Agripedia

फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून, घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते.

Updated on 08 January, 2022 9:50 AM IST

फळमाशी आकाराने ७ मिमी लांब असून, घरमाशीएवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखांची एकच पारदर्शक जोडी असते.

 

जीवनक्रम :

चार अवस्था - अंडी, अळी, कोष आणि माशी.

अंडी ः फळमाशीची मादी टोकदार अंडनलिकेच्या साह्याने फळांच्या सालीवर छिद्रे पाडून त्याखाली अंडी घालते. एका छिद्रात १ ते १५ अंडी असू शकतात. एक मादी एका महिन्याच्या कालावधीत सुमारे १५० ते २०० अंडी घालते. अंडी १ मिमी लांबीची आणि पांढऱ्या रंगाची असतात. ही अंडी हवामानापरत्वे एक आठवड्यात उबतात.अळी अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पिवळसर रंगाच्या व मागील बाजूस निमुळत्या असतात. त्यांना पाय नसतात. अळ्यांची वाढ एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होते. अळीचा कालावधी उन्हाळ्यात व पावसाळ्यात ६ दिवस असतो. परंतु, तापमान कमी असल्यास तो २९ दिवसांपर्यंत वाढू शकतो. पूर्ण वाढलेल्या अळ्या फळाला छिद्रे पाडून बाहेर पडतात. जमिनीवर खाली पडून जमिनीत ८ ते १६ सेंमी खोलीवर कोषावस्थेत जातात.

कोष रेशमी कवचाचे आणि दोन्ही बाजूस निमुळते असतात. त्यांचा रंग पिवळसर तांबूस असतो. कोषावस्थेचा कालावधी उन्हाळ्यात ६ दिवस, तर तापमान कमी होत गेल्यास ४४ दिवसांपर्यंत वाढतो. जमिनीत कोषावस्था पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे एका आठवड्यानंतर त्यातून माश्या बाहेर पडतात आणि पुढे अंडी घालण्यास सुरू करतात. अशा प्रकारे जीवनक्रमाचा कालावधी छोटा असल्यामुळे हवामानानुसार आणि फळांच्या उपलब्धतेनुसार फळमाशीच्या वर्षभरात अनेक पिढ्या तयार होतात. ही कीड जवळपास वर्षभर आढळून येते. मात्र, मोठ्या प्रमाणावर मे ते जुलै या कालावधीत आढळते. वर्षभर फळांची उपलब्धता असल्याने फळमाशींचा प्रादुर्भाव सुरू राहतो.

 

नुकसानीचा प्रकार :

 या अळ्या फळातील गर खातात. कीडग्रस्त फळे सडून पडतात. मादीने अंडी घालण्यासाठी फळांच्या सालीवर पाडलेल्या छिद्रातून फळांत सूक्ष्म रोगकारक घटकांचा शिरकाव होतो, त्यामुळे संपूर्ण फळ सडून जाते. बऱ्याच वेळा फळमाशीने प्रादुर्भाव झालेली फळे बाहेरून चांगली दिसतात. पण, आतून सडलेली असतात. फळे परिपक्व होण्याच्या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे स्थानिक अथवा निर्यातीसाठी विक्री करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जपान, युरोपियन देशांमध्ये आंबा निर्यात करण्यापूर्वी या किडींच्या नियंत्रणासाठी उष्ण वाफेची प्रक्रिया करावी लागते.

नियंत्रणाचे उपाय :

१. बागेत झाडाखाली जमीन हिवाळ्यात नांगरावी, कुदळणी करावी किंवा चाळून घ्यावी. यामुळे सुप्तावस्थेतील कोष उघडे पडून नष्ट होतील किंवा पक्षी वेचून खातील.

२. बागेत झाडांखाली पडलेली फळे आणि फळमाशी कीडग्रस्त फळे गोळा करून खोल पुरून नष्ट करावीत. प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.

३. फळमाशीचा प्रादुर्भाव फळे पक्व झालेल्या फळांवर मोठ्या प्रमाणावर होतो. फळे पूर्ण पक्व होण्यापूर्वी थोडी अगोदर काढावीत.

४. फळमाशीच्या नरास आकर्षित करणाऱ्या मिथील युजेनॉल व क्यूलुअर सापळ्याचा बागेत वापर करावा.फळमाशी ट्रॅप चा सर्व शेतकरी मित्रांनी वापर करायला पाहिजे.

 

फळमाशीसाठी सापळा ः

फळमाशीचे नर आणि मादी कोषातून बाहेर पडल्यानंतर मादीला जननक्षम होण्यासाठी किमान एक ते दोन आठवडे लागतात. फळमाशीचे नर मात्र लवकर जननक्षम होतात. त्यांना जगण्यासाठी ठरावीक प्रकारचे खाद्य लागते. हे खाद्य ठरावीक वनस्पतींच्या फुले, फळे, पाने किंवा काही बियांमध्ये आढळून येते. अशा खाद्याच्या गंधाकडे फळमाशीचे नर आकर्षित होतात. तुळशीच्या पानामध्ये, फुलांमध्ये आणि बियांमध्ये नराला आकर्षित करणारी रासायनिक द्रव्ये असल्याचे आढळून आले आहे.

फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअरसारख्या रासायनिक द्रव्याचा वापर करण्याचे शास्त्र त्यातून विकसित केले आहे. या द्रव्याचा उपयोग करून सापळे तयार केले जातात.

फळमाशांना आकर्षित करण्यासाठी मिथील युजेनॉल किंवा क्यूल्युअर हे रासायनिक द्रव्य वापरावे.या गंधाकडे फळमाशी आकर्षित होऊन सापळ्यामध्ये अडकते. फळमाशीच्या नियंत्रणास मदत होते.

 

जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू 9529600161

English Summary: Fruitfly management information and technology
Published on: 08 January 2022, 09:50 IST