Agripedia

कृषी पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून आम्ही पदव्युत्तर पदवीला प्रवेशित झालो आहोत.

Updated on 17 March, 2022 10:14 PM IST

कृषी पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून आम्ही पदव्युत्तर पदवीला प्रवेशित झालो आहोत.स्पर्धा परीक्षेसाठी कृषी पदवीचे शिक्षण उपयोगी ठरू शकते, या एका बाबीवर कृषी पदवी पूर्ण करून पदव्युत्तर पदवीला आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धपरिक्षांविषयी कमालीची जागरूकता निर्माण होतांना दिसते. पदवीला असताना ठरवलेली ध्येय, स्वप्न पुन्हा एकदा इथं आल्यावर जागृत होतात आणि मुलं अभ्यासाला लागतात. कृषी पदवी जरी व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित असला तरी प्रत्यक्षात जमिनीवर, शेतात काम करायची इच्छा अगदी बोटांवर मोजण्याइतकी दिसून येते. इथं बऱ्याचश्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून कंपनीत काम करणं दुय्यम मानलं जातं.त्याऐवजी बँकिंग मधील कृषी अधिकारी, कृषी एमपीएससी आणि दुसऱ्या तत्सम परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न जास्त जोर धरताना दिसते.

चांगला पगार, खुर्ची, अधिकार या गोष्टींना अधिक प्राधान्य दिसते.( मी ही त्यातलाच...) ऍग्री स्टार्टअप नावाची संकल्पना अजून सुरुवातीच्या अवस्थेत आहे.मग प्रश्न निर्माण होतो की मुळात ज्या शेतकरी आणि शेतीच्या जीवावर विद्यार्थी या क्षेत्रात तग धरून आहेत, त्या शेतकऱ्याचाच विचार इतका मागे का पडावा ? शेती-मातीसाठी प्रत्यक्षात काम करण्यास एवढी अनउत्सुकता का ? मुळात शेतकरी आपल्या केंद्रस्थानी केव्हा आणि कसा येणार, हा प्रश्न आहे.

या प्रश्नांची मीमांसा केल्यावर हळूहळू कळायला लागत की ज्या कौटुंबिक-सामाजिक जडणघडणीत आपण घडलो त्या व्यवस्थेने आपल्याला ‛साहेब होणं' हे स्वप्न लहानपणातचं देऊ केलं. त्याचं वलय आपल्याभोवती घट्ट केलं.

दुसऱ्या बाजूला शेतीविषयी आपण कायमचं नकारात्मक बाबींना लवकर स्वीकारलं.दुष्काळ, अवेळी पाऊस, रोग, किडी, गरिबी,आत्महत्या या गोष्टी वारंवार आजही आपल्या कानावर पडतात. सिनेमा मधूनही शेतीतील नापिकी,कर्जबाजारीपणा, अपमान हेचं चित्र आपल्या मनावर बिंबवले जाते.अर्थात एक प्रकारची अनास्था नाही म्हटल तरी दिसून येते.त्यामुळे शेती आपलं करिअर बनवू शकते, हा विचार अजून बराचं लांब आहे. जे काही लोकं या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत आहे, त्यांची संख्या आपल्या देशाचे भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या लक्षात घेता तुटपुंजी आहे.शासकीय योजना कितीही आल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी तेवढीच महत्वाची असते, टार्गेट पॉप्युलेशन पर्यंत पोहचणे गरजेचे असते.

परंतु असं फार कमी होताना दिसते.त्यामुळे शेतीविषयीची युवकांची आत्मीयता संभ्रमात राहते.

आज आपण बघतोय की कृषी विषयाची पार्श्वभूमी असलेल्या युवकांपेक्षा टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले इंजिनिअर, आयआयटीअन्स आपल्या नवोदित कल्पना शेतीक्षेत्रात लागू करू पाहत आहेत.ते शेतीला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या रफ्तार कार्यक्रमांतर्गत हे युवक आपल्या कल्पनांना बळ देत आहे.दुसरीकडे कृषी पदवीधर याबाबतीत बऱ्यापैकी अनभिज्ञ आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी फक्त शासनचं काहीतरी करणार हे बाजूला सारून शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी कृषी विषयक घटकांनी एकमेकांच्या समन्वयातून काम करणे गरजेचे आहे. शासनस्तरावर कृषी पदवीधर युवकांसाठी रोजगाराच्या आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्या तर हा युवक शेती क्षेत्राकडे आकर्षित होईल आणि असे होणे गरजेचे आहे. नाहीतर ज्याप्रमाणे इंजिनिअरिंग क्षेत्राविषयी युवकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनास्था झाली, त्याप्रमाणे कृषी शिक्षणाचाही आलेख तसा होऊ नये यासाठी सर्व कृषीविषयक घटकांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.

 

- योगेश पाटील, जळगांव

Msc agriculture कीटकशास्त्र

ybpatil1999@gmail.com

English Summary: Farmer is our central position
Published on: 17 March 2022, 10:12 IST