Agripedia

विषय आहे पेरणी आली सावध व्हा, जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या मनातील चाललेली लगबग

Updated on 09 June, 2022 6:57 PM IST

विषय आहे पेरणी आली सावध व्हा, जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या मनातील चाललेली लगबग शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस म्हणजे पेरणीचा काळ, लगीन घरात जशी लगीनघाई असते तशीच लगबग शेतकऱ्यांना पेरणी काळात असते. पेरणी हा तसा शेतकऱ्यांसाठी केवळ गुंतवणूक आणि उत्पन्न एवढंच विषय नाही तर एक भावनिक नातं आहे.पहिल्या पावसाने ओलीचिंब झालेली काळीमाय इकडून तिकडे झुळक्या घेणारा वारा, झाडांवर जसा पक्षांचा चिवचिवाट होतो तसा सगळ्या शेतशिवारात शेकऱ्यांनी सर्जाराज्याला मारलेले आरोळीचा आवाज घुमत असतो.घरातल्या मायमाऊलीने आणलेला चटणी,भाकर,कांदा आणि लोणचं, हिरवी शाल पांघरलेल्या बांधावर बसून खाण्याची मजा काही औरचं. 

मागच्या काही दिवसांपासून वरुणराजा बरसतो आहे. ढगांचे गडगडाट सुरु झाले आहेत. त्या सोबतच काळी माय भिजून चिंब होण्यासाठी आतूर आहे. हे सगळं बघायला अनुभवायला जरी मस्त असलं तरी एक वेगळी धग आतून धुमसत आहे.गरम पातेल्यात फोडणी बसावी तसा मिरगाचा थोडा-थोडका पावसाचा सडा जेव्हा जमिनीवर पडतो तेव्हा मातीचा वरचा थर थोडासा ओलसर होतो पण त्या ओलसर थरखाली एक अस्वस्थ थर असतो ज्याला पाण्याची जास्त गरज असते. तशीच अवस्था शेतकऱ्यांची आहे. सर्वत्र पाऊस पडतो आहे म्हणून शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला आहे, पण अनेक अडचणी दारा समोर आ...वासून उभ्या आहेत, खत, बी -बियाणे खरेदी करायची आहेत.त्यामुळे नगदी पैसे जवळ असणं महत्वाचं झालं आहे.

मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे कृषी बाजारपेठ ठप्प होती. त्यामुळे उदारी हा प्रकार बंद पडण्याच्या मार्गावर आहे. बँका, सोनार, सावकार ,यांच्या दुकानां समोर रांगा लागल्याचं चित्र सर्वदूर पहायला मिळत आहे. कोणी पीक कर्ज उपलब्ध होईल का या आशेवरती आहे, तर कोणी बायकोची दागिने गहाण ठेवण्यासाठी किंवा मोड करण्यासाठी सोनाराच्या दुकानात आहे. ज्यांच्याकडे सोनं, पैसे नाहीत ते सावकारकडे तळ ठोकन आहेत. असे मनाला वेदना देणार चित्र पेरणीच्या काळात सर्वत्र पहायला मिळतं. कोरोना काळात दवाखान्यांनी लुटलं. आता व्यापाऱ्यांची वेळ आली आहे. अनावश्यक खतं, बियाणे, औषधी, शेतकऱ्यांच्या माथी मारण्याची स्पर्धा लागली आहे.मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे कापसाने धोका दिला. मूग उडीद पुरते वाया गेले. सोयाबीन ने कसंबसं तारलं. पण पुन्हा एक कृषी क्षेत्रात यावर्षी अफवा निघाली आहे. या वर्षी कापसाला भाव चांगला मिळणार आहे.

म्हणजे शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतील. याचं कारण सोयाबीन पेक्षा कापसाचा उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामूळे कापसासाठी मोठ्या प्रमाणात खते-कीटकनाशके लागतात आणि कृषी व्यापारव्यवस्था तेजीत येते. यावर्षी शेतकरी या जाळ्यात पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे.मागच्या काही दिवसाच्या पावसामूळे शेतीच्या मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. सर्वत्र शेतीकामे,शेतीअवजारे अन्य वस्तू खरेदीची लगबग पण जोरात सुरू आहे, या सगळ्या घाई गर्दीत शेतकरी बांधवांना विनंती आहे. घाई करू नका बी बियाणांची योग्य माहिती घ्या, आवश्यक तेवढीच खरेदी करा, सरकारने पीक कर्ज प्रक्रिया सुलभ करावी, पीक कर्जासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठीच्या उपाय-योजना कराव्यात, शेतकऱ्यांनी दर्जेदार बियाणे खरेदी करावीत आणि काळ्यामायीची ओठी भरावी.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे

९४०४०७५६२८

English Summary: Good sowing! Be careful this way
Published on: 09 June 2022, 06:57 IST