आज कोणीही उठून इकडून तिकडून द्राक्षाचे शेड्युल बनवून बागेमध्ये ठराविक रक्कम घेऊन कन्सल्टंट बनतोय याच काळात ८५ वर्षाचा हा व्यक्ती अगदी फोन कॉलवर सुद्धा द्राक्ष पिकातील अनोळखी व्यक्तीच्या अडचणींवर अगदी २ मिनिटात उपाय सांगतो, ते ही एकही नवा पैसा न घेता. सकाळी ४ किलोमीटर चालणे, दिवसातून सकाळी व रात्री असे २ वेळ जेवण, मध्ये काहीही न खाणे तरीही दिवसभर अगदी १५ वर्षाच्या पोराप्रमाने कायम उत्साही राहून कोणत्याही गोष्टींचा कंटाळा न करणे ह्या गोष्टीतून खूप काही शिकता आलं. सचिनच्या १०० शतकांमुळे त्याच्या कितीतरी नव्वदीच्या खेळ्या आपण अगदी सहजपणे विसरून जातो अगदी त्याचप्रमाणे द्राक्षातील बहुमूल्य व ४५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सरांनी शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कार्यावर आपसूकच कानाडोळा होतो आणि त्यावरच दृष्टिक्षेप टाकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून लागल्यानंतरही आपले शिक्षण चालू ठेवून मुलांना शिकवता शिकवता शिक्षकांना शिकवायच्या कॉलेजात म्हणजेच प्राथमिक शाळेच्या शिक्षकापासून
बी. एड. कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू होणारे आणि गावकऱ्यांच्या इच्छेखातर प्राध्यापकाची नोकरी सोडून आपल्याच गावातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू होणाऱ्या माळी सरांनी त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले व शिक्षिका बनविले व सपत्नीक ज्ञानदानाचा दीप तेवत ठेवला. गावातील मुलांना शालाबाह्य होऊ न देणं, स्वतःच्या मुलांना ज्या प्रतीचे शिक्षण मिळेल त्याच प्रतीचे शिक्षण इतरांच्या मुलांना मिळावे या हेतूने सैनिक शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कितीतरी मुलांना त्यांनी आपल्या घरी ठेऊन त्यांचा सांभाळ केला व सैनिकी शाळेत प्रवेश मिळवून दिला, आणि तीच मुलं आज उच्चपदस्थ अधिकारी आहेत हे सांगताना माळी सरांना चेहऱ्यावरचे समाधान पाहून ‘सातवा वेतन आयोग’ तिथेच फिका पडतो. स्वतःच्या कारकीर्दीत स्वतःच्या खर्चाने गावातील शाळेच्या इमारतीचे बांधकाम असो किंवा कितीतरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवून त्यांची अप्रत्यक्षपणे घरं उभी करणे असो माळी दांपत्याचे हे कार्य मनाला भावते व समाजाप्रती एक व्यापक दृष्टिकोन देऊन जातो. माळी सरांसोबतच मॅडम सोबत संवाद साधताना त्या आजही या वयात आसपासच्या लहानग्यांच्या अक्षर वळणासाठी
निःशुल्क रोजचा एक तास देऊन त्यांच्या अक्षरांना वळणदार बनविण्यासाठी मेहनत घेतात हे पाहून त्यांच्यातील शिक्षक निवडणूका, पुरस्कार, पद प्रतिष्ठेच्या लोभात न अडकता ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतो ही गोष्ट आजच्या शिक्षकांसाठी नक्कीच एक आदर्श उदाहरण आहे.
माझ्यातील कुतूहल ही गोष्ट मला कधीच शांत बसू देत नाही आणि याच कुतूहलापोटी सरांनी घराचे नाव ‘अगत्य’ का ठेवले हे आम्ही त्यांना विचारले, तेव्हा आम्हाला त्यांनी शब्द आणि अनुभवाने असे दोन्ही पद्धतीने ते अतिशय उत्तमरीत्या सांगितले. द्राक्षगुरू म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाणारे आदरणीय प्रा. वसंत माळी सर एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला या २ दिवसात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.
या दांपत्याचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य पाहून मला इतिहासातील फुले दाम्पत्याला भेटल्याची अनुभूती मिळत होती आणि माणूस म्हणून कसे जगावे या कोड्याचे उत्तर मिळायला सुरुवात झाली होती.
- प्रतिक काटकर
Published on: 21 December 2021, 09:50 IST