कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये.
कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनात घट येते. ही घट कांद्यामध्ये जातीपरत्वे 25 ते 30 टक्के असते. कांदा काढणीनंतर तो चांगला सुकवला नाही तर वरचा पापुद्रा चांगला वाळत नाही. वरचे कवच ओलसर राहिले तर कांदा सडतो. कांद्याची सड विशेषतः जुलै ते ऑगस्ट या दरम्यान जास्त होते. सडीमुळे कांद्याचे या काळात 10 ते 15 टक्के नुकसान होते.
कोंब येणे - कांदा काढणीसाठी तयार झाला असता त्याची मान मऊ होते आणि पात आडवी होते. या काळात पानातील ऍबसेसिक ऍसिड कांद्यामध्ये उतरते. हे रासायनिक द्रव्य कांद्याला एक प्रकारची सुप्त अवस्था प्राप्त करून देते. रब्बी कांद्याच्या माना व्यवस्थित पडतात. रब्बी कांदा काढणीनंतर लगेच कोंब न येता टिकतो; परंतु खरिपातील किंवा रांगड्या हंगामातील कांद्याच्या माना पडत नाहीत. कांदा तयार झाला तरी त्याची वाढ चालू असते. नवीन मुळे आणि कोंब येत असतात. कोंब येण्यामुळे जातीपरत्वे 10 ते 15 टक्के नुकसान होते.
साठवणीवर परिणाम करणारे घटक
जातीची निवड
सर्वच जाती सारख्या प्रमाणात साठवणीत टिकत नाहीत. खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही.रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे 4 ते 5 महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे फरक पडतो.
एन 2-4-1, ऍग्रीफाऊंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन या जाती 5 ते 6 महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात.
खत, पाणी नियोजन
खतांच्या मात्रा आणि खतांचा प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होत असतो. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते. जास्तीत जास्त शेणखताचा वापर किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
कृषी विद्यापीठांनी हेक्टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 80 किलो पालाश आणि 50 किलो गंधकाची शिफारस केली आहे. शक्य होईल तितके नत्र सेंद्रिय खतांमधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर 60 दिवसांच्या आतच द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही. पालाशमुळे साठवण क्षमता वाढते.पाणी देण्याची पद्धत व पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी परंतु नियमित लागते. कांदे पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले, तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.
कांदा सुकवणे
काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. नंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी.
चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीगकरून 15 दिवस सुकवावा. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
कांद्याचे आकारमान
कांद्याच्या आकारमानाचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होतो. 55 ते 75 मि.मी. जाडीचे कांदे साठवणीत चांगले टिकतात. लहान गोलटी कांदा साठवणीत लवकर सडतो. दोन मोठ्या कांद्यामध्ये मोकळी जागा जास्त राहते. त्यांच्या भोवती हवा खेळती राहते, सड कमी राहते.
साठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदी
कांदा चाळीतील कांद्याची उंची 4 ते 5 फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. तसेच चाळीची रुंदीदेखील 4 ते साडेचार फुटांपेक्षा जास्त असू नये.
चाळीची रचना
कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची आणि पाणी न साठणारी जागा निवडावी. तळाशी मुरूम व वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी दोन फुटांची मोकळी जागा ठेवावी.
तळाशी हवा खेळती असावी. बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात, त्यात फटी असाव्यात.
चाळीच्या खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरते, गरम हवा चाळीच्या वरच्या त्रिकोणी भागात जमा होते. रात्री चाळीचे दरवाजे उघडे ठेवले तर वाऱ्याच्या झुळकेसोबत गरम हवा बाहेर काढली जाते.चाळीचे छप्पर उसाच्या पाचटाने झाकावे. कौले महाग पडतात, चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे आलेले असावे, त्यामुळे पावसाचे ओसडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होत नाही.
संपर्क - वैजनाथ बोंबले - 9049559553
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) म्हणून कार्यरत आहेत)
Published on: 21 April 2022, 10:11 IST