आता बस कर जीव देणे. आता बस कर मुलंबाळं अन् पत्नीला वाऱ्यावर सोडणे. आता बस कर वयोवृद्ध आई- बाबांना निराधार बनविणे.चल उठ आवळ मूठ. खा दात ओठ आणि निघ तमाम शेतकऱ्यांच्या सर्वागीण उथ्थानाच्या स्वातंत्र्याच्या वाटेवरून. त्यासाठी बोलायला शिक. लिहायला शिक. साथ द्यायला शिक. धाडस करायला शिक. संघर्ष करायला शीक. लढायला शिक. विरोध करायला शिक. तूझे कोण हे ओळखायला शिक. तुझे विरोधक कोण आहेत हे ही ओळखायला शिक.
त्यांच्या झेंड्यांच्या नादी लागू नकोस. तुझ्या गळ्यात त्यांचे उपरणे बांधून उगाच मिरवू नकोस. त्यांच्यासाठी आणखी बरबाद होणे थांबव. त्यांच्या जाती- धर्माच्या द्वेषी षडयंत्राच्या नादी लागून आपल्याच बांधवांना ठोकू नकोस. चल उठ आणि आभिमान बाळगायला शिक आपल्या तिरंग्यावर.
आतापर्यंत देशात वीस लाखाच्या वर आत्महत्या करून काय मिळवलेस? आता तरी स्वतः साठी लढ. ईतरांसाठीही लढ. लढून जिंक. जिंकून मर. शेतकरी आंदोलनात उतरून लढ. घाबरू नकोस. कुणाला घाबरतोस? कुणाला भीतोस? कशासाठी घाबरतोस? आणि आणखी किती पिढ्या घाबरून राहणार आहेस? कुणाकडे बघून लपतोस? शेतकरी आंदोलनाकडे पाठ का फिरवतोस?कुणाला दबून राहतोस? चल उठ आणि ये मैदानात. कर चर्चा आपल्या आंदोलनाच्या. बेंबीच्या देठापासून आवाज दे. बघ सारे येतात की नाही? तू फक्त उठ. चल धर हाती संविधान.
हो आता भारतीय नागरिक आणि उडव चिंधड्या लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने त्या विषम व्यवस्थेच्या. त्या शेतकरी आणि तमाम भारतीय नागरिकांच्या विरोधातील कृषी कायद्यांच्या. केंद्र सरकारच्या उरफाट्या धोरणाच्या. तूला उद्ध्वस्त करणाऱ्या भांडवली व्यवस्थेच्या. उद्योगपतींचे लाड करणाऱ्या सरकारच्या प्रत्येक नीतिच्या.चल उठ आता काही मागे पुढे पाहू नकोस. काही विचार करू नकोस. खुप-खुप बरबाद होत आलास तू आजवर. भिकेला लावले यांनी तूला. आणखी किती वर्ष त्यांचेच ऐकून आणि त्यांच्याच भूलथापांच्या विचाराने गुरफटून मागे राहणार आहेस? तूझ्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरूवात झाली आहे. बघ जरा मान वर करून दिल्लीच्या दिशेने. दिल्लीच्या रस्त्याकडे.
ते बसले आहेत तुझ्याचसाठी थंडी वारा सहन करत रस्त्यावर-आंदोलनात. कणखर उद्देशाने. तुझ्याच भावांनी पुकारला आहे तो लढा. तुझ्या गळ्याचा गळफास काढण्यासाठी. चल तू ही सोड घर, थोड्या दिवसासाठी. चल तू ही सोड गाव, थोड्या दिवसासाठी. चल घे भेट आपल्या शेतकरी भावांची. सांग त्याला हकीकत तुझ्या दारिद्र्याची आणि आत्महत्याग्रस्त महाराष्ट्राची. बघ जरा त्या दिल्ली जवळील शेतकरी आंदोलनाकडे. मुले,महिला, वृद्धांकडे. तू ही धर मनावर आणि घे उभारी 26 जानेवारी रोजी दिल्लीत होणार्या शेतकरी ट्रॅक्टर परेडची. ही परेड आहे आपल्याच स्वातंत्र्याच्या हुंकाराची.आपल्याच आत्महत्या थांबवण्याची. आपला भारत देश वाचवण्याची.सांगत फिर सर्वांना आपलेच आंदोलन आहे ते,भारतीय नागरिकांचे. नाहीच जमले तुझे दिल्लीला जाणे, तर कर नियोजन गावातच शेतकरी परेडचे. आणि दे घोषणा,
लढेंगे-जितेंगे.
Published on: 04 April 2022, 07:56 IST