सीताफळ एक महत्वाचे पीक आहे. ते कोरडवाहू भागातील हलक्या ते मुरमाड जमिनीपासून सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाणारे फळपीक आहे. सीताफळाच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
यामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो. मात्र पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहराची फळे जुलै ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होऊन चांगला दर मिळू शकतो.
विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे उन्हाळी बहराकरिता काही अंशी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. उलट नियमितपणे नैसर्गिक बहर घेतल्या जाणाऱ्या बागांचा ताण तुटल्यामुळे नवीन फूट येऊन फुलधारणा झालेली आहे.
त्यामुळे सीताफळ उत्पादकांमध्ये बहर धरण्याबाबत द्विधा मनःस्थिती दिसत आहे. सध्या तापमानात वाढ होत असून, अनुकूल परिस्थितीअभावी फुलगळ होऊन फळधारणा होणे शक्य होत नाही. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता, नियमितपणे नैसर्गिक बहराची तयारी करणे इष्ट ठरेल.
बहर व्यवस्थापनासाठी पुढील बाबींवर भर द्यावा. बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरुवातीस पावसाच्या अंदाजानुसार व सिंचन सुविधेच्या उपलब्धतेनुसार छाटणीची कामे सुरू करावीत.
अवकाळी पावसामुळे बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झालेली आहे. बागेची छाटणी करताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाकावी. छाटणी करताना जुन्या, वाळलेल्या फांद्या, अनावश्यक व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात.
झाडाचा मध्यभाग मोकळा राहील, अशा पद्धतीने छाटणी करावी. कारण झाडाची उत्पादकता ही झाडास मिळणारा सूर्यप्रकाश आणि त्याचे झाडामध्ये पसरणे याच्याशी संबंधित असते. झाडास कमी सूर्यप्रकाश मिळाल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते.
छाटणीनंतर ताबडतोब नवीन फूट फूटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर एक टक्का बोर्डो मिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
झाडाची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फूटापर्यंत मोकळी करावीत. खोडावर १० टक्के तीव्रतेची बोर्डो पेस्ट लावावी. छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते. झाडावर फळांची संख्या मर्यादित राखता येते. फळे आकाराने मोठी होतात.
बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावरसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मात्र पावसाचा खंड पडल्यास जमिनीच्या मगदरानुसार भारी जमिनीत पाच ते सहा व हलक्या जमिनीत ३ ते ४ दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे.
ठिबक सिंचनाच्या नळ्या झाडाच्या घेरालागत अंथरून घ्याव्यात. शिफारशीप्रमाणे खतमात्रा देऊन पाणी सुरू करावे. पाणी देण्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते.
बागेतील झाडांना प्रतिझाड ३०-४० किलो शेणखत किंवा ६ किलो गांडूळखत आणि २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश अशी खतमात्रा द्यावी. नत्राची निम्मी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पहिले पाणी देताना द्यावी.
बहर धरण्यापूर्वी बागेची स्वच्छता करावी. त्यासाठी बागेत पडलेली पाने-फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगग्रस्त फळे गोळा करून खड्यामध्ये पुरून टाकावेत. छाटणीनंतर बागेची आडवी उभी हलकी मशागत करून घ्यावी.
गायींच्या या तीन जाती संभाळल्यास करोडपती व्हाल,रोज देऊ शकतात 50 लिटरहून अधिक दूध
उंदरापासून पिकांचा बचाव करण्याचे पर्यावरणपूरक तंत्र, शेतकऱ्यांनो जाणून घ्या...
अखेर राज्यात पावसाला सुरुवात, 'या’ ठिकाणी आज पडणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी…
Published on: 12 June 2023, 02:09 IST