Agripedia

नेज हे हातकणंगले तालुक्यात पवित्र बाहुबली डोंगराचा पायथ्याशी वसलेले एक छोटंसं गाव. ह्या गावातील शेतकरी हे अतिशय अभ्यासू आणि कष्टाळू स्वभावाचे आहेत.

Updated on 09 November, 2021 8:41 PM IST

ह्याच शेतकऱ्यांमधील एक नाव अरविंद नेरले. हातात खडू धरून देशाचे भविष्य घडवणारे नेरले सर शेतीतही तेवढेच प्रयोगशील आणि प्रयत्नशील आहेत. 

                      त्यांनी मागील वर्षी २५ जुलै २०२० रोजी एक एकर क्षेत्रावर ८६०३२ ह्या उसाची लागण केली. दोन सरी मधील अंतर ४ फूट आणि दोन डोळ्यातील अंतर २ फूट ठेवण्यात आले. ऊस उगवून आला काही दिवसानंतर गवताळ वाढीचा रोगाने काही उसाची बेटे खराब झाली. खराब बेटे काढून नवीन रोपांची लागण करण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात उसाची पक्की भरणी झाली. काही दिवसानंतर माझा लेख नेरले सरांचा वाचनात आला. आमचे संभाषण झाले. पीक आणि जमिनीची प्राथमिक माहिती घेऊन मनात एक ढोबळ अंदाज बांधण्यात आला.

उसाने कांडी धरली असल्याने आता उसाची झपाट्याने वाढ करणे अपेक्षित होते. वयक्तिक आम्ही ऊस लवकरात लवकर कांडी धरण्याचा अवस्थेत कसा येईल ह्यावर जोर देतो. कांडी धरली की जोमदार वाढीचा अवस्थेत उसाची झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यासाठी नेरले सरांना नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सुरुवातीपासूनच उसाला जाडी आणि दोन पेर्यातील अंतर वाढत गेले. काही ठिकाणी पेरे ९इंचा पर्यंत वाढले आहे.उसाची जाडीही चांगली आहे. नेरले सरांना जी ए,६बी ए,आयबीए ह्या संप्रेरकांचा वापराची गरज पडू नये ह्यासाठी जिवाणूंचा मार्फत ह्या संप्रेरकांची निर्मिती करण्यात आली. उसाची वाढ फक्त एका अन्नद्रव्यांचा जोरावर होत नसते त्यासाठी सर्व १६ अन्नद्रव्यांची उपलब्धता होणे गरजेचे असते.ह्या पिकाची मुळी वाढण्यासाठी रासायनिक स्फुरदयुक्त खतांचा वापर करण्यात आला.

ह्या स्फुरदयुक्त खतांचे विघटन होण्यासाठी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. उसाचा मुळीची लांबी वाढली. भरणीचा वेळेस म्युरेट ऑफ पोटॅश ह्या खताचा वापर करण्यात आला. ह्याच खताचे विघटन करून पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. उसाची वाढ नियमित होत राहिली.

                  ऊस १२-१३ कांडीवर होता त्यावेळी ह्या उसाची जाडी आणि दोन पेर्यातील अंतर जे पूर्वी ६ इंच होते ते आणखी वाढवण्याची गरज वाटत होती. महिन्याला तीन कांडी ऊस तयार होत होता. महिन्याला चार किंवा पाच कांडी ऊस तयार व्हावा अशी अपेक्षा होती. त्यासाठी इंडोल ऍसिटीक ऍसिड तयार करणाऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. दोन पेर्यातील अंतर वाढवण्यासाठी जिब्रेलीक ऍसिडची निर्मिती मुळी मध्ये जीवणूनमार्फत करण्यात आली. कालांतराने दोन पेर्यातील अंतर ८-९ इंचा पर्यंत वाढले. उन्हाळ्यात पाण्या अभावी उसाचा वाढीला मर्यादा आल्या. पावसाळ्यात उसाची वाढ परत पूर्वीसारखी सुरळीत राहिली.मागील दोन तीन महिन्यात उसा मधील ग्लुकोजचे सुक्रोस मध्ये जास्तीतजास्त रूपांतर व्हावे ह्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

ग्लुकोज ते सुक्रोज हे रूपांतर जेवढे कार्यक्षम होईल तेवढं उसाचे वजन वाढेल. ह्यासाठी आम्ही पालाश ह्या अन्नद्रव्यांवर जास्त भर दिला. जीवणूनमार्फत रासायनिक पालशचे विघटन करून पिकाला उपलब्ध करण्यात आले.

                    ह्या सगळ्या उत्तम नियोजनाचे फळ आम्हाला आता दिसत आहे. ऊस ४० ते ४२ कांडीचा तयार झाला. सर्वसाधारण उसाचे वजन २.७~२.८किलो भरले. कोंबरीचे वजन ४.५~५किलो भरले. ह्या आशा वजनाचा उसाचे टनेज किती येईल ह्याचा आपण अंदाज बांधू शकतो.१०० टनाचा आकडा पार होईल अशी अपेक्षा आहे. एक एकर क्षेत्रासाठीचा संपूर्ण खर्च हा सत्तर हजार रुपयांचा आला.कमी खर्चात जास्ती उत्पादन घेण्यासाठी खताचा प्रत्येक दाण्याचे विघटन होऊन पिकाला उपलब्ध होणे गरजेचे आहे. पण एवढा चांगला ऊस पिकवूनही शेतकऱ्यांचा समस्या कमी होत नाहीत. ऊस तोडून मोळी बांधून तयार आहे,पण कारखान्याचा गाडीचा पत्ता नाही. ऊस दोन दिवस वाळला. कारखान्याचा कारभारामध्ये व्यवसायिकपणाचा खुप अभाव आहे. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसते. शेतकऱ्याची परिस्थिती ऐका आशा विद्यार्थ्यांसारखी आहे जो नाले ओढे पावसाचा सामना करत परीक्षा केंद्रावर पोहचतो. परीक्षा ही उत्तम देतो, पण पेपर तपासणारा त्याचा कष्टाचे गुण देत नाही.

दिवाळीचा निमित्ताने शेतकऱ्यांवर असलेली सुलतानी संकटांची साखळी मोडू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझा तमाम शेतकरी बंधू आणि भगिनींना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा.

 

 नाव:अरविंद नेरले(०९९२२७७१२४२)

गाव:नेज

तालुका-हातकणंगले

जिल्हा-कोल्हापूर

विवेक पाटील,सांगली

०९३२५८९३३१९

English Summary: Efficient planning of heavy cane
Published on: 09 November 2021, 08:41 IST