस्तित्वात नाहीत. म्हणूनच, या रोगराईपासून मानवी जीवन संरक्षित करण्यासाठी प्रतिबंध खूप महत्वाचे आहे. कोरोना व्हायरस प्रामुख्याने खोकताना, शिंकताना, बोलताना किंवा श्वासोच्छवासाद्वारे रूग्णाच्या श्वसनाच्या थेंबांमधून पसरतो. संशोधकांना असे आढळले आहे की, या थेंबाद्वारे कोरोनाव्हाइयरसचे विषाणू हवेत तीन तास सक्रिय राहतात किंवा जवळपास पृष्ठभागावर/जमिनीवर पडले तर ते काही तास ते काही दिवस सक्रिय राहू शकतात. जर हे विषाणू श्वासाद्वारे कोणाच्या शरीरात गेले किंवा या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श केला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श केला तर त्याला संसर्ग होऊ शकतो. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी करूनही औद्योगिक व सेवा क्षेत्र बंद असल्यामुळे  भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी झाला आहे.

निती आयोगाचे सदस्य श्री. रमेश चंद यांनी म्हटले आहे की, “प्रतिकूल परिस्थिती असूनही यावर्षी शेती क्षेत्रात ३ टक्क्यांनी वाढ होईल आणि २०२०-२१ मध्ये भारताच्या जीडीपीच्या वाढीमध्ये किमान ०.५ टक्क्यांनी वाढ होईल” (कृषि-व्यवसाय, २०२०). महामारीच्या गडद ढगांमधे हे आशेचे किरण आहेत,  कारण शेती व शेतीशी संलग्न व्यवसायांमध्ये भारतातील निम्म्याहून अधिक लोक काम करतात. या महत्त्वपूर्ण काळात शेतकऱ्यांचे योगदान पूर्वीपेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या विलक्षण प्रयत्नांमुळे प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागातील किराणा दुकानात पुरेसे निरोगी अन्न आहे, परंतु देशाला अन्नपुरवठा करताना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. लॉकडाऊन दरम्यान बहुतेक कामगार त्यांच्या घरामध्ये आहेत, एकीकडे विषाणूची भीती आहे तर दुसरीकडे बेरोजगारी.

विविध उद्योगांना त्यांच्या आवश्यक कामांगारांपैकी २०% कर्मचारीही कामावर ठेवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. खरीप हंगामात बी-बियाणे, खते यांच्या उपलब्धतेसह शेतीसाठी पुरेसे मजूर मिळतील की नाही हे शेतकऱ्यांच्या चिंतेचे एक कारण आहे. कोविड-१९ मधील शेत कामगारांच्या कमतरतेमुळे शेती खर्चात दुप्पट वाढ होऊ शकते. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे आधीच गव्हाच्या कापणीवर परिणाम झाला होता आता आणि खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, विशेषतः भात पेरणीवर कारण्यासाठी जास्त मजुरांची गरज पडते.

भात हे तेलबिया, मसाले आणि नगदी पिकांप्रमाणेच खरीप पीकांपैकी एक महत्त्वाचे पिक आहे, ज्यासाठी मोठ्या संख्येने शेतमजूर आवश्यक आहेत. भात जगातील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी मुख्य अन्न आहे. जगभरात सुमारे १६२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड केली जाते. त्यापासून तांदळाचे वार्षिक उत्पादन सुमारे ७८२ दशलक्ष टन होते. तसेच आशिया खंडामध्ये जगातील सुमारे ९०.७% भात उत्पादन होते (६४० दशलक्ष टन). भारतात, २०१९-२० च्या दरम्यान भाताच्या ओलीताखालील क्षेत्र ४३.८६ दशलक्ष हेक्टर होते व त्यापासून मिळणारे एकूण उत्पादन ११७.४७ दशलक्ष टन एवढे होते, जे मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या (१०७.८० दशलक्ष टन) तुलनेत ९.६७ दशलक्ष टनाने जास्त होते. भाताच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर सरासरी ४५ कामगारांची आवश्यकता नोंदविली गेली आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यांचा देशाच्या एकूण भात उत्पादनांमध्ये सरासरी १०% वाटा आहे आणि या राज्यांना भात लावणीसाठी बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तरप्रदेश, बिहार इत्यादी पूर्व राज्यांमधून येणाऱ्या कामगारांवरती अवलंबून राहावे लागते.  त्यामुळे तेथील भात उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

 


सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगारांच्या उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे पंजाबने या भात हंगामात भातपेक्षा कापसाला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच, कोविड-१९ मुळे सर्व देशभर होणारी कामगार टंचाई दूर करण्यासाठी तसेच जे उपलब्ध होतील त्यांना या साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी खरीप हंगामात भाताच्या पेरणीसाठी सुधारित शेती उपकरणांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे.   मजुरांची कमतरता दूर करण्यासाठी आणि सरकारने प्रकाशित केलेल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे अनुसरण करण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी या लेखात भात पेरणी आणि लावणीच्या विविध पद्धती व उपकरणे यावर चर्चा केली आहे.

२. पारंपारिक पध्दतीने भात पेरणी आणि लावणीः

पारंपारिक पद्धतीने भात लागवडीमध्ये जमिनीची सुलभ तयारी करण्यासाठी आणि तण वाढ रोखण्यासाठी शेतामध्ये पाण्याचा संचय करणे गरजेचे असते, ज्यामुळे तण नाशकांचा वापर टाळता येतो व कामगारांची आवश्यकता कमी भासते. चिखलणीनंतर भाताची लावणी केल्यामुळे मातीच्या पारगम्यतेचा नाश होतो तसेच जमिनीच्या उथळ खोलीत कडक थर तयार होतो.  ज्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ खुंटते. भाताची लागवड ही श्रम, वेळ आणि उर्जावर केंद्रित क्रिया आहे.  कारण त्यासाठी प्रति हेक्टर ३५ ते ४५ माणसांची गरज पडते. जे भाताच्या लागवडीच्या एकूण कामगारांच्या २५ टक्के आहे. अलिकडच्या दशकात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भात संशोधन संस्थांनी भात पेरणीसाठी विविध पद्धती तसेच तंत्रे विकसित केली आहेत.  ज्यांसाठी शेतात चिखलणी करण्याची गरज नाही.

भाताच्या सरळ पेरणीमध्ये दोन प्रकार आहेत.  उदा. कोरडी पेरणी आणि ओली पेरणी. भाताच्या बियानांची कोरडे पेरणी, योग्य प्रकारे मशागत केलेल्या अथवा मशागत न केलेल्या जमिनीमध्ये सीड-ड्रिल या यंत्राद्वारे केली जाते. यंत्राशिवाय भाताची कोरडी पेरणी एकतर विखारनीद्वारे केली जाते किंवा टोकण पद्धतीने केली जाते. ओल्या भात पेरणीमध्ये, अंकुर आलेल्या भाताचे बी ड्रम सीडर वापरुन किंवा ओल्या शेतात विखरणी करून केली जाते. भाताची सरळ पेरणी सिंचनाचे पाणी, श्रम, ऊर्जा, वेळ वाचवते आणि ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन देखील कमी करते.  कोरडे बी पेरल्यामुळे पीक लवकर कापणीस लवकर येते तसेच खरीप हंगामानंतर उन्हाळ्याच्या हंगामात पाणीटंचाईचा धोका कमी होतो. भाताच्या सरळ पेरणीमध्ये प्रति हेक्टर ३ ते ५ कामगार लागतात जी चिखलणी करून भाताची लावणी करण्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.

३. भात पेरणीसाठी सुधारित यंत्रे आणि उपकरणेः

उशीरा पेरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी १-२० जून दरम्यान कोरड्या जमिनीत भात पेरणी करणे आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताच्या रोपांची लावणी करणे आवश्यक आहे.

३.१ कोरड्या जमिनीमध्ये भात पेरणी

कोरड्या जमिनीत भात पेरणीसाठी जड पोतयुक्त मातीमध्ये प्रति हेक्टर २५-३० किलो भात बियाणे वापरावे आणि पेरणीनंतर ४ ते ८ आठवड्यांनी हेक्टरी १२०-१३५ कि.ग्रा. नत्र द्यावे. पेरणीच्या ४८ तासाच्या आत ओलसर मातीत एक हेक्टरसाठी ६०० लिटर पाण्यात २.५ ते ३.० लिटर पेंडीमॅथिलीन मिसळून त्याची फवारणी करावी. वीस दिवसानंतर २५० मि.ली. बिस्पिरिबॅकची फवारणीमुळे पेरणीनंतर तणांवर उत्कृष्ट नियंत्रण ठेवले जाते.  (काही कृषी रसायने सुरक्षेच्या कारणास्तव बॅन करण्यात आली आहेत. त्यासाठी पर्यायी रसायने बाजारामध्ये उपलब्ध असून त्यांचा वापर करावा).  कोरड्या व चांगल्या प्रकारे तयार केलेल्या शेतात भाताच्या पेरणीसाठी वापरल्या जार्णाया विविध उपकरणांविषयी  ची माहिती खाली दिली आहेः

 


सीड-कम-फर्टीलायझर ड्रिल या मशीनचा उपयोग भात, गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी बियाणांच्या पेरणीसाठी होतो. यामध्ये खासकरून बियाणे आणि खतांसाठी वेगवेगळे डब्बे असतात. बियाणांचा प्रति हेक्टरी दर बदलण्यासाठी फ्लूटेड रोलर मोजणी यंत्र असते आणि खतांसाठी ग्रॅव्हिटी टाईप फीड रोलर असतात आणि त्याला चैन-स्प्रॉकेटने फिरवणारे जमिनीवर चालणारे एक चाक असते तसेच बी व खात मातीत सोडण्यासाठी फाळ असतात. बी आणि खताच्या पेट्यांना जोडलेल्या लिव्हरने रोलर्स हलवून, पेट्यांखाली असणाऱ्या खोबणीची लांबी वाढते किंवा कमी होते, जे पेरण्यासाठी बियाण्याचे आणि खतांचे प्रमाण बदलतात. मशीन सहसा ९-१३ फळांसहित येते आणि ३५ एचपी ट्रॅक्टरद्वारे चालविली  जाते.

टर्बो हॅपी सीडरचा वापर खासकरून जमिनीची मशागत न करता ८-१० टन भाताचा पेंढा शेतात असतानाही गव्हाच्या पेरणीसाठी केला जातो. तसेच या मशीनचा खाली दिल्याप्रमाणे थोडासा बदल करून गव्हाचे काड शेतामध्ये असताना शेत मशागत न करताही भाताच्या पेरणीसाठी देखील उपयोग करता येतो. या व्यतिरिक्त काड नसलेल्या शेतामध्ये देखील मशागत न करताही भाताच्या पेरणीसाठी देखील उपयोग करता येतो. या यंत्रामध्ये असलेली रोटर ची पाती फाळांमधील अरुंद पट्टीमधील अगोदरच्या पिकांचे अवशेष तोडतो आणि इन्व्हर्टेड-टी-प्रकारच्या फाळांचा वापर करून बियाणे आणि खते मातीमध्ये सोडतो. ही ४५-५५ एचपी ट्रॅक्टरच्या थ्री-पॉईंट लिंकेजला जोडली जाते आणि याला ट्रॅक्टरच्या पावर-टेक-ऑफ शाफ्टद्वारे ऊर्जा दिली जाते. रोटरमध्ये सहा ते नऊ गामा प्रकारची पाती असतात, जी सैल पेंढा कापण्यास मदत करतात.

सीड-कम-फर्टीलाइझर प्लांटर

सामान्यता बियाणांचा प्रति हेक्टरी दर निश्चित करण्यासाठी फ्ल्युटेड रोलर प्रकारचे मोजणी तंत्र पेरणीसाठी वापरली जातात पण ते भातासाठी व्यवस्थित काम करतील असे नाही कारण यामध्ये बियाणांमध्ये किमान अंतर ठेवता येत नाही. यामध्ये प्लांटरप्रमाणे एका सरीमधील बियाणांमध्ये आणि दोन सरीमधील अंतर सारखे राखणे कठिण जाते. प्रत्येक मीटर चौरस इष्टतम वनस्पतींची संख्या एकसमान ठेवल्यामुळे त्या पेरणीचे अतिरिक्त फायदे मिळतात. सीड-कम-फर्टीलाइझर प्लांटरमध्ये इन्कलाइन्ड प्लेट नावाची मोजणी यंत्रणा असते. ज्यामध्ये एका सरी मधील बियाणांमध्ये आणि दोन सरीमधील अंतरसारखे राखले जाते. मुख्यतः प्लेट्स बदलून मका, सोयाबीन, शेंगदाणे आणि कापूस इत्यादी धान्य पेरण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आता लांबीच्या धान्याच्या तांदळाच्या थेट पेरणीसाठी ती लोकप्रिय झाली आहे कारण यामुळे लागवड करताना बियाण्याचे नुकसान कमी होते.  विद्यमान तसेच संरक्षण शेतीमध्ये वापरात असणारी सीड-कम-फर्टिलायझर ड्रिलमध्ये थोडे बदल करून त्याचा उपयोग कोरड्या भात पेरणीमध्ये करता येतो.

 


विद्यमान पेरणीयंत्रे वापरून आवश्यक बियाणे दर जसे की भाताच्या हायब्रीड बियाणांसाठी २५-३० कि.ग्रा. प्रति हेक्टर आणि नियमित बियाण्यांसाठी ४०-५० कि.ग्रा. प्रति हेक्टर करण्याच्या पद्धती खाली दिल्या आहेत.

१. कोरड्या जमिनीमध्ये भात पेरणीसाठी, बियाणे ८-१० तास पाण्यात भिजत घालावे आणि चांगले अंकुर आल्यानंतर सावलीत वाळवावेत.

२. बियाणे आणि खताच्या पेट्या समतल जमिनीवर भराव्या.

३. बियाणे आणि खताच्या पेटीच्या तळाशी असलेल्या फ्लूटेड रोलर्सचे स्लॉट संबंधित कंट्रोल लीव्हर्सचा वापर करुन बियाण्यांचे नुकसान टाळण्याकरिता स्लॉट पुरेसे उघडावेत.

४. हेक्टरी २५ ते ५० कि.ग्रा. बियाणे पेरणीचा दर ठेवण्यासाठी फ्लूटेड रोलर्सचे वैकल्पिक स्लॉट्स मेणाने बंद करावेत.

५. जमिनीवर चालणारे जे चाक आहे, त्याला टेकूच्या साहाय्याने उचलून ते २० वेळेस गोल फिरवावे आणि छोट्या पिशवीमध्ये बियाणे गोळा करावे.

६. त्या चाकाच्या २० फेऱ्यामध्ये किती लांबी समाविष्ट होते हे पाहाण्यासाठी चाकाच्या पारिमितीस २० ने गुणावे व एका मीटर मध्ये किती बियाणे पडले ते मोजावे. एका मीटरमध्ये साधारण १६-२० बियाणे असावे अन्यथा स्प्रॉकेट बदलून आणि फ्लूटेड रोलरचा स्लॉट कमी-जास्त करून हेक्टरी बियाणे दर स्थापित करावा.

३.२ चिखलणी केलेल्या जमिनीमध्ये भाताची पेरणी

भाताची कोरडी पेरणी ३० टक्के पाण्याची बचत करते आणि पेरणीसाठी होणारा खर्च ही वाचवते तरीही शेतकरी कोरड्या भाताच्या लागवडीमध्ये तण जास्त येतात आणि भात तांबडे पडतात म्हणून चिखलणी करूनच पेरणी करणे योग्य समजतात. भात पेरणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर केल्याने शेतामध्ये जास्त लोकांना काम करण्यावर नियंत्रण येऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव शेतीच्या कामातून वाढू नये, याची दक्षता घेता येते. म्हणूनच भात पेरणीसाठी सर्व शक्य पर्यायांबद्दल जागरूकता करण्यासाठी भाताची ओल्या मातीमध्ये पेरणी करण्यासाठी तसेच चिखलणी करून भाताची रोपे लावण्यासाठी यंत्रांबद्दल खाली चर्चा केली आहे. 

ड्रम सीडरचा वापर अंकुरण पावलेल्या भात बियाणांची पेरणी चिखलणी केलेल्या शेतामध्ये करतात. याचा उपयोग करून ४ ते ८ ओळींमध्ये भाताची पेरणी करता येते. ड्रम सिडरमध्ये २ ते ४ ड्रम असतात.  प्रत्येक ड्रमच्या पारिमितीवर दोन प्लेनमध्ये अंकुरण आलेले भाताचे बियाणे सोडण्यासाठी १० मी.मी. व्यासाची छिद्रे असतात. प्रत्येक ड्रम अर्धा भरला जातो व त्यांची झाकणे बंद केली जातात. हे उपकरण १ ते १.५ कि. मी. वेगाने चालवले जाते ज्यामुळे छिद्रांद्वारे त्यातील बियाणे जमिनीमध्ये ४० ते ५० कि. ग्रा. या दराने पेरली जातात. ड्रम सीडरचे वजन ८ कि.ग्रा. असून त्याची किंमत ५००० रुपये आहे. याचा उपयोग करून एका दिवसामध्ये एक हेक्टर शेत पेरता येते. ड्रम सीडरच्या वापराने भाताच्या रोपाईच्या तुलनेत प्रती हेक्टरी भात लागवडीची लागत १०००० रुपये कमी लागते, त्यापासून १३-२८% जास्त उत्पादन मिळते आणि पीक कापणीसाठी १०-१५ दिवस लवकर येते.     

 

ड्रम सीडरने भात पेरताना घ्यावयाची काळजीः

१. शेतामध्ये चिखलणी केल्यानंतर, पेरणी अगोदर ज्यादा पाण्याचा निचरा करावा पण जमिनी ओली राहील याची काळजी  घ्यावी.

२. पेरणी अगोदर भात बियाणे १ लिटर पाण्यामध्ये २ चमचे मीठ हे प्रमाण करून त्यात घालावेत, जेणेकरून पाण्यावर तरंगणारे खराब बियाणे वेगळे करता येतील. त्यानंतर हे बियाणे धुऊन घेऊन २४ तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घालावेत.

३. २४ तासानंतर भिजलेले बियाणे सावलीमध्ये आणि आद्र्ता असलेल्या ठिकाणी गोणपाटामध्ये घालून ठेवावे आणि त्यावर वारंवार पाणी शिंपडावे.

४. दुसऱ्या दिवशी अंकुर आलेले हे बियाणे ड्रम सीडरमध्ये पेरणीसाठी वापरावे.

५. पेरणी केल्यानंतर २-३ दिवस शेताला पाणी देऊ नये, जेणेकरून त्याची मुळे जमिनीमध्ये व्यवस्थित रुजतील, त्यानंतर जसजशी पिकाची वाढ होईल तसे तसे त्यास पाण्याची मात्रा वाढवावी.    

३.२.२ भात लावणी यंत्र

भात लावणी यंत्र खासकरून दोन प्रकारची असतात, वॉकिंग टाईप आणि दुसरे रायडींग टाईप. वॉकिंग टाईपमध्ये चालकास यंत्राच्या पाठीमागे चालावे लागते, जे किंवा चालकास त्यास चालवावे लागते. रायडींग टाईप मध्ये चालकास मशीनवर बसण्यासाठी सीट असते आणि हे यंत्र डिझेल/पेट्रोल इंजीनवर  चालते.

३.२.२.१ वॉकिंग टाईप भात लावणी यंत्रः

वॉकिंग टाईप भात पेरणी यंत्रामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे मानव चलित आणि दुसरे आहे डिझेल/पेट्रोल इंजिनवर चालणारे. यासाठी मुळे धुतलेली भाताची रोपे किंवा खास मॅट टाईप नर्सरी पद्धतीने उगवलेली रोपे लागतात.

३.२.२.२ मानव चलित भात लावणी यंत्रः

या यंत्राचा उपयोग कमी शेत असणाऱ्या शेतकऱ्यांस अधिक होतो कारण याची किंमत कमी आहे तसेच याची क्षमता हाताने लावणी करण्यापेक्षा जास्त आहे. हे यंत्र चालवण्यासाठी चिखलणी करून पाण्याचा निचरा केलेली जमीन लागते. यामध्ये चालकास मशीन ओढत उलटे चालावे लागते.  मॅट टाईप नर्सरीमध्ये लावलेली २० ते २५ दिवसांची रोपे यासाठी वापरतात. रोपे जमिनीमध्ये लावण्यासाठी चालकास मशीनचा हँडल उचलून थोडा खाली दाबावा लागतो व पुन्हा पाठीमागे चालावे लागते. या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये ०.१२ ते ०.२८ हेक्टरमध्ये लावणी करता येते. याची किंमत ६००० ते १२००० पर्यंत आहे.       

३.२.२.३ हँड क्रेंकींग टाईप भात लावणी यंत्रः

भाताची मुळे धुतलेली रोपे एका ओळीत लावण्यासाठी याचा उपयोग होतो. एका ओळीत रोपांची लावणी केल्याने त्यामध्ये सायकल कोळपा किंवा इतर यंत्राने भांगलण करणेही सोपे जाते. वाकून हाताने पेरणी करताना जो त्रास होतो, तो याच्या वापराने टाळता येतो. याची किंमत १५००० रुपये आहे, याने एका दिवसामध्ये ०.२४ हेक्टर जमिनीमध्ये लावणी करता येते आणि यामुळे हाताने लावणे करण्याच्या तुलनेत ७०% कमी खर्च येतो.

३.२.२.४ पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात लावणी यंत्रः

रायडींग टाईप भात लावणी यंत्राची किंमत जास्त असल्या कारणाने तसेच वाकून हाताने पेरणी करणेही खूप त्रासाचे वेळ घेणारे आणि खर्चिक असते. या कारणाने पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात पेरणी

 

यंत्राचा वापर अधिक फायदेशीर होऊ शकतो. याच्यासाठी मॅट टाईप नर्सरीची रोपे हवी असतात, ती ४० ते ५० मी.मी. खोलीवर लावली जातात. याची किंमत २.५ ते ३ लाख असून याने ०.२८ ते ०.३६ हेक्टर जमिनीमध्ये एका दिवसात लावणी करता येते.

३.२.३ रायडींग टाईप भात लावणी यंत्र

भात लावणी यंत्राचा चिखलणी केलेल्या जमिनीत वापर करणे हा आतापर्यंत सर्वात योग्य समजली जाणारी पद्धत आहे. रायडींग टाईप भात लावणी यंत्र एका किंवा चार चाक सोबत येते. याने एका दिवसामध्ये जवळपास १.२ ते १.६ हेक्टर शेतात भाताची लावणी मॅट टाईप पद्धतीने तयार केलेल्या १४ ते २० दिवसांची रोपे लावता येतात. हाताने लावणी करण्यासाठी एका हेक्टरसाठी ६००० रुपये खर्च येतो तोच रायडींग टाईप भात लावणी यंत्राचा वापर केल्याने १२०० रुपये येतो. मशीनच्या साहाय्याने लावणी व पेरणी केल्याने वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते.

मॅट टाईप नर्सरीमध्ये भाताची रोपे तयार करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहेः

१. भात लावणीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर नर्सरी लावायला हवी. एक हेक्टर साठी २० ते २५ कि.ग्रा. चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे.

२. प्रत्येकी दहा किलोसाठी एक ग्राम स्ट्रेप्टोसायक्लीन आणि १० ग्राम जेमिसनचे मिश्रण वापरावे. दहा लिटर पाण्यामध्ये हे बियाणे ८ ते १२ तास भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणांतून पाण्याचा निचरा करून ते गोणपाटात ठेवावे आणि त्यावर वारंवार पाणी शिंपडावे. २० तासानंतर अंकुर आलेले बियाणे नर्सरीमध्ये पेरण्यासाठी तयार होतात.

३. एका हेक्टरमध्ये भाताची लावण करण्यासाठी ६० ते ८० वर्ग मीटर बेड वर नर्सरी लावणे पुरेसे आहे.

४. त्या नर्सरी बेडला छिद्रे असेलल्या ८०-१०० मायक्रॉन पॉलीथीन ने झाकावे ज्यामुळे त्यास ऑक्सिजन आणि पाणी देण्यास मदत होईल.

५. व्यवस्थित चाळलेली माती आणि फार्म यार्ड मॅन्युअर व गांढूळ खात  यांचे ४:१ या प्रमाणात मिश्रण बनवावे व त्याचा १-२ सेंमी थर पॉलीथीन वर अंथरून घ्यावा. लाकडाची किंवा लोखंडाची ५०×१००×२ आकाराची फ्रेमला चार रखाण्यात विभागुन ती पॉलीथीन वर ठेवून मातीने काठोकाठ भरून समतल करून घ्यावी. त्यामध्ये प्रति २४ वर्ग मी. जागेवर, १२ कि.ग्रा. साधे बियाणे किंवा ९ कि.ग्रा. हायब्रीड बियाणेप्रमाणे २ सें.मी. खोलीवर पुरावे आणि त्यावर अगोदर बनवलेल्या मिश्रणाचा ५० मी.मी. चा थर अंथरावा.

६. तीन ते चार  दिवसातून ७ ते ८ वेळेस या नर्सरीवर पाणी शिपडावे आणि त्यानंतर बेड च्या बाजूला बनवलेल्या सरीने पाणी द्यावे. लावणी करण्याच्या १२ तास अगोदर पासून पाणी देणे बंद करावे.

७. प्रत्येकी ८० वर्ग मी. नर्सरीसाठी दीड किलो डी.ए.पी. पावडर अथवा दोन कि.ग्रा. एन.पी.के. ची पावडर नर्सरी च्या वाढीसाठी मदत करते आणि ती नर्सरी १५ दिवसांतच लावणीसाठी तयार होते.

८. नर्सरीमधील रोपे जर पिवळी पडली असतील तर त्यावर ०.५% झिंक सल्फेट, २.५% युरिया आणि १.२ लिटर पाणी यांचे द्रावण करून रोपांवरती शिंपडावे. रोपे जर थोडी तांबडी पडली असतील तर ०.५% आयर्न सल्फेट च्या द्रावणाचा शिडकाव करावा. भाताचा तरवा तयार झाल्यानंतर त्याचे ६०×२० च्या आकाराच्या मॅट बनवाव्या

 


कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावा दरम्यान शेतकऱ्यांना तसेच शेतकामगारांना भाताची पेरणी किंवा लावणी करताना घ्यावयाची काळजीः

१. सर्व शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, सीड ड्रिल इ. वापरापूर्वी ४८ तास उन्हामध्ये ठेऊन निर्जंतुक करून घ्यावीत.

२. भात पेरणीसाठी शक्यतो ट्रॅक्टर ने चालविली जाणारी यंत्रे वापरावीत जेणेकरून जास्त कामगारांची गरज भासणार नाही. जर ट्रॅक्टर ने चालविली जाणारी यंत्रे नसतील आणि हातानेच पेरणी करायची असेल तर त्यामध्ये लागणारी अवजारे वापरापूर्वी साबणाच्या पाण्याने व्यवस्थित निर्जंतुक करावीत.

३. शेतामध्ये काम करणार्यां लोकांनी जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी बाहेर येताना हात, पाय व तोंड साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवावे.

४. नर्सरी तयार करताना, पेरणी यंत्रामध्ये बियाणे भरताना, शेतकामा दरम्यान जेवण करताना किंवा विश्रांती घेताना परस्परांमध्ये कमीत-कमी दीड ते दोन मीटरचे अंतर ठेवावे.

५. काम खूप जास्त असेल तर कामगारांना शिफ्टमध्ये काम द्यावे.

६. शेतामध्ये काम करताना सर्वांनी फेस मास्क वापरावे नाहीतर तीन पदरी ओढणी, गमछा, इत्यादी चा वापर करावा.

७. शेतामध्ये बियाणे आणि खत वापरल्यानंतर रिकामी झालेल्या पिशव्या साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवाव्यात आणि रसायनांची रिकामी झालेली पाकिटे जमिनीमध्ये पुरावीत तसेच शिल्लक राहिलेले बियाणे उन्हामध्ये ठेऊन निर्जंतुक करून साठवून ठेवावे.

८. शेतातील काम पूर्ण झाल्यानंतर साबण वापरून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी व कामासाठी वापरण्यात आलेली कपडे देखील साबणाने स्वच्छ धुऊन सूर्य प्रकाशात वाळवावीत.

खरीप हंगामामध्ये केल्या जाणाऱ्या अधिकतम शेतकामांसाठी जास्त कामगारांची आवश्यकता असते. सध्या कोरोना व्हायरसचा एवढा जास्त प्रादुर्भाव होत असताना त्याची इतर कोणास लागण न होता शेतीची कामे करणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. सोप्या आणि चांगल्या पद्धतीने शेतीची कामे करणे आणि जास्त उत्पादन मिळवणे हे भविष्यामध्ये देशाची अन्न-सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. शेतीच्या कामाद्वारे लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती करणे हा सध्या  एकमात्र उपाय आहे. भात हे भारतामध्ये आणि जगामध्ये जास्त कामगारांची आवश्यकता असूनही एक मुख्य अन्न म्हणून उपयोगात आणले जाते, म्हणूनच त्याची पेरणी किंवा लावणी करताना या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी भाताची पेरणी करताना या लेखामध्ये दिलेल्या यंत्रांचा योग्य वापर करणे अधिक फायद्याचे ठरते. भाताच्या पेरणी सोबतच शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांचा जीव त्याहून अधिक महत्वाचा आहे.

लेखक 

चेतन सावंत ०७५५२५२१२३० (वैज्ञानिक, भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान, भोपाळ. मध्य प्रदेश)

अभिजीत खडतकर

भास्कर गायकवाड

अजित मगर

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters