Agripedia

ज्या वेळी आपण पीक फेरपालट करतो त्यावेळी मुख्य पीकाला पोषक असणारा बेवड पाहिजे.

Updated on 28 January, 2022 2:11 PM IST

    ज्या वेळी आपण पीक फेरपालट करतो त्यावेळी मुख्य पीकाला पोषक असणारा बेवड पाहिजे. आपले जर मुख्य पीक ऊस असेल तर बेवडा साठी हळदीचे पीक घेणे हा एक चांगला पर्याय आहे. हळद पीक करत असताना निचरा होणारी जमीन निवडावी. पाणी साठून राहणाऱ्या जमिनी मध्ये हळदीचे पीक घेऊ नका. 

 साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड व कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात तसेच हळद काढून हळद करू नका. कारण हळद काढुन हळद केल्यानंतर हळदीच्या उत्पादनात फार मोठी घट येते. ज्यामध्ये आपले घातलेले खर्च देखील निघू शकत नाही.

तसेच शक्यतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हळद पीक घेणे टाळावे. अशा जमिनीत पिकावर सतत पिवळसरपणा दिसून येतो. व पिकाची वाढ चांगली होत नाही.

हळदीच्या बेवड मध्ये कुठलेही पीक चांगले येते. उदा. ऊस, ढोबळी मिरची, केळी किंवा कुठलेही पीक चांगले येते .ज्यांना एकरी 25 क्विंटलच्या वरती हळदीचे उत्पादन काढणे शक्य आहे, त्यांनीच हळदीचा नाद करावा . कारण त्याच्या आत जर उत्पादन निघाले तर उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते. व्यवस्थित जर केले तर एकरी 30 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन निघते. चांगले पैसे व्हायला सरासरी दर 9000 रु च्या आसपास क्विंटला दर मिळाला तर हे पीक सुद्धा चांगले पैसे देऊन जाते. मात्र अलीकडे चार वर्षामध्ये 7000 ते 8000 च्या वरती दर मिळेनासा झालेला आहे. 

ज्यावेळी तुमचे एकरी उत्पादन 30 क्विंटल च्या पुढे व सरासरी दर 10000 च्या पुढे मिळतो. त्यावेळी त्याचे 8 महिन्यामध्ये एकरीं 100 टन ऊसा इतके पैसे मिळतात. हळदीचा दर पडला म्हणून बंद न करता सातत्याने प्रत्येक वर्षी केले, तर एखाद्या वर्षी चांगला दर मिळाला की मागील तोटा बऱ्यापैकी भरून निघते.

आमच्या भागातील बरेचशे शेतकरी एकरी 25/30 क्विंटल हळदीचे उत्पादन काढतात. हळद काढल्यानंतर बरेच शेतकरी फेब्रुवारी, मार्च महिन्या मध्ये ऊस करतात. पुढील वर्षी तो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये तुटतो. त्याचे उत्पादन 11ते 12 महिन्यांमध्ये एकरी 50 ते 60 टनांपर्यंत निघते. उदाहरण द्यायचे झाले तर आडसालीं ऊस कारखान्याला तुटून जाईपर्यंत हळद व ऊसाचे एक पीक निघते. म्हणजे एकरीं 30 क्विंटल हळद व 60 टन ऊस याचे हिशेब केले तर ते एकरीं 100 टन ऊसापेक्षा त्याचे पैसे जास्त होतात. त्याचा खोडवा देखील 50 ते 60 टना पर्यंत निघते. काही शेतकरीं तर डिसेंबर महिन्यामध्ये ऊसाची रोप तयार करून एकरीं 65 ते75 टना पर्यंत गेलेत. ज्यांना पूर्ण 1वर्षभर विसावा द्याला जमत नाही, व उन्हाळ्यामध्ये पाण्याचे नियोजन करणे शक्य आहे, त्यांना हळद काढून लगेच ऊस करणे हा एक चांगला पर्याय आहे .ज्यांना पूर्ण वर्षभर विसावा द्यायचा आहे. 

त्यांनी ते शेतकरी हळद काढून चार महिने जमीन चांगली तापवून घेतात.चांगली मशागत करून

जून/जुलै महिन्यामध्ये आडसाली ऊसाचे नियोजन करतात.

मी व्यक्तिशः हळदीचे पीक काढल्यानंतर 3/4महिने जमिनीला विश्रांती देतो.व जून महिन्यामध्ये आडसाली लावण करतो.गेल्या वर्षी सिझन 2018/19 ला हळदीच्या बेवड मधील आडसाली ऊसाला चांगले उत्पादन मिळाले. त्यातील एक प्लॉट एकरी 114 टनाने बसला.एक 102 टनाने बसला. हळदीच्या बेवड मुळे सहजा सहजी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन निघाले.

 

गन्ना मास्टर परभणी

लेखक

श्री. सुरेश कबाडे.

प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,

रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली

मोबा:- 9403725999

English Summary: For more sugercane production do halad crop rotation
Published on: 28 January 2022, 02:11 IST