Agripedia

शेतकरी आणि पशुपालक मित्रानो महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होताच शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये मावा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

Updated on 23 January, 2022 7:47 PM IST

शेतकरी आणि पशुपालक मित्रानो महाराष्ट्रामध्ये पावसाळा सुरू होताच शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये मावा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

शेळ्या-मेंढ्यांमध्ये आढळणारा मावा हा विषाणूजन्य रोग असून लहान करडांमध्ये आणि शेळ्यांमध्ये याची लागण जास्त प्रमाणात होते.

मावा हा संसर्गजन्य रोग असल्याने या रोगाची लागण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास झटपट होते त्यामुळे हा रोग वेगाने सर्वत्र पसरतो.

मावा या रोगामध्ये मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी या रोगाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असल्याने, योग्य उपाययोजना व उपचार न केल्यास जनावरे अशक्त होतात, व जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरे इतर रोगांना बळी पडतात.

या रोगाची लागण झाल्यास जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते, पिल्लांच्या वाढीचा दर कमी होतो, त्याचप्रमाणे काही शेळ्यामध्ये कासदाह झालेला दिसून येतो.

 

मावा रोगाचा प्रसार होण्यामागील कारणे.

मावा हा विषाणू पासून होणारा संसर्गजन्य रोग असल्याने एका जनावरा पासून दुसऱ्या जनावराला या रोगाचा संसर्ग होतो.

जनावरांच्या आहारात समावेश केलेल्या हिरव्या चाऱ्यावर विषाणूजन्य रोग पडला असल्यास किंवा चरण्यासाठी सोडलेल्या जनावरांनी विषाणूजन्य रोग पडलेला चारा खाल्ल्यास जनावरांच्या तोंडावर जखमा होतात व त्यातूनच विषाणूंचा संसर्ग होतो.

बाधित जनावरांचा संपर्क चाऱ्यामार्फत आणि पाण्यामार्फत निरोगी जनावरांशी आल्यास किंवा निरोगी व बाधित जनावरे गोठ्यामध्ये एकत्र ठेवल्यास रोगाचा प्रसार होतो.

मावा या रोगाची लागण झालेल्या जनावरांच्या जखमेच्या खपल्यापासून इतर जनावरांना या विषाणूजन्य रोगाचा संसर्ग होतो.

 

मावा या रोगामध्ये आढळणारी लक्षणे. 

पावसाळ्यात शेळ्या मेंढ्यांमध्ये मावा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

मेंढ्यांच्या तुलनेत शेळ्यांना या रोगाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असते.

शेळ्यांच्या तोंडामध्ये, तोंडावर, तोंडाभोवती, नाकाभोवती फोड येतात, काही कालावधीनंतर फोड फुटल्याने जनावरांच्या शरीरावर जखमा व व्रण आढळून येतात.

तोंडावरील जखमांवर योग्य वेळी उपचार न केल्यास, जखम चिघळून त्यावर माशा बसल्याने जखमेवर आळ्या पडतात.

तोंडावरील जखमा सुकून त्यावर खपली तयार होते, काही दिवसात जखमावरील खपल्या निघून जातात.

जखमांच्या निघालेल्या खपल्यांमध्ये विषाणू असल्याने खपल्यांशी संपर्क आल्यास इतर जनावरांनाही या रोगाची लागण होते.

लहान करडांमध्ये सुरुवातीला हिरड्यांवर पुरळ येतात, पुरळ फुटल्यानंतर हिरड्या लालसर होऊन त्याठिकाणी गाठी तयार होतात त्यामुळे करडांना स्वतःहून दूध पिण्यास अडचणी येतात.

लागण झालेल्या करडांना शेळीचे दुध पिण्यासाठी सोडले असता शेळीच्या सडालाही संसर्ग होण्याची शक्यता असते.

शेळीच्या सडाला लहान फुटकुळ्या येतात व कधीकधी कासदाह झालेला आढळून येतो.

मावा या रोगाची लागण झालेल्या शेळ्या, मेंढ्याना सुरुवातीला ताप येतो त्यामुळे जनावरांचे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.

 

मावा रोगावरील उपचार.

जनावरांच्या तोंडावरील जखमा एक टक्के पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने दिवसातून २-३ वेळा धुवायला हव्यात.

बोरिक ॲसिड पावडर व ग्लिसरीन मिक्स करून किंवा जंक्शन व्हायलेट जखमेवर लावावे.

तोंडावरील जखमांवर बोरोग्लिसरिन किंवा जंतू व माशा प्रतिबंधक मलम लावावे.

घरगुती उपचार म्हणून कापूर आणि हळद समप्रमाणात घेऊन त्यात आवश्यकतेनुसार खोबरेल तेल मिक्स करून मलम तयार करावे आणि तयार केलेले मलम जखमांच्या खपल्यांवर लावावे.

जखमेवर किडे पडल्यास त्यावर टर्पेंटाइन तेलाचा बोळा ठेवावा व बोळा काढल्यानंतर जखमेतील मेलेल्या आळ्या काढून टाकाव्यात.

ताप कमी होण्यासाठी व दुसऱ्या जीवाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून पशुवैद्यकांच्या सल्ल्याने प्रतिजैविकांचा वापर करावा.

जखमेवरील खपली निघाल्यानंतर जखमेवर करंजी तेल किंवा सल्फर युक्त मलम लावावा.

आजारी जनावरांना हलका व सकस आहार द्यावा त्याचबरोबर मुबलक प्रमाणात पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे.जनावरांच्या आहारामध्ये कोवळा लुसलुशीत चारा, मेथी घास यांचा समावेश करावा त्याचबरोबर पाण्यामध्ये गूळ व ग्लुकोज पावडर मिसळून द्यावे.

 

रोगप्रतिबंधात्मक उपाय योजना.

मावा या रोगाची लक्षणे आढळल्यास आजारी जनावरांस इतर जनावरांपासून वेगळे ठेवुन आजारी जनावरांची चारा पाण्याची वेगळी व्यवस्था करावी.

जनावरांचा गोठा आणि आजारी जनावरे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवावी.

जखमांच्या खपल्या पासून इतर जनावरांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असते त्यामुळे जखमावरील निघालेल्या खपल्या योग्य पद्धतीने जाळून टाकाव्यात.

आजारी करडांना योग्य प्रमाणात बाटलीच्या साह्याने दूध पाजावे जेणेकरून करडे अशक्त पडणार नाही आणि शेळ्यांना कासेचा संसर्ग होणार नाही.

मावा या रोगाची लागण झालेल्या जनावरांना चरण्यासाठी सोडू नये.

रोगयुक्त चारा पिकांचा समावेश जनावरांच्या आहारामध्ये करू नये.

लागण झालेल्या जनावरांची काळजी घेताना, दूध काढताना, जखमांवर उपचार करताना हॅन्ड ग्लोजचा वापर करावा.

 

संकलन : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Goat and sheep mava disease symptoms and management
Published on: 23 January 2022, 07:47 IST