कपाळावर चिंतेची पन्हाळी उमटली. शेतकऱ्यांना सध्याचा खतांचे भाव हे आवाक्या बाहेर जाणवतात. तरीही सरकारने हा निर्णय का घेतला असावा? पण ठिणगीचे ज्वाळलेत रूपांतर होण्याआधीच सरकारने हा निर्णय मागे घेतला. जरी हे विघ्न आपल्यासमोरून काही काळापुरते अलिप्त झाले असले तरीही काही काळानंतर खतांचा दरवाढ नावाचा भीमकाय राक्षस परत आपले डोके वर काढणार हे निश्चित आहे. खतांचा कार्यक्षम वापर करणे आपल्या हातात आहे.आज तुम्हाला रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देणार आहे.
शेतकी मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याचा दोन पद्धती आहेत. एक जमिनीवर टाकून देणे दुसरी फवारणी द्वारे अन्नद्रव्य व्यवस्थपन करणे.१६ अन्नद्रव्यांपैकी नत्र स्फुरद पालाश हे तीन प्रमुख अन्नद्रव्ये आहेत. ज्यांची पिकाला मोठ्याप्रमाणात गरज असते.
आपण नत्र हे युरिया चा स्वरूपात वापरतो.स्फुरद हे सिंगल सुपर फॉस्फेट चा स्वरूपात वापरतो व पालाश हे म्युरेट ऑफ पोटॅशचा स्वरूपात वापरतो. युरिया(नत्र) चा ऱ्हास हे निचऱ्यावाटे होत असते. स्फुरद आणि पालाश हे जमिनीत स्थिर होते. त्यामुळे आपण जेवढी रासायनिक खते आपल्या शेतामध्ये वापरतो त्याचा काही भाग झाडाद्वारे आपल्या वाढीसाठी वापरला जातो व उर्वरित अन्नद्रव्य जमिनीत तशीच स्थिर होतात किंवा त्यांचा निचऱ्या वाटे ऱ्हास होतो. ह्या समस्येचा तोडगा काढण्यासाठी आम्ही एक प्रयोग केला. आडसाली किंवा सुरू उसाचा कालखंडात आपण जेवढे अन्नद्रव्ये त्याला देणे अपेक्षित आहे तेवढे आपण एकाच वेळी न देता त्याचे छोटे भाग करून पिकाला दिले. नत्राचा उत्तम आणि स्वस्त स्रोत म्हणजे युरिया.ह्या युरियाचा गुणधर्म असा की हा पाण्यात काही क्षणात विरघळतो.
आपण बेसल डोस मधून जेवढे पोती युरीया वापरणार आहोत त्याचे आपण तुकडे करू शकतो. जसे युरिया चे दोन पोती(९०किलो) बेसल डोस साठी वापरत असु तर पहिला महिना सोडून पुढचा महिन्यात दर आठवड्याला आपण ९किलो सोडू शकतो. एकावेळेत देण्यापेक्षा अनेक तुकड्यांमध्ये दिलेली अन्नद्रव्ये पिकासाठी अतिशय पोषक ठरतात.पालाश ह्या अन्नद्रव्याचेही ह्याच पध्दतीने आपण वापर करू शकतो. म्युरेट ऑफ पोटॅश हे ही विद्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. जर आपण एक पोत पालाश(५०किलो) बेसल डोस मध्ये वापरणार असु तर त्याचेही आपण दर आठवड्याचा हिशोब धरून एकरी ५किलो ड्रीप मधून वापरू शकतो. बेसल डोसचे दहा ते पंधरा हिस्से केले की त्यांची कार्यक्षमता वाढते. जर आपल्याकडे ठिबक सिंचन पद्धतीची व्यवस्था नसेल तर आपण पाट पाण्याने अशाच पद्धतीने खते देऊ शकतो.
एकरी जर दोन पोती युरिया(९०किलो) व एक पोत म्युरेट ऑफ पोटॅश(५०किलो) ह्याची विभागणी आपण करू शकतो. दर १५ दिवसांनी आपण पिकाला पाणी देतो. दोन महिन्यात ४-५ पाणी आपण देऊ शकतो. आपण प्रत्येक पाण्यातून आपण २२.५किलो युरिया आणि १२.५किलो पोटॅश जमिनीतून देऊ शकतो.
नत्र आणि पालाश नंतर स्फुरद हे सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. स्फुरद हे अविद्राव्य स्वरूपात उपलब्ध असते. त्याला आपण ठिबक किंवा पाट पाण्याद्वारे पिकाला उपलब्ध करून देऊ शकत नाही.त्यामुळे स्फुरदाची जमिनीत थेट वापर केल्यास त्याची कार्यक्षमता वाढते. त्यासाठी आपण त्याला चर घेऊन टाकू शकतो अथवा पहारीने खड्डा करून त्यामध्ये ह्या खताची पेरणी करू शकतो. आम्ही आमचा शेती मध्ये स्फुरदाची तीन भाग करतो. पहिला भाग हा लागणीचा वेळेस देण्यात येतो. दुसरा भाग बाळ भरणीचा वेळेस आणि तिसरा भाग हा मोठ्या भरणीचा वेळेस देण्यात ह्या सगळ्या नियोजनामध्ये खतांची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणात वाढते. ह्या वाढलेल्या कार्यक्षमतेला शेवटचा तडका लावण्यासाठी आम्ही जिवाणू व जीवामृताचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. दर आठवड्याला आम्ही जिवाणू खतांचा वापर करतो. जिवाणू व जीवामृत आणि रासायनिक खतांचा वापरा मध्ये आम्ही तीन दिवसांचे अंतर ठेवतो. त्यामुळे जे आपण दर आठवड्याला खत वापरतो त्याला उपलब्ध व विद्रव्य करण्याची कृती जिवाणूंमार्फत केली जाते.
जिवाणूंचा वापर आपण पाट पाण्यातूनही करू शकतो. आपण जिवाणू एक आड एका सरी मधून जिवाणू खते देऊ शकतो व एक आड एक सरी मधून रासायनिक खतांचे नियोजन करू शकतो. फक्त जिवाणू खते व रासायनिक खते एकाच सरी मध्ये देऊ नयेत.
रासायनिक खतांचा किमती गगनाला भिडल्या आहेत. आपल्याकडे ह्या खतांचा कार्यक्षम वापर करणे हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. कोणते खत वापरणे ह्या पेक्षा दिलेल्या खताचे कार्यक्षम वापर आपण कसा करू शकतो ह्यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.तरी शेतकऱ्यांनी अशे अनेक प्रयोगांचा वापर करून आपले उत्पादन व उत्पन्न वाढवून घ्यावे.
विवेक पाटील,सांगली
०९३२५८९३३१९
Published on: 27 October 2021, 08:55 IST