Agripedia

हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात.

Updated on 13 June, 2022 1:10 PM IST

हिरवळीचे खते जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा करतात.जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते.याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.ताग,धैंचा,उडीद,मूग,चवळी,गवार, इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्यावर येण्यापूर्वी नांगरून जमिनीत गाडावीत. याचबरोबरीने गिरीपुष्प, सुबाभूळ, करंज या पिकाच्या कोवळ्या फांद्या व हिरवी पाने जमिनीत गाडून कुजवावीत.ताग - 1) हे पीक शेंगवर्गीय (द्विदल) वर्गातील असल्यामुळे याच्या मुळावर नत्र शोषण करणाऱ्या जिवाणूंच्या गाठी असतात.2) झाडाला चमकदार, लुसलुसीत, गर्द हिरव्या रंगाचे लांबोळकी आकाराची भरपूर पाने असतात. फुले पिवळ्या रंगाची असतात.3) पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजून हेक्‍टरी 50 ते 60 किलो नत्राचे स्थिरीकरण होते. सेंद्रिय पदार्थात 0.8 टक्के नत्र, 1 टक्के स्फुरद व 0.5 टक्के पालाश असते.

*लागवड तंत्र*1) हे पीक निचरा होणाऱ्या हलक्‍या ते भारी सर्वप्रकारच्या जमिनीत घेता येते. आम्ल व पाणथळ जमिनीत बीजोत्पादन घेऊ नये. पेरणी चांगला पाऊस पडल्यावर ताबडतोब करावी. लागवडीसाठी के-12, डी-11, एम-19, एम-35, नालंदा या जातींची निवड करावी. पेरणी सरत्याने किंवा तिफणीने, दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवून करावी. पेरणीसाठी हेक्‍टरी 25 ते 40 किलो बियाणे वापरावे. फेकीव पद्धतीकरिता हेक्‍टरी 55 ते 60 किलो बियाणे लागते.2) पेरणीपूर्वी 15 किलो बियाणास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सेंद्रिय शेती पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरू नये.3) आंतर मशागत करण्याची आवश्‍यकता नाही.पेरणीपासून 40 ते 50 दिवसांनी पीक फुलावर येण्यास सुरवात झाल्यानंतर नांगराच्या सहायाने जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीत 80 ते 120 किलो नत्र प्रति हेक्‍टरी साठविले जाते.

धैंचा 1) हे द्विदल वर्गीय पीक आहे. याच्या मुळावर, खोडावर व फांद्यांवर जिवाणूंच्या गाठी असतात. त्या हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. हे पीक तागाच्या तुलनेत विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.2) याची लागवड भात शेती किंवा उसात आंतर पीक म्हणून केली जाते. हे पीक पाणथळ, क्षारयुक्त, चोपण तसेच आम्लयुक्त हलक्‍या अथवा भारी अशा विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते.लागवड तंत्र- 1) खोल नांगरणी करून वखराच्या उभ्या-आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. चांगला पाऊस पडल्यावर पेरणी करावी. लागवडीसाठी स्थानिक जात किंवा टीएसआर-1 या जातीची निवड करावी. 2) सरत्याने पेरणी करताना त्यात माती किंवा बारीक रेती मिसळावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी 15 किलो बियाणास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.3) सेंद्रिय पद्धतीमध्ये रासायनिक खतांचा वापर व आंतर मशागत करू नये.4) पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांत पिकाची 100 ते 125 सें. मी. उंच वाढ होते. या अवस्थेत ट्रॅक्‍टरचलित नांगराच्या सहायाने जमिनीत गाडावे. त्यामुळे जमिनीत 70 ते 100 किलो नत्र प्रति हेक्‍टरी साठविले जाते.

हिरवळीच्या खतांचे फायदे1) जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि सूक्ष्म जिवांच्या क्रियांची गती वाढते.2) पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते, धूप कमी होते, जलधारणाक्षमता वाढते.3) मातीच्या रचनेत सुयोग्य बदल होतात.4) शेंगवर्गीय पीक हिरवळीच्या खतासाठी घेतल्याने जास्तीचे नत्र जमिनीत स्थिर होते, त्यामुळे पुढील पिकास नत्राची मात्रा कमी प्रमाणात लागते.5) हिरवळीची खते जमिनीत खालच्या थरात निघून जाणाऱ्या अन्नद्रव्यांना धरून ठेवण्यास मदत करतात. हिरवळीची पिके जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये वरच्या थरात आणतात.6) हिरवळीचे खत नत्रासोबतच स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोहाची उपलब्धता वाढविते.हिरवळीच्या पिकांची निवड 1) पीक शेंगवर्गीय (द्विदल) असावे.2) पीक हलक्‍या किंवा मध्यम जमिनीत वाढण्यायोग्य असावे.3) पिकास पाण्याची आवश्‍यकता कमी असावी.4) पिकांची मुळे खोलवर जाणारी असावीत, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषली जातात.5) वनस्पतीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असावे, जेणेकरून त्यांचे विघटन लवकर होईल.

English Summary: Greenery crops increase soil fertility and water holding capacity
Published on: 13 June 2022, 01:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)