Agripedia

खरीप व रब्बी हंगामातील ज्वारीचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. दाण्यावरील बुरशी,अरगट व तांबेरा या रोगाचा ज्वारी पिकावर प्रादुर्भाव झाल्यास 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होते. त्यामूळे ज्वारी पिकावर येणार्‍या महत्त्वाच्या रोगांविषयी माहिती होणे आवश्यक आहे.

Updated on 24 February, 2021 4:06 PM IST

खरीप व रब्बी हंगामातील ज्वारीचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. रोगाचा प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. दाण्यावरील बुरशी,अरगट व तांबेरा या रोगाचा ज्वारी पिकावर प्रादुर्भाव झाल्यास 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान होते. त्यामूळे ज्वारी पिकावर येणार्‍या महत्त्वाच्या रोगांविषयी माहिती होणे आवश्यक आहे.

रोग

1) दाण्यावरील बुरशी (ग्रेन मोल्ड )-


ज्वारीचे दाणे परिपक्व होत असताना पीक पावसात सापडल्यास बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो.
2) अरगट

या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे व जमिनीतील बुरशीच्या गाठीमुळे होतो. बिजाण्ड कोशातून तांबडा, पांढरा साखरेसारखा द्रव निघतो व कालांतराने दाण्याऐवजी बुरशीच्या भुरकट गाठी तयार होतात.

किडी व रोगाचे एकात्मिक व्यस्थापन -

  • मशागत : एक नांगरणी, दोन पाळया पेरणीपूर्वी देणे.

  • स्वच्छता : मशागतीनंतर पूर्वीच्या पिकाची धसकटे, चिपाडे, बांधावरील गवत, तण काढून आणि वेचून एकत्र करून नष्ट करणे.

  • खोडमाशीमुळे पोंगे मर झालेली झाडे उपटून नष्ट करावीत.

  • किडींना की बळी पडणार सुधारित/संकरित वाणांची निवड करणे.

  • सुधारित वाण : खरीप – एसपीव्ही 960 (PVK 400), एसपीव्ही 946, परभणी श्वेता,पिव्हीके रब्बी - मालदांडी 35-1, स्वाती, माउली, फूले यशोदा, फूले वसुधा व फूले चित्रा, परभणी मोती.

  • संकरित वाण : खरीप - सी.एस.एच.14, सी.एस.एच.16, सी.एस.एच.25 (परभणी साईनाथ)

  • रब्बी - सी.एस.एच.15 आर, सी.एस.एच.19 आर

  • बीजप्रक्रिया : कार्बोसल्फान 25 एसटीडी - .200 ग्रॅम. प्रतिकिलो बियाण्यास किंवा थायमेथोक्झाम 35 एफ एस 10 मीलि. प्रतिकिलो बियाणे, तसेच ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम, अॅझोटोबॅक्टर 25 ग्रॅम, पीएसबी 25 ग्रॅम – या क्रमाने प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ( खरीप हंगामात ज्वारीच्या उशिरा पेरणीसाठी 7 ग्रॅम ईमिडाक्लोप्रिड 70 ड्ब्लुएस प्रती किलो बियाणे बीज प्रक्रिया करावी.)

  • पेरणीची वेळ : खरीप – 7 जुलै पर्यन्त आणि रब्बी - सप्टेंबर दुसरा पंधरवडा

  • खते : शिफारस केल्याप्रमाणे

  • रोग नियंत्रण सर्वप्रथम एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.

दाण्यावरील बुरशीसाठी व अरगटसाठी पहिली फवारणी पीक फुलोर्‍यावर आल्यावर व दुसरी फवारणी 10-12 दिवसांनी आलटून पालटून पुढील बुरशींनाशकाची करावी.

  • कॅप्टन 50% - 1000 ग्रॅम / थायरम 75% - 1000 ग्रॅम / झायरम 80% - 1000 ग्रॅम प्रती
    500 लीटर पाण्यात मिसळून करावी.
  • तांबेरा या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी पहिली फवारणी पीक फुलोर्‍यावर आल्यावर व दुसरी फवारणी 10-12 दिवसांनी आलटून पालटून पुढील बुरशींनाशकाची करावी.
  • झायनेब 75% - 1250 ग्रॅम / मॅनकोझेब 80% - 1500 ग्रॅम प्रती 500 लीटर पाण्यात मिसळून
    करावी.

 

लेखक -

प्रा. मनीषा श्री. लांडे

सहायक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र विभाग)

श्री. संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा,

ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती

 

English Summary: Effective management of sorghum disease
Published on: 04 February 2021, 10:01 IST