Agripedia

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी,

Updated on 14 June, 2022 1:33 PM IST

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे.यंदा राज्यात सोयाबीनची लागवड वाढण्याची चिन्हे आहेत.या पार्श्वभूमीवर किमान 75 ते 100 मि.मी.पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे वापरावे,असे धीरजकुमार यांनी म्हटले आहे.यंदा देशात आणि राज्यात मॉन्सूनचे आगमन लवकर होईल आणि चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता.

केरळमध्ये मॉन्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला, परंतु नंतर त्याचा पुढचा प्रवास खोळंबला.राज्यात मॉन्सून तुलनेने उशीरा दाखल झाला. तसेच मॉन्सूनचे वारे पोहोचल्यानंतर राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झालेला नाही.दुसऱ्या बाजूला गेल्या हंगामात सोयाबीन आणि कापसाला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी या पिकांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी उत्सुक आहेत.सोयाबीनची पेरणी कधी करावी, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावर,

जमिनीत पुरेशी ओल आल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना वारंवार करत आहेत. कृषी आयुक्तांनीही याच मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी,असे ते म्हणाले. पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाण्यांचे प्रमाण हेक्टरी 75 किलोग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी.सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे,असा सल्ला आयुक्तांनी दिला आहे.

तसेच सोयाबीन पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. प्रति किलो 3 ग्रॅम या प्रमाणात थायरमची बिजप्रक्रिया करावी.त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते.रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.पेरणीपूर्वी तीन तास अगोदर ही प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतरच त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असेही धीरजकुमार यांनी सांगितले आहे.

English Summary: Farmers should not rush for sowing: Agriculture Commissioner
Published on: 14 June 2022, 01:33 IST