Agripedia

शेतमाल विक्रीसाठी आजपर्यंत आपल्याकडे दोन प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत

Updated on 16 March, 2022 2:02 PM IST

शेतमाल विक्रीसाठी आजपर्यंत आपल्याकडे दोन प्रकारच्या बाजारपेठा उपलब्ध आहेत

१) आठवडे बाजार

२) कृषी उत्पन्न बाजार समिती

पण विचार करा. वर्षानुवर्षे आपण मेहनत करतोय शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहोत, वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतो आहोत, त्यासोबत आपले कष्ट आणि आपला वेळ हे दोन्ही आपण तिथे देतो आहोत.

पण साधारणपणे सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिली तर सर्वसामान्यपणे 90 ते 95 टक्के शेतकरी पाच वर्षांपूर्वी ज्या अवस्थेमध्ये होते त्याच अवस्थेमध्ये आजही आहेत..

आणि या बरोबरच आपण पाच वर्षात महागाई पाहिली तर सर्व क्षेत्रामध्ये किमान 30 ते 35 टक्क्यांनी सर्व गोष्टींचे दर वाढलेले आहेत.साधं उदाहरण घेऊया पाच वर्षांपूर्वी शिक्षणासाठी लहान मुलाला शाळेत ऍडमिशन घ्यायचं असेल साधारणपणे 10 ते 15 हजार रुपये फी असायची. 

आज हीच फी 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

हीच बाब आपण खते बी-बियाणे किंवा मजुरी याबाबतीतही लक्षात घेऊ शकतो.परंतु माझा शेतकरी पाच वर्षापूर्वी ज्या भावाने मेथी किंवा कोथिंबिरीची जुडी मार्केटमध्ये ठोक दराने विकत होता, त्याच्या आसपासच भाव आजही त्याला मिळतोय. 

हे सर्वांना मान्य आहे का? शेतकरी बांधवांनो विचार करा. हे का घडते?

याचं एकमेव उत्तर म्हणजे, माझा शेतकरी भाऊ आपणच पिकवलेल्या कष्टाच्या आणि घामाच्या शेतमालाचा दर स्वत: ठरवू शकत नाही.मग वर्षानुवर्षे चाललेली ही परंपरा अजून किती वर्ष चालू राहणार? अजून किती वर्ष शेतकऱ्यांनी घर जाळून कोळशाचा धंदा करायचा आहे?

कधी आपण आपल्याच मालाचा भाव ठरवू शकू का? 

माझा शेतकरी इतर व्यावसायिक कमवतात तसे भरभक्कम उत्पन्न कमवू शकेल का?

होय. कसे काय ते आता पाहू.

शेतकरी कष्ट, मेहनत व जिद्दीने शेतमाल तर तयार करतो पण खरी वेळ असते ती माल विक्री करण्याची.. 

पण तरी सुद्धा याच लढाईत शेतकरी हारतो कारण त्याला स्वतःच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा हक्कच मिळत नाही. 

मग हे बदलेल का? असा आपण विचार करत होतो.. तर, हो नक्की हे बदलेल. आणि ते कसे बदलायचे याविषयी आता पाहूयात.

मित्रहो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेतीमध्ये मंदी कधीच येणार नाही.

कारण की शेतातील माल हा 90% खाद्यपदार्थ या श्रेणीत मोडला जातो. आणि पृथ्वीवर माणसांना जगण्यासाठी जेवण आवश्यक आहे. एक वेळ माणूस गाडी न वापरता, चप्पल न वापरता किंवा प्रसंगी आंघोळ न करता ही जगू शकतो. पण जेवण नाही केलं तर माणूस जगेल काय? 

नक्कीच नाही. मग असे असताना पण शेतमालाला भाव का मिळत नाही? कारण आपले हात बांधलेले आहेत..l ते पारंपारिक विक्री व्यवस्थेने.हे बदलायला आता सुरुवात होणे गरजेचे आहे.‌ चला तर मग सुरुवात आपल्यापासूनच करू. आतापासून आपण एक गोष्ट करूयात., आपण पिकवलेला माल आपणच थेट ग्राहकांपर्यंत कसा विकता येईल याविषयी माहिती जाणून घेऊ.

१) ज्याला मागणी आहे तेच पिकवायचं.

मित्रहो आपला शेतकरी ढोबळमानाने शेती करण्यात व्यस्त झाला आहे. शेजाऱ्याने कांदा लावला की आपण कांदा लावतो. शेजाऱ्याने वांगी लावली की आपण मागे लावतो. शेजाऱ्यांनी ऊस लावला की आपल्याला पाणी असो नसो आपणही ऊस लावायचा हट्ट करतो.. आणि मग बरेच शेतकरी तोंडावर पडतात. का कशासाठी हा अट्टाहास? कशासाठी ही स्पर्धा? याऐवजी आता आपण बदल करायचा आहे तो म्हणजे. आपल्याला वार्षिक शेतीचे कॅलेंडर बनवता आलं पाहिजे. वर्षभरात कोणकोणते सण येतात त्यानुसार लोकांचा आहार कसा बदलतो व कोणत्या सणाच्या वेळी कोणत्या पिकाला मागणी जास्त असते त्यानुसार आपण आपल्या शेतीचं नियोजन ठरवायचं. 

उदाहरणार्थ. 

श्रावण आला की लोक - केळी, बटाटे, रताळी या गोष्टींना जास्त मागणी करतात. 

रमजान महिन्यांमध्ये सर्व प्रकारच्या फळांना चांगली मागणी असते. मग आपल्यापैकी किती शेतकरी त्या मागणीच्या काळात योग्य शेतमाल उत्पादन करून पुरवठा करू शकतात? अगदी बोटावर मोजण्याएवढेच.

बाकीचे शेतकरी मात्र पारंपारिक शेती करत आषाढी व कार्तिकी एकादशीच्या उपासा वरच लक्ष केंद्रित करतात. मग तो विठ्ठल तरी आपल्या शेतमालाला भाव कसा वाढवून देऊ शकेल?

त्यामुळे मित्रहो आपल्या शेताचा अंदाज घ्या. जमिनीचा पोत कोणता आहे ते ओळखा. पाण्याची उपलब्धता लक्षात घ्या. आणि बिनधास्त पिकांच वार्षिक कॅलेंडर बनवायला घ्या. 

म्हणजे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.

२) शेतकरी ते थेट ग्राहक अशी सेवा गावागावातून सुरू करा. मित्रहो आपल्याकडे एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे एकजूट नसलेला शेतकरी.आणि त्याचं नुकसान सर्वांनाच भोगावं लागतं.आपले शेतकरी कोणतीही गोष्ट एकीने करत नाही.. आणि म्हणून नुकसानीची किंवा तोट्याची शेती सर्वांच्या नशिबात येते. या ऐवजी शेतकरी बांधवांनी गटाच्या स्वरूपातून एकत्र आले तर त्या गावात तयार होणारा सर्व शेतमाल शहरांमधील चांगल्या वस्तीतील लोकांपर्यंत थेट पोहोचवता येऊ शकतो.यामध्ये मार्केट पर्यंतची मालवाहतूक, मापाई, तोलाई, हमाली, पट्टी, व्यापार्‍याचे कमिशन हे थेट शेतकऱ्यांच्या खिशात येईल. आणि शहरातल्या लोकांना थेट शेतकऱ्याकडून चांगल्या कॉलिटी चा माल मिळत असेल तर ते ही आनंदाने खरेदी करतील. मग यामध्ये डेली सर्विसेस पण दिल्या जाऊ शकतात. दूध, तूप, वेगवेगळ्या डाळी कडधान्य गहू ज्वारी, बाजरी, हरभरा इत्यादी वस्तू व्यवस्थित निवडून व त्याची छोट्या छोट्या पॅकेजमध्ये पॅकिंग करून (एक किलो, पाच किलो, दहा किलो) थेट ग्राहकांना आपण पोहोच करू शकतो. अशावेळी आपण पण जो योग्य भाव ठरवू त्याच भावाने तयार शेतमाल विकण्याचा हक्क आपल्याकडे येतो. आणि नफा वाढवायला चालना मिळेल. 

३) सेंद्रिय शेतकरी व्हा. :- 

सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी आता पुणे, मुंबई, बेंगलोर या सारख्या मोठ्या शहरांत आठवडे बाजार संकल्पना सुरू झाली आहे.  

आपल्या गावात जर काही शेतकऱ्यांनी मिळून एकूण क्षेत्रफळ फक्त 10 ते 20 गुंठे (प्रत्येकी) सेंद्रिय शेती केली तरी देखील अतिशय चांगल्या भावाने हा शेतमाल विक्री करता येतो. 

 इथून पुढील पाच वर्षांमध्ये!

मित्रहो लक्षात ठेवा इथून पुढील पाच वर्षांमध्ये सेंद्रिय शेतकऱ्यांना लोक देवासारखे पूजणार आहेत.

कारण विघातक केमिकल्स पेस्टिसाइड्स व खतरनाक कीटकनाशकांचा वापर करून कॅन्सर सारखे भयानक आजार समाजामध्ये डोकं वर काढू लागले आहेत. आणि चांगला आहार घेवून हे टाळता येते याविषयी आता लोकांमध्ये चांगली जागरूकता वाढते आहे. 

त्यामुळे सेंद्रीय शेतमाल खाण्याकडे लोकांचे लक्ष वाढते आहे. येत्या पाच वर्षांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की सर्वसाधारण पणे उगवलेला, बेसुमार खतांचा व कीटकनाशकांचा वापर असलेला शेतमाल कोणी फुकट देखील घेणार नाही.. 

आणि ज्या शेतकऱ्यांकडे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण असेल त्यांच्याकडे ग्राहक किंवा व्यापारी लाइन लावून शेतमाल खरेदी करतील. (ही अतिशयोक्ती नाही.)

कारण की सेंद्रिय शेतीचे सर्टिफिकेट एका रात्रीत कधीच मिळत नाही. त्यासाठी पूर्ण तीन वर्षांचा कालावधी लागतो. आणि म्हणून जे शेतकरी आज सेंद्रिय शेती करत आहेत, आणि ज्यांनी प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू केली आहे त्यांना पाच वर्षानंतर सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण मिळालेले असेल. आणि त्यांच्याच मालाला भरपूर मागणी असेल. 

म्हणून सांगतो की सेंद्रिय शेतकरी व्हा. 

५) आकर्षकपॅकिंग करायला शिका.:-

मित्रहो आज आपल्या गटामध्ये 1000+ शेतकरी आहेत. 

आपल्यापैकी किती जण आकर्षक पॅकिंग केलेले शेतमालाचे प्रकार थेट मोठ-मोठ्या मॉल पर्यंत नेऊन पोहोच करतात? पुण्या-मुंबईसारख्या शहरात आता भाजीपाला फळे देखील एसी लावलेल्या मॉलमध्ये खरेदी करायची फॅशन सुरू झाली आहे. आणि या मॉलला आजपर्यंत दुर्दैवाने फक्त व्यापारीच पुरवठा करतात.आणि बक्कळ पैसा कमावतात.

याऐवजी आपल्या शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा शेतमाल आकर्षक पॅकिंग मध्ये केला त्याला स्टिकर चिटकवले आणि प्रतिकिलो साधारणपणे एक ते दीड रुपया खर्च केला की त्याच शेतमालाला चौपट भाव मॉलमध्ये मिळतो.

पण बर्‍याच जणांना ही माहिती नसल्यामुळे आपण आपले मार्केटला कॅरेट टाकून रिकामे होतो. 

आणि उत्कृष्ट क्वालिटी चा शेतमाल असूनही भाव मिळाला नाही म्हणून रडत बसतो. तर मग आज पासून ठरवूया.जिथे चांगल्या दराने शेतमाल विकेल आणि आपल्या कष्टाची जाण ज्यांना असेल त्यांनाच शेतमाल देऊया. स्वत: पिकविलेला शेतमाल स्वत:च विकूया.

 

प्रगतिशील शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

अचलपूर जिल्हा अमरावती.

English Summary: How can farmers make more profit by selling their own produce? Find out
Published on: 16 March 2022, 02:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)