Agripedia

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी.

Updated on 24 April, 2025 12:45 PM IST

डॉ. आदिनाथ ताकटे

राज्यात सर्वसाधारणपणे ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. त्यातील ९५ % क्षेत्रावर बी.टी. वाणांची  लागवड राज्यातील शेतकरी करतात. कपाशीच्या भरघोस उत्पादनासाठी सेंद्रिय खतांबरोबर, रासायनिक खतांचा वापर करणे अपरिहार्य आहे. यासोबतच मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही दुय्यम तर जस्त, बोरॉन, लोह, मँगनीज, मॉलिब्डेनम इ. सारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील थोड्या प्रमाणात आवश्यकता भासते.राज्यातील खानदेश व पश्चिम महाराष्ट्र  साठी आणि विदर्भ व मराठवाडा विभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास उत्पादन वाढेल व जमिनीची सुपिकता टिकून राहील.

  • कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.
  • कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात, ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात.कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

सेंद्रिय खते, जीवाणू खते, हिरवळीची खते आणि रासायनिक खतांचा योग्य पीक अवस्थेत एकत्रित वापर करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खते

  • सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. जलधारणाशक्ती वाढते, हवा खेळती राहते आणि अन्नद्रव्य उपलब्ध व विद्राव्य करुन देणा-या जिवाणूची संख्या वाढण्यास मदत होते. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात सकारात्मक बदल होतो. 
  • शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी ५ टन (१०-१२ गाड्या) शेणखत /कंपोस्ट खत अथवा २.५ टन गांडूळ खत  व बागायती लागवडीसाठी १० टन (२०-२५ गाड्या) शेणखत /कंपोस्ट खत अथवा ५ टन गांडूळ खत मिसळावे. चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात टाकल्यामुळे मॅग्रेशियम, झिंक इत्यादी सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते.
  • खते कमी असल्यास लागवडीच्या वेळी प्रत्येक फुलीवर छोटा खड्डा घेऊन त्यात ओंजळभर शेणखत टाकावे व मातीत चांगले मिसळावे

जीवाणू संवर्धक

  • हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
  • तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फूरद विरघळणा-या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.

रासायनिक खते :

  • बागायती कपाशी ही रासायनिक खतांच्या मात्रांना योग्य प्रतिसाद देते म्हणून खतांचा पुरवठा ही एक महत्त्वाची बाब आहे. 

खानदेश व पश्चिम महाराष्ट्र  करिता शिफारशीत खत मात्रा

  • कोरडवाहू बी.टी.कापूस  शिफारशीत खत मात्रा:१००:५०:५०  नत्र:स्फुरद:पालाश किलो/हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी २०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =४३ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  स्फुरदाची  मात्रा एस एस पी द्वारे = ३१३ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  पालाशची मात्रा एम ओ पी द्वारे = ८४ किलो/ हेक्टरी
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =८७  किलो / हेक्टरी
  • पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =८७ किलो / हेक्टरी
  • बागायती बी.टी.कापूस शिफारशीत खत मात्रा: १२५:६५:६५ नत्र:स्फुरद:पालाश किलो /हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी २०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =५४  किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  स्फुरदाची  मात्रा एस एस पी द्वारे = ४०६ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  पालाशची मात्रा एम ओ पी द्वारे = १०९ किलो/ हेक्टरी
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =१०८ किलो / हेक्टरी
  • पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =१०८ किलो / हेक्टरी

विदर्भ  व मराठवाडा विभाग करिता शिफारशीत खत मात्रा

  • कोरडवाहू बी.टी. कापूस शिफारशीत खत मात्रा:१२०:६०:६० नत्र:स्फुरद:पालाश किलो प्रति हेक्टर
  • पेरणीच्या वेळी ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =१०४ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  स्फुरदाची  मात्रा एस एस पी द्वारे = ३७५  किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण    पालाशची  मात्रा  एम ओ पी द्वारे = १०० किलो/ हेक्टरी
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी  ३०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =७८   किलो / हेक्टरी
  • पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ३०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =७८ किलो / हेक्टरी
  • बागायती बी टी कापूस शिफारशीत खत मात्रा: १५०:७५:७५ कि.ग्रॅ. नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टर
  • पेरणीच्या वेळी २०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =६५ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  स्फुरदाची  मात्रा एस एस पी द्वारे = ४६९ किलो / हेक्टरी
  • पेरणीच्या वेळी संपूर्ण  पालाशची मात्रा एम ओ पी द्वारे = १२५ किलो/ हेक्टरी
  • पेरणीनंतर ३० दिवसांनी ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =१३०   किलो / हेक्टरी
  • पेरणीनंतर ६० दिवसांनी उर्वरित ४०% नत्राची मात्रा युरिया खताद्वारे =१३०  किलो / हेक्टरी

दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये :

नत्र, स्फुरद व पालाश या प्रमूख घटकाव्यतिरिक्तं मॅग्नेशियम,गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची लोह,जस्त,मॅगनीज आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा गरज असते.माती परीक्षण करून कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तज्ञाच्या सल्ल्याने द्यावा.

  • गंधक - २० किलो /हेक्टरी          
  • मॅग्नेशियम सल्फेट-२० किलो /हेक्टरी
  • झिंक सल्फेट - २५ किलो /हेक्टरी    
  • फेरस सल्फेट - २० किलो /हेक्टरी
  • बोरॅक्स - ५ किलो /हेक्टरी

सुक्ष्म अन्नद्रव्य देण्याची पद्धत:

एक बैलगाडी शेणखत किंवा कंपोस्ट खत डेपो सावलीत करावा. यामध्ये ५ किलो झिंक सल्फेट, ५ किलो फेरस सल्फेट, ५ किलो मँगनीज सल्फेट, १ किलो बोरॉन टाकून डेपो एकवेळ खो-याने चांगला मिसळून घ्यावा. त्यानंतर ५० लिटर पाण्यात १ किलो अॅझॅटोबॅक्टर, १ किलो ट्रायकोडर्मा व ५ किलो पीएसबी मिसळून हे द्रावण या डेपोवर शिंपडावे. परत एकदा हा डेपो चांगला मिसळून घ्यावा. हा डेपो सावलीत ७ दिवस ओलसर राहिल या पद्धतीने ठेवावा.कापूस लागवडीनंतर १८ ते २१ दिवसांदरम्यान पडणा-या पाळी बरोबर तो एक एकर क्षेत्रामध्ये जमिनीत मिसळावा.

रासायनिक खतांचा योग्य वापर 

  • खतांची पहिली मात्र लागवडीच्या वेळी द्यावी. 
  • नत्रयुक्त खते विभागून  द्यावीत. 
  • नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर टाळावा.
  • नत्राच्या अतिरिक्त वापरामुळे उत्पादनामध्ये घट येते.
  • मुख्य अन्नद्रव्यासोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये मिसळून देऊ नयेत.

तक्ता १:खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू व बागायती बी टी.कपाशी साठी खत व्यवस्थापन

खते देण्याची वेळ

कोरडवाहू बी टी.कपाशी

( किलो /हेक्टरी)

बागायती बी टी.कपाशी

( किलो /हेक्टरी)

नत्र

(युरिया)

स्फुरद

(एसएसपी)

पालाश/

(एमओपी)

नत्र

(युरिया)

स्फुरद

(एस एसपी)

पालाश/

(एमओपी)

लागवड 

२०

(४३)

५०

(३१३)

५०

(८४)

२५

(५४)

६५ 

(४०६)

६५

(१०९)

३० दिवसांनी 

४०

(८७)

-

-

५०

(१०८)

-

-

६० दिवसांनी 

४० 

(८७)

-

-

५०

(१०८)

-

-

एकूण 

१००

(२१७)

५०

(३१३)

५०

(८४)

१२५

(२७१)

६५

(४०६)

६५

(१०९)

( ) कंसातीलआकडे युरिया,एसएसपी आणि एमओपी या खतांचे दर्शवितात  

तक्ता २:विदर्भ  व मराठवाडा करिता कोरडवाहू व बागायती बी टी.कपाशी साठी खत व्यवस्थापन

खते देण्याची वेळ

कोरडवाहू बी टी.कपाशी

( किलो /हेक्टरी)

बागायती बी टी.कपाशी

( किलो /हेक्टरी)

नत्र

(युरिया)

स्फुरद

(एसएसपी)

पालाश

(एमओपी)

नत्र

(युरिया)

स्फुरद

(एसएसपी)

पालाश

(एमओपी)

लागवड 

४८

(१०४)

६०

(३७५ )

६०

(१०० )

३०

(६५)

७५

(४६९)

७५

(१२५)

३० दिवसांनी 

३६

(७८)

-

-

६०

(१३०)

-

-

६० दिवसांनी 

३६

(७८)

-

-

६०

(१३०)

-

-

एकूण 

१२०

(२६०)

६०

३७५)

६०

(१००)

१५०

(३२५)

७५

(४६९)

७५ 

(१२५)

()कंसातील आकडे युरिया ,एसएसपी आणि एमओपी या खतांचे दर्शवितात  

विद्राव्य खताची फवारणी 

  • कपाशीला पाते लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर साधारणत: ४५ दिवसानंतर) दोन टक्के डी.ए.पी. खताची (२०० ग्रॅम खत प्रति १० लिटर पाणी ) व 
  • बोंडे लागण्याच्या वेळी (पेरणीनंतर ७५ दिवसांनी) दोन टक्के युरिया पाण्यात मिसळून (२०० ग्रॅम खत प्रति १० लिटर पाणी) पिकावर फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
  • कोरडवाहू लागवडीमध्ये पीक वाढीच्या काळात पावसाची उघडीप असल्यास २ टक्के पोटॅशियम नायट्रेटची (२०० ग्रॅम खत प्रति १० लिटर पाणी) फवारणी १५ दिवसांच्या आत करावी

फवारणी द्वारे द्यावयाच्या खतांचे वेळापत्रक :

खत /प्रकार

खताचे प्रमाण

वेळ/अवस्था

खताची मात्रा १० लिटर पाण्यात

युरिया

२%

३० - ४० दिवस

२०० ग्रॅम

डीएपी 

२%

६० - ६५ दिवस

२०० ग्रॅम

मॅग्नेशियम सल्फेट

०.२%

पाते व फुले लागताना

२० ग्रॅम

बोरॅान 

०.१%

फुले लागताना

१०  ग्रॅम

पोटॅशियम नायट्रेट( १३:०:४५)

२%

६० व ९० दिवसांनी

२०० ग्रॅम

ग्रेड २ सुक्ष्म अन्नद्रव्ये 

०.५%

फुले व बोंडे लागताना

५०  ग्रॅम

लेखक - डॉ. आदिनाथ ताकटे,मृद शास्रज्ञ कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर, मो.९४०४०३२३८९

English Summary: Give cotton a balanced fertilizer agriculture update
Published on: 24 April 2025, 12:45 IST