या निर्णयाच्या अमलबजावणीत जी अनेक आव्हाने समोर उभी आहेत, त्याचा पण विचार करणे अत्यावश्यक आहे!
मुळात मुलीच्या लग्नाचे वय १८ वरुन २१ वर नेणेबाबतचे मुख्य उद्दीष्टे काय असावीत? बालविवाहास प्रतिबंध करुन मुलींच्या उच्चशिक्षणासाठी संधी उपल्ब्ध करुन देणे, मुलींच्या आरोग्य रक्षणास साह्य करणे आणि लोकसंख्या वाढीची गति कमी करणे ही संभावित कारणे असू शकतात!
बालविवाह प्रतिबंधाच्या बाबतीत विचार केला तर, आजची जी १८ वर्षाची वयोमर्यादा आहे, तशी ती ठिकच आहे! जगातील बहुसंख्य राष्ट्रात पण १८ वर्षाचीच वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. जगातील एकूण १९६ राष्ट्रापैकी फ़क्त चीन आणि इतर तीन-चार राष्ट्रांनीच फ़क्त २१ ची वयोमर्यादा निश्चित केलेली आहे पण तिथे पालकांच्या संमतीने होणार्य़ा विवाहाची वयोमर्यादा १६ वर्षे ठेवण्यात आलेली आहे, आपल्या देशात पालकांच्या संमतीने केले जाणारे विवाह आणि मुलां-मुलींनी स्वेच्छेने केले जाणारे विवाह यांच्यासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा निश्चित केलेल्या नाहीत! आपल्या देशात येऊ घातलेली २१ ची वयोमर्यादा मुलां-मुलींनी स्वेच्छेने करावयाच्या लग्नासाठी निश्चित करुन पालकांच्या संमतीने होणार्य़ा लग्नाची वयोमर्यादा १८ वर्षे अशी ठेवली तर शिक्षण खंडीत झालेल्या मुलीं आणि पालकांसाठी ही दिलासादायक बाब ठरेल!
तुर्त या स्थितीत ज्या कुटुंबातील मुलींचे शिक्षण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खंडीत झाल्यामुळे ज्या विवाहाच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हा येऊ घातलेला नवा निर्णय त्यांच्या काळजाचा ठोका चुकविणारा ठरणार आहे! आजच्या स्थितीत ज्या मुली उपवर असून शिक्षणापासून वंचित आहेत, अर्थात ज्यांचे शिक्षण खंडीत झालेले आहे, किमान अशा मुलींसाठी हा निर्णय लगेच लागु करणे अन्यायकारक ठरणार आहे! हा निर्णय लागु करायचाच असेल तर त्याच्या अमलबजावणीची कालमर्यादा अजून किमान तीन-चार वर्षे तरी पुढे ढकलावी लागेल. यदाकदाचित असे झाले नाही तर हा निर्णय निष्प्रभ ठरल्याशिवाय राहणार नाही!
मुलींचे लग्नाचे वय २१ वर नेण्याचा निर्णय घेत असतांना कितीही सकारात्मक दृष्टीकोण ठेवण्यात आलेला असला तरी आजच्या स्थितीत पण महाराष्ट्रातील १८ च्या आत लग्न होणार्या मुलींचे प्रमाण हे २१ टक्के आहे, आणि अखिल भारतीय स्तरावर हे प्रमाण २६ टक्के आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही! जिथ कायदेशीर लग्नासाठी वयाची १८ वर्षे मर्यादा असतांना बालविवाह शुन्यावर आणता आलेली नाही, तिथे ही मर्यादा २१ नेणे ही प्रचंड महत्वाकांक्षा ठरते आहे!
आजच्या स्थितीत ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत, त्याचे मुख्य कारण त्यांची शिक्षण घेण्याची क्षमता असणे जसे कारण आहे तसेच त्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता असणे हे पण कारण आहे! ज्या मुली आजच्या घडीला उच्चशिक्षणात नाहीत ते केवळ लग्नाची वयोमर्यादा २१ वर्षे नाही म्हणून नाही, असे खचितच नाही!
केवळ लग्नाची वयोमर्यादा वाढवल्यांने बालविवाह थांबतील काय? मुलींचे शिक्षण खंडीत होताच लग्न हा ऐकमेव पर्याय त्यांच्या समोर असतो. आजच्या स्थितीत ज्या मुली इयत्ता १२ वी नंतर पुढे शिक्षण घेत नाहीत याचे ऐकमेव कारण लग्नासाठीची वयोमर्यादा वाढीव नाही, हे निश्चितच नाही! गावात किंवा गावाच्या जवळ उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध नसणे,
उच्चशिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नसणे आणि सामाजिक असुरक्षेची भावना मुली आणि पालकांत असणे या मुलींच्या उच्चशिक्षणात अडसर आणणार्या मोठ्या बाबी आहेत, या समस्यांचे निराकरण सरकार करणार असेल तर लग्नाच्या वयाची मर्यादा वाढवणे हे मुलींच्या दृष्टीने वरदान ठरणारे ठरेल, अन्यथा ही वाढीव वयोमर्यादा मुली आणि त्यांच्या पालकांच्या पायातील बेडी ठरेल!
याशिवाय लैंगिक शिक्षणाचा अभाव असणे हे बालविवाहाच्या प्रमुख कारणापैकी एक कारण असून, लग्नाची वयोमर्यादा १८ वर्षे असो की, ती २१ वर्षे असो जोपर्यंत परिपूर्ण रितीने शाळ-कॉलेजसमधून लैंगिक शिक्षण दिले जाणार नाही तोपर्यंत बालविवाहास प्रतिबंध बसण्यासाठी योग्य गति मिळणार नाही! अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत मुलां-मुलींना लैंगिक शिक्षणाची गरजच काय इथपासून ते यामुळे मुले अजून अधिक बिघडतील अशी मानसिकता असतांना शासन हे आव्हान समर्थपणे पेलू शकेल काय हा पण महत्वाचा प्रश्न आहे!
एका तरून स्त्रीने नव्याने येऊ घातलेल्या या कायदादुरुस्ती बाबत माझ्याकडे प्रतिक्रिया नोंदवितांना सांगितले की, “ सरकार समाजातील सर्व मुलींसाठी निर्वाह भत्यासह सर्वथा मोफ़त शिक्षणाची सोय करणार असेल तर लग्नाची वयोमर्यादा २१ करणे उपयुक्त ठरेल अन्यथा फ़क्त कायदा दुरुस्तीची घोषणा करुन सरकार बाजूला होणार असेल तर हा निर्णय चुकलेला असेल, पुर्वी लोक किमान १८ वर्षे वय होण्याची वाट पाहत असत, आता तर तेवढी पण वाट पाहणार नाहीत!”
- मच्छींद्र गोजमे
शेतकरी
Published on: 21 December 2021, 09:28 IST