आजमितीस मला ब-याच कपाशी लागवड करणा-या शेतकरी बांधवांच्या एकाच प्रश्नाला वारंवार सामोरे जावे लागते आहे. तो प्रश्न गुलाबी बोंड अळी आली काय?त्यासाठी आता काय फवारायचे. करिता हा लेख मी लिहितो आहे.सैतानाला (गुलाबी बोंड अळी) धास्तावुन न जाता त्याची ओळख करून घेणे महत्वाचे आहे. याच आपल्या घबराहटीचा फायदा घेत मोठ्या मोठ्या गब्बर जमाती आपण तयार केलेल्या आहेत. अशीच भिती घालत उत्पादना पुर्वी व उत्पादन आल्यानंतर सुद्धा शेतकरी नागवल्या जातो. तेंव्हा जरूर ओळख करून घेवुया गुलाबी बोंड अळीची.गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम कोणत्याही अळीवर्गिय किटकांच्या जिवनचक्रात ४ अवस्था असतात. अंडी, अळी, कोष, पतंग. त्यानुसार गुलाबी बोंड अळी आपल्या क्षेत्रात आली किंवा नाही त्याबद्दलची प्रत्येक अवस्थेतील ओळख (रंग, आकार, स्थान व काळ) शेतकऱ्याला होने आवश्यक आहे. करिता हा लेख चित्रांसह देत आहे.
अंडी अवस्था गुलाबी बोंड अळीची मादी पहिल्या पावसा नंतर किंवा कपाशीच्या वाढीच्या अवस्थेत म्हणजेच पाते धरायच्या अगोदर तिच्या पहिल्या पिढीची सुरूवात कोवळे शेंडे व पात्यांवर अंडी देवुन करते त्यामुळे जून-जुलै दरम्यान पतंगांनी घातलेल्या अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना उपजीविकेसाठी पात्या, फुले, कोवळी बोंडे उपलब्ध नसतात त्यामुळे अश्या अंडीतुन निघालेल्या अळ्या मरून जातात. या क्रियेला पतंगांचा आत्मघाती उदय (suicidal emergence) असे म्हणतात. अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीची पुढची उत्पत्ती रोखता येते. हंगामी कापूस पिकावरील प्रादुर्भाव कमी करण्यास मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतरच्या पिकांच्या अवस्थेत दुसऱ्या पिढीपासुन अंडी सरळ नवीन कोवळ्या बोंडावर व पुष्प कोषावर दिल्या जातात. मादी पतंग जिवनात १००-२०० अंडी एकल किंवा ४-५ अंडी समुहाने बारीक फटीत अलग अलग लांबोळी, पांढरी, गोल, चपटी अंडी घालते.
अळी अवस्था - सर्व साधारण ३-५ दिवसात अंडी उबतात. या पक्व झालेल्या अड्यांतून पांढरी रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पडते, अशा अळ्या रात्री पात्यामध्ये डोमकळ्याच्या माध्यमातून बोंडात शिरतात यासाठी ५ ते ६ दिवस लागतात. पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते. म्हणुनच तीला गुलाबी बोंडअळी म्हणतात. अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान असते._कोष अवस्था कोष सुमारे ८ ते १० मि.मी. लांब व बदामी रंगाचा असतो. कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग रात्री किंवा पहाटेच बाहेर येतात. खाद्य वनस्पती अभाव व प्रतिकुल परिस्थितीत कोष अवस्था ६ महिने ते २ वर्षापर्यंत सुद्धा राहू शकते.
पतंग अवस्था१] पतंगा सुमारे ८ ते ९ मि.मी.चा असतो व ते करड्या रंगचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात. पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहते. हे पतंग निशाचर (अंधार प्रिय) असतात त्यामुळे ते दिवसा मातीत किंवा जमिनीच्या फटीत दडुन बसतात. हेच कारण आहे कि या पतंगाचा मिलन व अंडी देण्याचा काळ अंधारी रात्री म्हणजेच अमावसेच्या काळात जास्त होतो.२] मागील वर्षी मोठे-मोठे हॅलोजन कपाशी क्षेत्रात लावन्यात आले होते, त्यावेळेस आपण किती मोठा मुर्खपणा केला होता ते जाणवेल. कारण याद्वारे बिना कामाची असंख्य किड मारली ज्याचा आपल्याला काहिच त्रास नव्हता व मौल्यवान विद्युत शक्ती सुद्धा विनाकारण वाया घालवली. मंद प्रकाशाच्या निळ्या (अल्ट्रा व्हायोलेट) बल्बवरच बोंड अळीचे पतंग येत असतात. प्रखर प्रकाशावर ते केव्हाच येत नाहीत
संकलन : पंकज काळे ( M.Sc. Agri )
निसर्ग फाऊंडेशन, अमरावती
संपर्क क्र.: ९४०३४२६०९६, ७३५०५८०३११
Published on: 16 July 2022, 05:52 IST