Agripedia

शेतकरी बंधूंनो हरभरा पिकातील अन्नद्रव्याच्या किंवा खताच्या व्यवस्थापना संदर्भात आपण काही बाबी जाणून घेणार आहोत. A) नेमकी हरभरा पिकात विदर्भासाठी खताची किंवा प्राथमिक अन्नद्रव्याची काय शिफारस आहे?

Updated on 08 November, 2021 6:29 PM IST

   ओलिताच्या हरभरा पिकात 25 किलो नत्र अधिक 50 किलो स्फुरद अधिक 30 किलो पालाश प्रति हेक्टर पेरणी सोबत देण्याची शिफारस आहे. तर कमी पाण्याच्या कोरडवाहू हरभरा पिकाकरिता 20 किलो नत्र अधिक 40 किलो स्फुरद अधिक 40 किलो पालाश प्रति हेक्‍टर या प्रमाणात अन्नद्रव्य देण्याची शिफारस आहे.

B)हरभरा पिकामध्ये एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून खते द्या म्हणजे नेमके काय?

१) माती परीक्षण करून घ्या आणि आपल्या जमिनीसंदर्भात सामू, चुनखडी चे प्रमाण, उपलब्ध नत्र स्फुरद पालाश तसेच उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्य व इतर बाबीची माहिती घ्या माती परीक्षणाच्या आधारावर शिफारशीप्रमाणे हरभरा पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा हा एकिकृत अन्नद्रव्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या पायाआहे

२)हरभरा पिकाला शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत द्या

३)हरभरा पिकाला रायझोबियम आणि पीएसबी या जिवाणू खताची बीजप्रक्रिया करा

४)हरभरा पिकात माती परीक्षणाच्या आधारावर आपल्या जमिनीमध्ये कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य शिफारशीप्रमाणे जमिनीत व फवारणीद्वारे द्या.

४) शिफारशीप्रमाणे रासायनिक खताची मात्रा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य खताची निवड करून पेरणीच्या वेळेस निर्देशित प्रमाणातच द्या.

५) दोन टक्के युरिया या द्रवरूप फवारणीच्या खताची हरभरा पीक फुलोऱ्यात असताना पहिली व त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करा.

  शेतकरी बंधूंनो वर निर्देशित घटक सुयोग रित्या वापरून रासायनिक खताचा माती परीक्षणाच्या आधारावर योग्य तेवढाच वापर करणे म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. 

  1. C) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून एक एकर हरभरा पिकाला कोणते सेंद्रिय खत किती प्रमाणात व कधी वापरावे? 

   शेतकरी बंधूंनो हरभरा पीक ज्या जमिनीत घ्यावयाचे आहे त्या जमिनीची खरीप हंगामापूर्वी उन्हाळ्यात तीन वर्षात एक वेळेस पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करून २ ते ३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी व एकरी किमान दोन टन म्हणजेच म्हणजेच किमान साधारणत ८ ते १० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत टाकावे व नंतर वखराची पाळी देऊन हे शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. ही बाब खरीप हंगामापूर्वी उन्हाळ्यात जमीन तयार करताना करून घ्यावी.

  1. D) हरभरा पिकात सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा प्रति एकर वापर कसा कधी व किती प्रमाणात करावा?

शेतकरी बंधूंनो पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम सूक्ष्म अन्नद्रव्य करता माती परीक्षण करून घ्या माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर हरभरा पिकात करावा

सर्वसाधारणपणे विदर्भाच्या जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. माती परीक्षणाच्या अहवालात झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आढळल्यास एकरी आठ किलो झिंक सल्फेट या प्रमाणात घेऊन शेणखतात मिसळून हरभरा पिकाला पेरणीच्या वेळेस द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्य खताचा वापर रासायनिक खतांबरोबर टाळून सेंद्रियखत म्हणजे शेण खताबरोबर केल्यास या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत याची क्रियाशीलता व उपलब्धता वाढविण्यास मदत होते. 

  1. E) हरभरा पिकात जैविक खताचा वापर प्रती एकर कसा, कधी, किती प्रमाणात करावा?

शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाला पिकाला 750 ग्रॅम हरभऱ्याचे रायझोबियम व 750 ग्रॅम पीएसबी या जिवाणू खताची प्रति 30 किलो बियाण्यास (म्हणजेच एक एकराच्या बियाण्याला) या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. रायझोबियम व पीएसबी हे द्रवरूप स्वरुपात असतील तर त्यांचे बीज प्रक्रिया चे प्रमाण प्रत्येकी अडीचशे प्रति 30 किलो बियाण्यास या प्रमाणात ठेवावे. शेतकरी बंधूंनो ही बीज प्रक्रिया करताना 100 ग्रॅम गुळ एक लिटर पाण्यात टाकून पाणी कोमट करावे व नंतर थंड होऊ द्यावे व आवश्यकतेनुसार संबंधित प्रमाणात वर निर्देशित जिवाणूखत बीजप्रक्रिया करण्यासाठी घेऊन बीज प्रक्रिया करावी व बियाण्यावर जिवाणू खत चिटकून राहण्याकरता किंचित थंड गुळाच्या द्रावणाचा किंचित शिडकावा मारावा. हरभरा बियाणे ओले गच करणे टाळावे, हाताने चोळणे टाळावे तसेच पेरणी आधी अर्धा ते एक तास ही बीज प्रक्रिया करून सावलीत बियाणे वाळवून ताबडतोब पेरणी करावी. जिवाणू खताची बीजप्रक्रिया रासायनिक बुरशीनाशके किंवा रासायनिक कीटकनाशके यांच्याबरोबर करू नये तसेच रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया करावयाची झाल्यास ती प्रथम करावी व नंतर 15 ते 20 मिनिटानंतर जैविक खताची किंवा जैविक निविष्ठाची बीज प्रक्रिया करावी रासायनिक निविष्ठांची बीजप्रक्रिया केली असल्यास जीवाणू खत वापराचे प्रमाण शिफारशीपेक्षा दीडपट किंवा दुप्पट ठेवावे.

F)ओलिताच्या हरभरा पिकात प्रती एकर रासायनिक खताची मात्रा कोणत्या रूपात, कधी, किती प्रमाणात द्यावी?

शेतकरी बंधुंनो हरभरा पिकात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला असेल म्हणजे माती परीक्षणाच्या आधारावर शेणखत दिले असेल जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली असेल तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये याच्या कमतरते प्रमाणे जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केला असेल व इतर शिफारशीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा वापर केला असेल तर सर्वसाधारण ओलिताच्या हरभऱ्यात शिफारशीप्रमाणे एक एकर हरभरा पिकाकरिता करिता पेरताना खालील प्रमाणे प्रती एकर खते देता येऊ शकतात

पेरणी करताना विक्री एकरी 20 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या सरळ खताच्या रूपात खते जमिनीत पेरताना द्यावी. शेतकरी बंधूंनो स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेट या खताच्या रूपांत दिल्यामुळे हरभरा पिकाला लागणारा गंधक यां अन्नद्रव्यांची मात्रा सुद्धा हरभरा पिकाला पुरवल्या जाते. किंवा

 पेरताना प्रति एकर डीएपी 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो, सल्फर एकरी ८ किलो या प्रमाणात सुद्धा खत देता येईल.

 शेतकरी बंधूंनो याठिकाणी प्रती एकर सरळ खताच्या आणि इतर काही खताचा रूपात याठिकाणी काही मात्र काढून दिले आहेत. इतर काही वेगळ्या खताच्या रूपात मात्र द्यायचा झाल्यास शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचा पुरवठा होतो का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे या सर्व गोष्टीचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन शिफारशी प्रमाणे हरभरा पिकाला अन्नद्रव्यांचा माती परीक्षणाच्या आधारावर पुरवठा करावा. 

G)हरभरा पिकाला फवारणी युक्त खताचा वापर करून खताची मात्रा कशी द्यावी?

 शेतकरी बंधूंनो हरभरा पिकात अधिक उत्पादन करता हरभरा पीक फुलोऱ्यात असताना दोन टक्के युरियाची पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी त्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

 

  1. H) हरभरा पिकात खत व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या सर्वसाधारण काळजा.

१) हरभरा पिकात माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करूनच खताची किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करा.

२) असंतुलित अविवेकी, अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकात नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.

३)आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवडून निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे हरभरा पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.

 

- राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Fertilizer management in gram crop
Published on: 08 November 2021, 06:29 IST