कांदा हे पीक नाशवंत आहे. म्हणून बरेच शेतकरी बाजारभावाचा विचार करून कांदा चाळीमध्ये साठवतात. परंतु या साठवणूक कालावधीमध्ये देखील काही छोट्या चुका घडतात व कांदा दीर्घकाळ न टिकता खराब व्हायला लागतो. शेतकरी बंधू कांदाचाळी करतांना विविध प्रकारचे उपाय करून कांदा साठवतात परंतु कांदा काढणी अगोदर व काढणीनंतरचे नियोजन देखील कांदा साठवणुकीवर परिणाम करत असते.
या लेखात आपण कांदा जास्त काळ टिकावा यासाठी काढणी अगोदर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी? याबद्दल माहिती घेणार आहोत.
कांदा साठवणुकीसाठी काढणीपूर्वीचे नियोजन
1- जातींची निवड- आपल्याला माहित आहे कि खरिपामध्ये जो काही कांदा तयार होतो तो जास्त काळ टिकत नाही परंतु त्या तुलनेत रब्बी हंगामात पिकणाऱ्या जातीचे कांदे योग्य पद्धतीने साठवले तर पाच महिन्यांपर्यंत टिकतात.
त्यामुळे कांदा लागवडीसाठी जातींची निवड करताना ॲग्री फाउंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन, एन 2-4-1 या जाती साठवणीसाठी योग्य असून यामध्ये साठवणीत विशेष घट न येता सहा महिन्यांपर्यंत टिकतात. या जातीसोबतच भीमा शक्ती आणि भिमा किरण या जाती देखील कांदा साठवणुकीसाठी योग्य आहे. त्यामुळे जातींची निवड देखील कांदा साठवणुकीसाठी महत्त्वाचे ठरते.
2- खते व पाण्याचे व्यवस्थापन- कांद्यासाठी खत व्यवस्थापन करताना माती परीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. माती परीक्षण अहवालानुसारच मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे नियोजन करणे गरजेचे आहे.
कारण पाण्याचा पुरवठा,खतांची मात्रा या गोष्टींचा कांदा साठवणीवर खूप मोठा परिणाम होतो. समजा तुम्हाला नत्रयुक्त खते द्यायचे असतील तर लागवड केल्यानंतर 60 दिवसांच्या आत संपूर्ण खते द्यावीत. जर उशिरा नत्राचा पुरवठा केला तर कांद्याच्या माना जाड होतात व कांदा टिकत नाही. पालाशयुक्त खतांच्या वापराने कांद्याची साठवणक्षमता वाढते
3- पाणी देण्याची पद्धत- तुम्ही कांदा पिकाला ज्या पद्धतीने पाणी देतात ती पद्धत आणि देण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण याचा देखील कांदा साठवणीवर परिणाम होतो.
कांद्याला पाणी कमी परंतु नियमित लागते. समजा एक कांदा जेव्हा पोसला जात असतो त्यावेळी जर एकाच वेळी भरपूर प्रमाणात पाणी दिले तर कांद्याच्या माना जाड होतात व जोड कांद्याचे प्रमाण वाढते.
यासाठी पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. कांद्याच्या काढणी करणे अगोदर जमिनीच्या प्रकारानुसार दोन ते तीन आठवडे पाणी बंद करणे गरजेचे आहे व त्यानंतर पात पिवळी पडून कांद्याच्या 50 ते 70 टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
Published on: 20 August 2022, 03:59 IST