Agripedia

माती परीक्षण करण्याच्या फायद्यांसोबतच त्याचे महत्त्व, फायदे, मातीचा नमुना केव्हा, कधी, कुठे, कसा घ्यावा याचे तांत्रिक ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे.

Updated on 12 March, 2022 3:43 PM IST

जमिनीच्या आरोग्यासाठी करा माती परीक्षण

माती परीक्षण करण्याच्या फायद्यांसोबतच त्याचे महत्त्व, फायदे, मातीचा नमुना केव्हा, कधी, कुठे, कसा घ्यावा याचे तांत्रिक ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. कारण माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते व पुढील पीक नियोजन करता येते. 

 

- माती परीक्षण म्हणजे शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचे पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण तपासून अहवालानुसार पिकाचे व खतांचे नियोजन करणे होय.

- माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण यासोबतच जमीन आम्लधर्मी, क्षारयुक्त किंवा चोपण आहे याचे निदान करता येते. एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते. 

- पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण आवश्‍यकतेपेक्षा कमी दिल्यास पिके चांगली येत नाहीत. अन्नद्रव्ये प्रमाणापेक्षा जास्त दिल्यास सुपीकतेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर दिसून येतात आणि खर्चही वाढतो. 

- जमिनीत अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे व त्यावरून कोणते खत वापरावे, किती खत वापरावे, कोणते पीक घ्यावे ही माहिती आपल्याला माती परीक्षण केल्याने समजते. 

- माती परीक्षणाचे निष्कर्ष योग्य येण्यासाठी आपल्या शेताचा प्रातिनिधिक मृद नमुना घेणे ही माती परीक्षणातील प्राथमिक परंतु अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

1) माती परीक्षणाचे फायदे - 

- माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे प्रमाण समजते. 

- जमीन आम्लधर्मी आहे किंवा विम्लधर्मी आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते. 

- माती परीक्षणामुळे संतुलित खतांचा वापर करता येतो त्यामुळे पिकाच्या उत्पादन वाढीबरोबर खतांची बचतही होते. 

- माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्‍यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो. 

- माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होते. 

2) मातीचा नमुना केव्हा घ्यावा? 

- मातीचा नमुना साधारणतः पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यावा. 

- खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये. 

- शेतात पीक असताना मातीचा नमुना दोन ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा. 

3) मातीचा नमुना घेण्यासाठी आवश्‍यक साहित्य - 

टिकाव, फावडे, खुरपे, घमेले किंवा गिरमिट, स्वच्छ गोणपाट कापडी पिशवी. 

 

4) मातीचा नमुना कसा घ्यावा? 

- मातीचा नमुना घेताना जमिनीचा रंग, उंच, सखलपणा, पोत, खोली याबाबींचा विचार करावा. 

- सर्वसाधारणपणे पिकासाठी जमीन जर एकसारखी असेल तर दोन हेक्‍टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे माती नमुने घेऊन त्यातून एका मातीचा प्रातिनिधिक नमुना तयार करावा. 

- एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन असल्यास प्रत्येक प्रकाराच्या जमिनीतून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा. 

 

आकृती आहे. 

नमुना घेण्याची जागा (x) अशा खुणेने दाखविल्या आहेत. बांधाकडील जागा सोडली आहे. 

5) मातीचा नमुना घेण्याची पद्धत - 

- मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा, दगड इ. हाताने बाजूला करावेत. नमुना घेण्यासाठी टिकाव किंवा फावड्याने एक द्रोण आकाराचा किंवा इंग्रजी "V' आकाराचा खड्डा करावा. 

- खड्ड्याच्या एका बाजूची 2-3 सेंमी जाडीची माती खुरप्याच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी. अशा रीतीने शेतातील प्रत्येक विभागातून मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात एकत्र करावेत. 

- मातीतील काडीकचरा, दगड बाजूला करून ती चांगली मिसळावी व स्वच्छ गोणपाटावर घ्यावी. गोणपाटावर मातीचा ढीग करून चार समान भाग करावेत. या समान चार भागामधून समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत. 

- उरलेल्या दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून त्याचे चार भाग करून परत दोन भाग काढून टाकावेत. याप्रमाणे अंदाजे अर्धा किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत वरील क्रिया करावी. 

- माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. वाळविलेली माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.

 

अधिक माहिती साठी संपर्क करा

रोशन वाजे -9834700413

शेतकरी माती परीक्षण केद्र

English Summary: Farmer farming soil water testing center
Published on: 12 March 2022, 03:43 IST