Agripedia

पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात.

Updated on 19 April, 2022 1:52 PM IST
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी १३ जमिनीतून, तर तीन अन्नद्रव्ये पाणी आणि हवेतून मिळतात. या १३ अन्नद्रव्यांपैकी अधिक प्रमाणात लागणारी तीन, मध्यम प्रमाणात लागणारी तीन व कमी प्रमाणात लागणारी सात मूलद्रव्ये आहेत. त्यांना अनुक्रमे प्रमुख, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
 प्रमुख अन्नद्रव्ये - ही नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+) 
दुय्यम अन्नद्रव्ये- कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42) 
सूक्ष्म अन्नद्रव्ये- लोह (Fe2+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu2+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3), मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-), निकेल (Ni2+)
सूक्ष्म अन्नद्रव्ये व त्यांची वैशिष्ट्ये -
१) बोरॉन - वनस्पतीत बोरॉन हे अन्नद्रव्य १० ते २० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम या प्रमाणात पुरेसे असते. बोरॉनच्या वापरामुळे झाडांमध्ये कॅल्शियम ग्रहण करण्याची शक्ती वाढते व मुळांची वाढ होते. 
कमतरतेची लक्षणे :
- झाडांच्या वरच्या भागाचा विकास होत नाही, पाने गळून पडतात व झाडांवर अनेक प्रकारचे रोग येतात, तसेच पिकांवर तांबट ठिपके पडतात. 
- फळझाडांची फळे तडकतात. झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात, सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात. 

बोरॉन खते - बोरॅक्समध्ये १०.५ टक्के, बोरिक ॲसिडमध्ये १७.५ टक्के, तर सोल्युबरमध्ये १९ टक्के बोरॉन असते. 

फवारणी - ५० ग्रॅम बोरिक ॲसिड पावडर प्रति १०० लिटर पाण्यातून पानावर फवारणी करावी.

२) लोह- 

वनस्पतीत लोह हे अन्नद्रव्य १०० ते ५०० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम या प्रमाणात योग्य मानले जाते. लोहाचा पुरवठा केल्यास झाडांमध्ये प्रोटिन संश्लेषणाचे कार्य वाढते, तसेच ऑक्सिजनचे वहन होते, हरितद्रव्य तयार होतात. 

कमतरतेची लक्षणे -

- झाडांच्या वरची पाने पिवळी पडतात.- फळझाडांच्या पाने व शिरांमध्ये पिवळेपणा येतो. विशेषतः शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो, झाडांची वाढ खुंटते. 

लोहयुक्त खते - फेरस सल्फेटमध्ये १९ टक्के, तर आयर्न ईडीटीएमध्ये १२ टक्के लोह असते. पूर्ततेसाठी - हिराकसची अथवा फेरस अमोनियम सल्फेट अर्धा ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी.

३) तांबे-

पिकांमध्ये तांब्याचे प्रमाण ५ ते ३० मिलिग्रॅम प्रतिकिलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. तांब्यामुळे ‘अ’ जीवनसत्त्व निर्माण करण्यास मदत होते. 

कमतरतेची लक्षणे -

- भाजीपाला पिकांमध्ये व कांदा या पिकांमध्ये तांब्याची कमतरता असल्यास करपा हा रोग होतो. 

- मादी वर्गातील झाडे वरपासून खालपर्यंत सुकत येतात. पानांची टोके पांढरी होतात व गळून पडतात. सर्वसाधारणपणे पिकात नत्र कमतरतेप्रमाणे याची लक्षणे असतात. 

- लिंबू प्रजातीमध्ये फळांमध्ये डिंक जमा होतो आणि पाने कुरूप होतात, झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते, झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो, खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. 

ताम्रयुक्त खते - कॉपर सल्फेटमध्ये २४ टक्के, तर कॉपर ईडीटीएमध्ये ९ ते १३ टक्के कॉपर असते. याकरिता मातीपरीक्षणानुसार जमिनीतून कॉपर सल्फेट द्यावे किंवा मोरचूद ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडांवर मोरचूदची फवारणी करावी.

४) जस्त-

सर्वसाधारण पिकांमध्ये तांब्याचे प्रमाण २७ ते १५० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम एवढे असणे योग्य असते. जस्तामुळे झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते व संजीवके तयार होतात. 

कमतरतेची लक्षणे -

- फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते. 

- गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात. 

- मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत. 

- जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. 

जस्तयुक्त खते -

झिंक सल्फेट मध्ये जस्त २१ टक्के, झिंक ऑक्साइडमध्ये ५५ ते ७० टक्के व झिंक ईडीटीएमध्ये १२ टक्के एवढे असते. माती परीक्षणानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा अर्धा ते १ किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यातून पिकावर फवारावे.

English Summary: Here are the nutrients needed for crop growth in detail
Published on: 19 April 2022, 01:48 IST