Agripedia

भुईमुगाच्या लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रमुख प्रकार आहेत. उपटे प्रकार हळवे म्हणजेच तीन ते चार महिन्यांत तयार होणारे असून त्यांची झाडे सरळ वाढतात व शेंगा झाडाच्या बुंध्यापाशी झुपक्यात थरतात.

Updated on 24 January, 2024 2:16 PM IST

डॉ.आदिनाथ ताकटे, ऐश्वर्या राठोड

भुईमूग हे तेलबिया वर्गीय पिकामध्ये एक महत्वाचे पिक आहे. भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे. खरिपामध्ये भुईमूगाखालील क्षेत्र अधिक असले तरी उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने रोग व किडींची समस्या सुद्धा कमी उद्भवते. ओलिताची व्यवस्था असल्यास तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. उन्हाळ्यामध्ये भुईमूगाबरोबर तीळ, बाजरी, मूग, चवळी इ.सारखे आंतरपिके किंवामिश्रपीक म्हणून घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

जमीन

•मध्यम प्रकारची भुसभुशीत, चुना (कॅल्शिअम) व सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण योग्य असलेली, पाण्याचा उत्तम निचरा जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी.
•चिकन, भारी जमिनीत या पिकाची लागवड करू नये.
•जमिनीचा सामू ५.५-७.५ इतका असावा.

पूर्व मशागत

•जमिन तयार करताना नांगरणीची खोली १२ ते १५ से.मी एवढीच असावी.जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात.
•नांगरणी नंतर उभी-आडवी वखरणी करून जमिन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी अगोदर प्रति हेक्टरी १०-१५ टन कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.

प्रकार

भुईमुगाच्या लागवडीतील वाढीच्या प्रकारानुसार उपट्या, निमपसऱ्या आणि पसऱ्या असे प्रमुख प्रकार आहेत. उपटे प्रकार हळवे म्हणजेच तीन ते चार महिन्यांत तयार होणारे असून त्यांची झाडे सरळ वाढतात व शेंगा झाडाच्या बुंध्यापाशी झुपक्यात थरतात. पसरे आणि निमपसरे प्रकार गरवे म्हणजेच चार ते सहा महिन्यांत तयार होणारे असून त्यांच्या झाडांच्या फांद्या जमिनीच्या कमीजास्त प्रमाणात पसरत जातात व त्यांना जागोजाग जमिनीत शेंगा धरतात.

पेरणी व पेरणी अंतर:

•उन्हाळी भुईमूगाची पेरणी १५ जानेवारी - १५ फेब्रुवारीदरम्यान करावी.
•उन्हाळी हंगामात जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी. टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागते व उगवण चांगली होते.
•पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन झाडांमधील अंतर १० सें.मी.ठेवून करावी.
•उन्हाळी भुईमुगाची लागवड इक्रीसेंट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी.

बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया

१) जातनिहाय छोट्या आकाराचे दाणे असणाऱ्या जातींसाठी १०० किलो, मध्यम आकारचे १२५ किलो तसेच टपोरे दाणे असणाऱ्या जातींसाठी १२५ किलो बियाने वापरावे,
२) बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करावी.पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम रायझोबीयम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे व बीजप्रक्रीया केलेले बियाणे सावलीत सुकवूनपेरणी करावी.

खतमात्रा

•पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर १० टन शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रती हेक्टरजमिनीत मिसळून द्यावे.
•पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद याप्रमाणे रासायनिक खते द्यावेत.
•तसेच अधिक उत्पादनासाठी यासोबत जिप्सम ४०० कि/हे (२०० कि/हे पेरणीच्या वेळी व २०० कि/हे आन्या सुटतांना) जमिनीत मिसळून द्यावे.

आंतरमशागत:

•पीक तणविरहित ठेवावे त्यासाठी पीक २० दिवसांचे झाल्यावर फुले येईपर्यंत एक खुरपणी व दोन कोळपण्या द्याव्यात.
•झाडाला आरा आल्यावर कोणतीही आंतरमशागत करु नये पिकाला आऱ्या येण्यास सुरुवात झाल्यानंतर एकदा आणि त्यानंतर १०-१५ दिवसांनी पुन्हा एकदा मोठे रिकामे पिंप(ड्रम) पिकावर फिरविल्याने जमिनीत शिरणाऱ्या आऱ्याचे प्रमाण वाढते व उत्पन्नात वाढ होते.
•रासायनिक तण व्यवस्थापनासाठी पेरणी नंतर लगेच पेंडीमेथॉलीन १० किलो क्रि. घ. प्रती हेक्टरी १० लिटर पाण्यातून ओलीवर फवारणी करावी व २० ते २५ दिवसानंतर परसूट किंवा टरगासुपर १५ मिली प्रती हेक्टरी १० लिटर पाण्यातून द्यावे.

पीक फेरपालट

भुईमुगाचे पीक हे कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू, राजमा, एरड व भात अश्या विविध खरीप व रब्बी पिकांच्या फेरपालटीत घेतात आणि ते बहुधा स्वतंत्र पीक म्हणून घेतात परंतु केव्हा केव्हा याबरोबर बाजरी, मूग, चवळी, तीळ, सुर्यफूल वगैरे आंतरपिके किंवा मिश्रपीक म्हणूनही घेतात. सुरु उसात आंतरपीक म्हणून उपटी भुईमूग वाणाची लागवड करावी यासाठी ९० से.मी अंतरावर सरी पाडून त्यामध्ये उसाची लागवड करावी त्यानंतर एका आठवड्याने १० से.मी. अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस भुईमुगाची लागवड करावी.

पाणी व्यवस्थापन

जमीन वाफशावर असताना पेरलेल्या भुईमूगाची उगवण चांगली होण्यासाठी ३-४ दिवसांनी हलकसे पाणी द्यावे.जमिनीच्या प्रकारानुसार ८-१० दिवसांनी पाण्याच्या १० ते १२ पाळ्या द्याव्यात. भुईमूगाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ओलावा असणे फार महत्वाचे आहे. विशेषतः भुईमुगाला तुषार सिंचनाने पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

भुईमूगाच्या संवेदनशील अवस्था:

संवेदनशील अवस्था- दिवस
फुले येण्याची अवस्था- पेरणीनंतर २५-३० दिवस
आऱ्या सुटण्याची अवस्था- पेरणीनंतर ३५-४५ दिवस
शेंगा पोसण्याची अवस्था- पेरणीनंतर ६५-७० दिवस

पीकसंरक्षण

•टिक्का व ताबेरा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यास फ्ल्युबेडॅमाईड ३.५% यासोबत हेक्झाकोनॅझोल ५% डब्ल्यू.जी. २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
•रसशोषक किडीसाठी मिथिल डिमेटॉन २५ ई.सी. १५ मिली प्रती १५ लिटर पाण्यातून फवारणी करावी.
•फुलकिडे, तुडतुडे व नागअळी यांपासून संरक्षण करण्यासाठी क्विनॉलफॉस २५ ई.सी. २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

काढणी

भुईमूग पीक काढणीस येण्याच्या कालावधीमधे वाणांनुसार तफावत येते. जेव्हा पीक काढणीस तयार होते तेव्हा पाने पिवळी पडतात त्याचबरोबर शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू, काळी दिसते. अशी परिपक्वतेची काही चिन्हे जेव्हा दिसतात तेव्हा पीक काढणीसाठी तयार असते भुईमूग उपटून त्याच्या शेंगा तोडून घ्याव्यात तसेच उरलेला पाला जनावरांसाठी वाळलेला चारा म्हणून उपयोग होत असल्यामुळे व्यवस्थित जतन करून ठेवावा. अश्याप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उन्हाळी भुईमुगाचे सरासरी ३० ते ३५ किटल उत्पादन मिळू शकते.

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्रज्ञ एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प फुले कृषि विदयापीठ, राहुरी, मो. ९४०४०३२३८९
ऐश्वर्या राठोड, आचार्य पदवी विद्यार्थी,कृषि विद्या विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो. ८४११८५२१६४

English Summary: Groundnut cultivation Summer groundnut cultivation technology
Published on: 24 January 2024, 02:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)