Agripedia

जमिनीचा सामू जसा वाढतो तसतसे उपलब्ध मॉलीब्डेनमचे प्रमाण वाढते.

Updated on 13 May, 2022 11:36 AM IST

याउलट जमिनीचा सामू जसजसा कमी होतो, तसतशी मॉलीब्डेनमची कमतरता वाढते. मॉलीब्डेनमयुक्त खते वापरून या अन्नद्रव्याची कमतरता भरून काढता येते.वनस्पतीतील कार्य -द्विदल धान्यामध्ये नत्रीकरणाचा वेग वाढविण्यास हे सूक्ष्मअन्नद्रव्य मदत करते. मॉलीब्डेनम उपस्थितीमध्ये

नत्रस्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जंतूची क्रियाशीलता वाढते. पिकांमध्ये मॉलीब्डेनमची कमतरता असेल तर प्रथिनांचे संक्रमण योग्यरीत्या होत नाही. प्रथिन संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पिकांमधील नायट्रेटयुक्त नत्राचे प्रमाण वाढते. नायट्रेटीकरण करणाऱ्या विकराच्या निर्मितीसाठी मॉलीब्डेनम हा आवश्यक घटक आहे. पिकामधील प्रकाश-संश्लेषण आणि श्वासोच्छवास क्रियांवर मॉलीब्डेनम नियंत्रण ठेवते.

कमतरतेची लक्षणे -पिकाची नत्रशोषण शक्ती मॉलीब्डेनमच्या कमतरतेमुळे कमी होते. परिणामी पिके पिवळी पडतात. मॉलीब्डेनम कमतरतेमुळे फुलकोबीच्या पानाच्या सर्व बाजूला गेरवा रंग येऊन पाने कोरडी पडतात. पानातील कोश अस्ताव्यस्त होतात. पानातील मधील मोठी शीर कायम राहून अन्य पाने वेडवाकडी किंवा नागमोडी होतात. ते चुरमूडल्यासारखे दिसते. याला ‘व्हिपटेल’ रोग म्हटले जाते. फुले-फळे गळायला लागतात. पुष्कळदा दाणे आणि फळेसुद्धा भरत नाहीत.

मॉलीब्डेनमयुक्त खते -अमोनियम मॉलीब्डेनम (५४.० टक्के मॉलीब्डेनम), सोडीयम मॉलीब्डेनम (३९-४१ टक्के मॉलीब्डेनम) आणि मॉलीब्डेनम ॲसिड (४७.५ टक्के ).वापरण्याची पद्धत -या खतांची मात्रा अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताच्या तुलनेत अतिशय कमी लागते. त्यामुळे मॉलीब्डेनमयुक्त खते फवारणीतून दिली जातात किंवा मॉलीब्डेनमची बीजप्रक्रिया करून नंतर पेरणी करतात.

 

संकलन - कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

English Summary: Functions and information of molybdenum
Published on: 13 May 2022, 11:36 IST