Agripedia

सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेबर-ऑक्टोबर व जानेवारी–फेब्रुवारी या महिन्यात खते द्यावीत. परंतू खते देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत.सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत,संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यात विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Updated on 04 July, 2024 9:25 AM IST

डॉ.आदिनाथ ताकटे, राहुल पाटील

फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे.यापैकी खत व्यवस्थापनास अन्यन साधारण महत्व आहे. फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे.

फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्न्द्रव्यावर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते.त्यामुळे या दोन महत्वाच्या बाबीपैकी जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीच्या सुपिकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे किडी व रोगास बळी पडतात.झाडांची वाढ निकोप व्हावी म्हणून योग्य मशागत, तणांचा बंदोबस्त,खतांचा संतुलित पुरवठा,सेंद्रीय पदार्थांचे आछादन म्हणून वापर,आच्छादनाची पिके,आंतरपिके इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपिकता चागली ठेवणे फायदेशीर ठरते.

फळ झाडांना खते देण्याची योग्य वेळ :

सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेबर-ऑक्टोबर व जानेवारी–फेब्रुवारी या महिन्यात खते द्यावीत. परंतू खते देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत.सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत,संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यात विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

फळझाडांना खते देण्याची पद्धत :

खताची मात्रा देताना मोठ्या विस्ताराखाली खोडापासून एक मीटर लांब ४० ते ५० से.मी. रुंद आणि १५ से. मी. खोल वर्तुळाकार चर काढावा.प्रथम चरात पालापाचोळा आणि शेणखत नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.

सिताफळ:पूर्ण वाढलेल्या (४ वर्ष +) झाडास ३० ते ४० किलो शेणखत,५५०:१२५:१२५ ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रती झाड( ५५० ग्रॅम युरिया, ८०० ग्रॅम एसएसपी व २०० ग्रॅम एमओपी) प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे.शेणखताबरोबर अॅझोस्पिरीलम व पीएसबी या जीवाणू खतांचा वापर करावा.

बोर: पूर्ण वाढलेल्या झाडास शेणखत ५० किलो प्रती झाडास छाटणी नंतर द्यावे. २५:२५०:५० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रती झाड( अर्धा किलो युरिया, दीड किलो एसएसपी व एक किलो एमओपी) प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे.

आवळा:पूर्ण वाढलेल्या( ५ वर्ष व नंतर ) झाडास ५० किलो शेणखत ५००:२५०:२५० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रती झाड( १ किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी ) प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे

जांभूळ:पूर्ण वाढलेल्या( ५ वर्ष व नंतर ) झाडास ५० किलो शेणखत ५००:२५०:२५० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रती झाड( १ किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी ) प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे.

चिंच:पूर्ण वाढलेल्या ( ५ वर्ष व नंतर ) झाडास ५० किलो शेणखत ५०० : २५० :२५० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश प्रती झाड( एक किलो युरिया, दीड किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी ) प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे.

कवठ: पूर्ण वाढलेल्या( ५ वर्ष व नंतर ) झाडास ५० किलो शेणखत ३५० : २५०: २५० ग्रॅम नत्र: स्फुरद: पालाश (पाऊण किलो युरिया, दीड किलो किलो एसएसपी व अर्धा किलो एमओपी ) प्रती झाड प्रती वर्ष द्यावे. नत्र दोन समान हफ्त्यात विभागून द्यावे.

लेखक - डॉ.आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी, मो.९४०४०३२३८९
राहुल पाटील, उद्यान विद्या विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी

English Summary: Give balanced fertilizers to dry fruit trees
Published on: 04 July 2024, 09:25 IST