Agripedia

वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते. या पिकाला आधार व वळण दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. वेलींची छाटणी करीत राहिल्यास हे पीक वर्षभर भरपूर उत्पादन देते. वेली ताटीवर पोचेपर्यंत 1.5 ते दोन महिन्यांचा कालावधी जातो, त्या दरम्यान वालाच्या दोन ओळींमध्ये पालेभाज्या मिश्रपीक म्हणून घेता येतात.

Updated on 07 December, 2021 8:35 PM IST

भाजीसाठी (गार्डन बीन) लागवड करण्यात येणाऱ्या वालाचे अनेक स्थानिक प्रकार आहेत. त्यांची लागवड स्थानिक बाजारासाठी किंवा परसबागेत केली जाते. त्या- त्या भागात ठराविक वाण लोकप्रिय आहेत. विशेषतः गुजरातमध्ये सुरती पापडी, वाल पापडी अशा स्थानिक जातींची लागवड होते.

     सध्या या पिकाची व्यापारी तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठांनी वालाच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत, यामध्ये वेलीसारख्या वाढणाऱ्या व झुडूपवजा वाढणाऱ्या जाती चांगले उत्पादन देतात.

     वाल लागवडीसाठी निचऱ्याची व ओलावा धरून ठेवणारी जमीन उत्तम असते. पाण्याचा निचरा न होणारी भारी व चिकण मातीच्या जमिनी या पिकाला उपयुक्त नाहीत, कारण जमिनीत पाणी साचून राहिल्यास पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. जमिनीचा सामू (पी.एच.) 6.5 ते 8.5 असल्यास पीक चांगले येते.

     जमिनीची उभी- आडवी नांगरट करून हेक्‍टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून मिसळावे व नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन माती भुसभुशीत करावी.

     पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये हे पीक वर्षभर कुठल्याही हंगामात घेता येते. उन्हाळी हंगामासाठी जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत लागवड पूर्ण करावी. एक हेक्‍टर वाल लागवडीसाठी पाच किलो बियाणे लागते.

लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी. वालाच्या मुळांवर नत्र साठविणाऱ्या गाठी असतात. या गाठींतील जिवाणू हवेतील नत्र शोषून घेतात. हा नत्र जमिनीत साठविला जाऊन नंतर झाडाला पुरविला जातो. अशा रीतीने हे पीक स्वतःच्या नत्राची गरज स्वतःच काही प्रमाणात भागविते. तेव्हा या पिकाच्या मुळांवर भरपूर गाठी येण्यासाठी बियाण्याला पेरणीच्या वेळी दहा किलो बियाण्यास 100 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

     जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी एक लिटर पाण्यात 100 ते 120 ग्रॅम गूळ विरघळवून हे द्रावण 10 ते 15 मिनिटे उकळून घ्यावे. ते थंड झाल्यावर त्यात जिवाणूसंवर्धक मिसळावे, त्यानंतर हे द्रावण वालाच्या बियाण्यावर शिंपडावे आणि हलक्‍या हाताने संपूर्ण बियाण्यास हळुवारपणे लावावे.

     पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून पेरणी ताबडतोब करावी. रायझोबियम जिवाणूसंवर्धक लावण्यापूर्वी वालाच्या बियाण्याला बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

लागवडीचे तंत्र

वालाच्या दोन ओळींतील अंतर 200 सें.मी. व दोन वेलींतील अंतर 60 सें.मी. ठेवून लागवड करावी. रीजरच्या साह्याने 2.20 मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. त्याला उताराशी प्रत्येकी 6.0 ते 7.5 मी. अंतरावर पाट ठेवावेत._

     लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळले नसेल तर सरीमध्ये प्रति हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल कंपोस्ट खत मिसळून घ्यावे.

     लागवडीपूर्वी शेतजमीन ओलावून सरीच्या बाजूने 60 सें.मी. अंतराने बियाणे लावावे.

ताटी पद्धतीने लागवड

वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते, त्यामुळे या पिकाला आधार व वळण दिल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. त्यासाठी सरीच्या दोन्ही टोकांना 2.5 मीटर उंचीचे लाकडी डांब रोवावेत व त्यांना बाहेरील बाजूने 12 गेजच्या तारेने ताण द्यावा. दोन्ही खांबांना 12 गेजची तार ओढावी. सहा ते 7.5 मीटर अंतरावर लाकडाने किंवा बांबूच्या कैचीने आधार द्यावा.

तारेची उंची जमिनीपासून 30 सेंटिमीटर उंचीची तिरपी काडी लांब सुतळी बांधून जमिनीत खोचावी. सुतळीचे दुसरे टोक वर तारेला बांधावे. वेल 50 सेंटिमीटर उंचीचे झाल्यानंतर वेलीच्या बगलेचे फुटवे काढून वेल सुतळीच्या साहाय्याने वरच्या दिशेने चढवावेत.

     वेल तारेपर्यंत जाईपर्यंत त्यांची बगलेची फूट काढावी; परंतु पाने काढू नयेत. नंतर फुटवे काढणे बंद करावे. वेलीच्या फांद्या दोन दिशेला पसरवून द्याव्यात. त्यानंतर प्रत्येक फांदी 50 सें.मी. लांबीवर कापावी. म्हणजे फुलांचे घोस मोठ्या प्रमाणावर लागतात.

     वेलींची छाटणी करीत राहिल्यास हे पीक वर्षभर चांगले व भरपूर उत्पादन देते. बांबू आणि तार जवळजवळ चार ते पाच हंगामांसाठी वापरता येतात आणि त्यादृष्टीने फायदेशीर ठरतात.

सुधारित जाती

अ) वेलीसारख्या वाढणाऱ्या जाती

फुले गौरी -

ताटीचा आधार दिल्यास झाडांची वाढ व उत्पादन चांगले मिळते. शेंगा चपट्या व पांढरट हिरव्या रंगाच्या असून, शेंगांची लांबी सात ते नऊ सें.मी. असते. प्रति हेक्‍टरी सरासरी उत्पादन 220 ते 250 क्विंटल मिळते. याचा कालावधी 180- 200 दिवसांचा असतात

 डी.एल. 453 -

दक्षिण भारतात ही जात सर्वत्र लोकप्रिय असून, याची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. ही जात 85 ते 90 दिवसांत भरपूर उत्पादन देते.

दसरा वाल -

याच्या शेंगा मळकट हिरव्या रंगाच्या असून, दोन्ही कडेला जांभळ्या रंगाची झाक असते. शेंगा सात ते आठ सें.मी. लांब व दोन सें.मी. रुंद असतात. या जातीपासून 200 ते 210 दिवसांत हेक्‍टरी 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळते.

दीपाली वाल -

शेंगा पांढऱ्या रंगाच्या असून, बियांच्या ठेवणीजवळ फुगीर असतात. शेंगा 16 ते 18 सें.मी. लांब असून, या जातीपासून 200 ते 210 दिवसांत 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळते.

ब) झुडूपवजा वाढणाऱ्या जाती

कोकण भूषण -

शेंगा हिरव्या रंगाच्या असून, शेंगांची काढणी पेरणीनंतर 55 ते 60 दिवसांनी करता येते. या जातीची झाडे 75 ते 80 सें.मी. असून, झुडूपवजा वाढतात. शेंगेची लांबी 15 ते 16 सें.मी. असून, कोवळ्या व शिराविरहित असल्याने सालीसह भाजीसाठी उपयुक्त असतात. या पिकाचे एकाच हंगामात दोन बहर घेता येतात. प्रति हेक्‍टरी सरासरी उत्पादन 80 ते 100 क्विंटल मिळते.

अर्का जय -

झाडे झुडूपवजा असून, 75 ते 80 सें.मी.पर्यंत वाढतात. शेंगा सालीसह भाजी करण्यास योग्य असतात. प्रति हेक्‍टरी सरासरी उत्पादन 70 ते 80 क्विंटल मिळते.

अर्का विजय -

ही झाडे झुडूपवजा असून, 70 सें.मी.पर्यंत वाढतात. शेंगा हिरव्या रंगाच्या असून, शेंगांची लांबी 10 ते 12 सें.मी. असते. प्रति हेक्‍टरी सरासरी उत्पादन 80 ते 90 क्विंटलपर्यंत मिळते.

फुले सुरुची -

ही झुडूपवजा वाढणारी वालाची जात आहे. शेंगा सरळ, किंचित वाळलेल्या, हिरव्या रंगाच्या व त्याच्या दोन्ही टोकांवर जांभळ्या छटा असतात. खरीप व रब्बी हंगामासाठी चांगली जात आहे. याचा कालावधी 70 ते 120 दिवसांचा असतो. या जातीचे सरासरी उत्पादन 88 क्विंटल मिळते.

ताटी उभारणीचे फायदे

वेलीला आधार दिला असता त्याची वाढ होते, उत्पादनही चांगले मिळते.

 हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.

खुरपणी, कीडनाशकांची फवारणी आणि फळांची तोडणी ही कामे अत्यंत सुलभ होतात.

वेली ताटीवर पोचेपर्यंत 1.5 ते दोन महिन्यांचा कालावधी जातो, त्या दरम्यान वालाच्या दोन ओळींमध्ये पालेभाज्या मिश्रपीक म्हणून घेता येतात.

English Summary: Hair planting technology and information.
Published on: 07 December 2021, 08:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)