Agripedia

नमस्कार शेतकरीबंधुंनो मी शरद के. बोंडे. आज शेती विषयातील महत्त्वाचा मुद्द्यावर नजर टाकू या.

Updated on 28 January, 2022 11:44 AM IST

नमस्कार शेतकरीबंधुंनो मी शरद के. बोंडे. आज शेती विषयातील महत्त्वाचा मुद्द्यावर नजर टाकू या. जमीन, हवा, पाणी, तिथल्या वनस्पती, कीटक अशा अनेक गोष्टींचा संबंध शेती आणि त्यातून उत्पादित होणार्‍या उत्पादन आणि दीर्घकालीन शेत जमिनीशी येत असतो. हे पर्यावरण राखले तर त्याचा दीर्घकालीन फायदा शेतीत दिसून येतो.

   राज्यभरात सर्वसाधारणपणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर खरिपाच्या पेरणीस प्रारंभ होतो व त्यापूर्वी किमान १५ दिवस शेतकरी पेरणीची पूर्वतयारी करण्यात मग्न असतो. कमी श्रमात अधिक नफा मिळावा, कमी वेळेत अधिक लाभ व्हावा हा नव्या पिढीचा स्वभाव बनला आहे. त्याची साथ सर्वच क्षेत्रात पसरत असून शेतीतही कमी काळात अधिक उत्पादन व्हावे याकडे कल वाढतो आहे. पूर्वी वर्षांतून एकच पीक घेतले जाई तर काही ठिकाणी दोन पिके घेतली जात. आता वर्षांतून चार पिके घ्यावीत असे प्रयोगही अनेक जण करत आहेत. उपजाऊ जमिनीचे क्षेत्र दरवर्षी कमी होत असून शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवण्याला पर्याय नाही.

   पूर्वी शेती पारंपरिक पद्धतीने केली जायची. रासायनिक खतांचा वापर कमी व सेंद्रिय खताचा वापर अधिक होत होता. हरित क्रांतीनंतर उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खताचा वापर सुरू झाला व सेंद्रिय खताचा लोकांना विसर पडू लागला. पेरणीच्या वेळी रासायनिक खते वापरायची सवय लोकांना लागली आहे. जमिनीचा प्रकार कुठला, वापरावयाचे खत कोणते,

याचा फारसा विचार न करता सरसकट रासायनिक खते वापरली जात असल्याने ३० टक्केपेक्षा अधिक रासायनिक खत वाया जाऊन आपले मोठे आर्थिक नुकसान होते. रासायनिक खताच्या कंपन्यांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळत असल्याने यात त्यांचे नुकसान होत नाही, मात्र शेतकर्‍यांचे अकारण नुकसान होते.

   आपल्याकडे जमिनीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार सांगितले जातात. त्यात हलकी, मध्यम व भारी अशी वर्गवारी केली जाते. प्रत्यक्षात जमिनीचे आठ ढोबळ प्रकार आहेत. काळी, लाल मातीची, वाळूमिश्रित माती, पांढरी माती, खडकाळ माती असे ते आणखी प्रकार आहेत. कोणते पीक घ्यावयाचे आहे त्यानुसार जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश घटकाचे प्रमाण तपासून त्याची मात्रा दिली पाहिजे. जमिनीत खत वापरताना माती परीक्षण करूनच खत वापरले पाहिजे. मात्र अजूनही देशातील केवळ पाच टक्के शेतकरीच माती परीक्षण करतात व ९५ टक्के शेतकरी रामभरोसे शेती करतात.

   शेतकर्‍यांच्या शेतात बैलावर वापरली जाणारी यंत्रे आणि आता ट्रॅक्टरवरील आधुनिक साधने आहेत. त्याची देखभाल केली पाहिजे हे शेतकर्‍याला लक्षात येते. मात्र ज्या जमिनीतून वर्षांनुवष्रे तो उत्पादन घेत आहे त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल केली पाहिजे याकडे त्याचे म्हणावे तसे लक्ष नाही. माती परीक्षणासाठी पुरेशा प्रयोगशाळा देशात उपलब्ध नाहीत. शासनाने काही पिकांच्या अनुदानासाठी माती परीक्षण बंधनकारक केल्याने प्रमाणपत्र जोडण्यासाठी म्हणून माती परीक्षण न करताच पैसे देऊन कागद मिळविला जातो. केंद्र शासनाने मृदा आरोग्यपत्रिका मोहीम सुरू केली असली तरी त्याची गती मात्र अद्याप म्हणावी तशी नाही.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, रशिया, जर्मनी या देशात वर्षांनुवष्रे माती परीक्षण करून शेती केली जाते व तेथे खतांवरील होणारा वायफळ खर्च कमी केला जातो. आपल्याकडे जमिनीचे क्षेत्रफळ कमी आहे. अल्पभूधारक शेतकर्याचे प्रमाण तर प्रचंड आहे. त्यातच शेतकर्‍यांमध्ये माती परीक्षण करण्याची सवय नाही.

   जमिनीचे केवळ एकदा माती परीक्षण करून चालत नाही, तर किमान दोन ते तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण करून त्यानुसार खतांची मात्रा दिली गेली पाहिजे. रासायनिक खतांच्या दुष्परिणामाबद्दल मोठया प्रमाणावर चर्चा होते. रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे कर्करोगासारखे आजार हातात हे सांगितले जाते, मात्र जैविक खते उपलब्ध करून देण्यासाठी जी तरतूद करायला हवी त्याकडे मात्र लक्ष दिले जात नाही.

   गावपातळीपासून ते मोठ्या शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी कचर्‍याची मोठी समस्या आहे. अनेक शहरात वर्षांनुवष्रे कचरा साचलेला असतो. कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा नसल्याने अनेक ठिकाणी उन्हाळ्यात कचर्‍याच्या ढिगाला आगी लावल्या जातात. वास्तविक या सर्व ठिकाणच्या कचर्‍याचे नीट वर्गीकरण केले व त्याची खतनिर्मिती केली तर संपूर्ण देशाची जैविक खताची गरज भागवता येईल एवढा कचरा आपल्या देशात जमा होतो. मात्र या प्रदीर्घकाळ शेतीची योग्य दिशा देणार्‍या विषयाकडे लक्ष दिले जात नाही. त्यातूनच शेतीची उपेक्षा होते आहे.

   १ हेक्टर जमिनीवर १ मीटर जर पाणी मुरले तर एका पावसाळयत २५ लाख लिटर पाणी जमिनीत राहू शकते. आपल्याकडे अशी क्षमता असणार्‍या जमिनी होत्या, मात्र पाणी साठवून ठेवण्याची क्षमता विविध कारणाने कमी होत चालल्याने जमिनीत पाणी मुरत नाही. दोन पावसातील अंतर ३० ते ४५ दिवसांपर्यंत वाढत राहिल्याने त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होत आहे.

माती परीक्षणातील प्रमुख तीन घटकांबरोबरच सूक्ष्मद्रव्याची तपासणीही आवश्यक आहे. सूक्ष्मद्रव्याची माहितीही शेतकर्‍याला दिली गेली पाहिजे. ज्यांना ही माहिती असते असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे शेतकरी योग्य पध्दतीने शेती करतात व त्याचा त्यांना लाभही मिळतो.

   पेरणीनंतर लगेच शेतकर्‍याच्या समोर समस्या असते ती शेतात वाढलेले तण कमी करण्याची. गेल्या काही वर्षांत सरसकट प्रत्येक पिकासाठी तणनाशकाचा वापर केला जातो आहे. खुरपण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळे तणनाशकाचा वापर अपरिहार्य असला तरी अनेक तणनाशकांमुळे शेतीतील जिवाणू नष्ट होण्याचे प्रमाण वाढते आहे. पिकाच्या मुळाशी असणारे जिवाणू कीटकनाशक व तणनाशकामुळे नष्ट झाले तर त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो.

   शेतीचे म्हणून एक पर्यावरण आहे. या पर्यावरणात सर्व प्रकारचे घटक वर्षांनुवष्रे एकत्र राहतात. त्याची एक साखळी तयार होते. ती साखळी तोडण्याच्या घटना वारंवार घडत गेल्या तर त्याचा विपरीत परिणाम होतो व त्यामुळेच आपल्याकडील पिकाच्या उत्पादकतेत घट होत आहे.

 शुद्ध बीजाची उपलब्धता हीच पेरणीच्या वेळी शेतकर्‍यासमोरील मोठी समस्या असते. सर्वच ठिकाणी सरसकट भेसळ होत असल्याने बियाणांमध्येही भेसळ वाढली आहे. त्यातून दुबार व तिबार पेरणीचे प्रसंग शेतकर्‍यांवर ओढवतात. साधे वाण, सरळ वाण व सुधारित वाण यातील खरेदी करताना दुकानदार जे सांगतो त्यावर विश्‍वास ठेवून शेतकर्‍यांना खरेदी करावी लागते. आपल्याच घरचे बियाणे वापरण्याची पूर्वी असलेली पद्धत आता नामशेष होत असल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची पाळी येते आहे. शेतकरी, कृषी विभाग, विद्यापीठे, कृषी शास्त्रज्ञ या सर्वाच्याच एकत्रित कृतीची गरज आहे. शेतकरी मित्रांनो माझा हा एक प्रयत्न तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा चला तर मग !एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ!  

  

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे 

.अचलपूर, जि. अमरावती. bondes841@gmail.com

9404075628

English Summary: Farming and environment economic loss (2)
Published on: 28 January 2022, 11:44 IST