अलिकडे बि-बियाणे, खते, किटनाशके आदींच्या वाढत्या खर्चाने शेतकऱ्यांना बऱ्याच पिकांचे उत्पादन घेताना उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनेकदा उत्पादन खर्च जास्त तर त्यातून मिळणारे उत्पन्न कमी अशी स्थिती असते. शेतकऱ्यांना नफा न होता तोट्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कोणते पर्याय आहेत हे पहात असतात. रासायनिक खतांचा खर्च बऱ्याच वेळा अवाढव्य असतो. त्याला पर्याय म्हणून जर आपण जैविक खतांचा उपयोग केला तर उत्पादन खर्चातही बचत होते. जैविक खतांमुळे उत्पन्नात वाढ होते. आपण या जैविक खतांचा महत्त्वाचा भाग असलेल्या जीवामृत बनविण्याची पद्धती, त्याचे फायदे याची माहिती या लेखात घेऊ.
जीवामृत वापरण्याचे फायदे:
आपण जीवामृत तयार करण्याच्या पद्धती बरोबरच त्याचे फायदे जाणून घेऊ. शेतात जर आपण जीवामृताचा उपयोग केला, तर पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ दिसून येते. जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते. किड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. जीवामृत वापरल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो. जर आपण ठिबक सिंचन पद्धती वापरत असाल तर त्याद्वारेही, पिकांना ड्रीपद्वारे जीवामृत सोडता येते. जीवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायद्याचे ठरेल. जेणेकरून रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते.
हेही वाचा:बागायती गहू लागवड तंत्रज्ञान
जीवामृत तयार करताना:
जीवामृत तयार करण्यासाठी दहा लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र घेतले तरी चालते. तीन किलोग्रॅम गूळ, गाईचे पाच किलोग्रॅम शेण, दोन किलोग्रॅम बेसन पीठ आणि दोनशे लिटर पाण्याची टाकी एवढे साहित्य जीवामृत बनविण्यासाठी आवश्यक असते.
सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन अॅक्टिव्ह होतात. गूळ मिसळताना, त्याचे खडे राहणार नाहीत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत. नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला, तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्रयुक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.
या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे. नंतर सगळे मिश्रण 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या बॅरलमध्ये पूर्ण पाणी भरावे. नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरलमध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे. हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. सात दिवसांत जीवामृत वापरले तरी चालते. एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते.
Published on: 17 September 2020, 11:06 IST