Agripedia

जपान मधील एक प्रोफेसर, डॉ. टेरुओ हिगा यांनी 1982 साली E. M. Solution म्हणजे Effective Micro Organisms वर संशोधन केले.

Updated on 12 March, 2022 3:19 PM IST

जपान मधील एक प्रोफेसर, डॉ. टेरुओ हिगा यांनी 1982 साली E. M. Solution म्हणजे Effective Micro Organisms वर संशोधन केले. यात लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, फोटो सिंथेटिक बॅक्टेरिया आणि यीस्ट हे प्रमुख उपकारक सूक्ष्मजीव असतात. लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया, ज्याला मराठीत आपण दुग्धाम्ल जिवाणू म्हणतो. हे आपल्या शरीरावर विशिष्ट ठिकाणी तसेच नाकात, तोंडात, पोटात ( जठरात आणि आतड्यात) उपलब्ध असतात. यालाच Pro Biotic असे म्हणतात. अनेक कंपन्या कॅप्सूल आणि लिक्विड स्वरूपात pro biotic विकतात. अनेक वनस्पतींच्या पानांवर लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया (L.A.B.) सुध्दा उपलब्ध असतात. दुधापासून दही याच बॅक्टेरिया मुळे बनतं. 

 

सदरील लेख बारीक सारीक सुचनांनी भरलेला असल्याने जमल्यास तत्पूर्वी दिगंबर खोजे यांचा हा व्हिडीओ पहावा. 

https://youtu.be/yXK3Zre6KJQ

 

साहित्य-

1) एक वाटी तांदूळ, गावरान पॉलिश न केलेले असल्यास उत्तम. नसता जे भेटतील ते.  

2) प्लास्टिक ची दोन लिटर किंवा थोडी मोठी बरणी. 

3) चहा गाळायची चाळणी आणि पातळ कापड

4) बोअर किंवा आर ओ चं पाणी. सरकारी नळाचं असल्यास ५-६ दिवस जाळीदार झाकण ठेऊन साठवलेलं पाणी घ्यावं.

5) देशी गाईचं (नाहीच भेटलं तर म्हशीचं) न तापवलेलं ताजं दूध घ्यावे. पॉकेट मधील दूध चालणार नाही.

6) गुळ.

कृती -

भाग १

१ वाटी तांदूळ आणि ३ वाट्या कोमट पाणी घेणे. हे तांदूळ या कोमट पाण्यात, दोन्ही हाताने हळुवारपणे कुस्करावे. थोड्याच वेळात पाण्याचा रंग दुधाळ होईल. आता हे पाणी चाळणीने एका प्लास्टिकच्या बरणीत गाळून घेणे. त्या बरणीच्या तोंडाला एक कापड गच्च बांधावे. जेणेकरून आत तयार होणारे गॅसेस सहज बाहेर पडतील, परंतु बाहेरील कीटक आत जाणार नाहीत. ही बरणी सावलीत ठेवावी. पाच दिवसानंतर या द्रावणाला पिवळसर रंग आणि आंबट गोड वास येईल. जर यावर थोडी बहुत काळी बुरशी आली तर ती काढून फेकून देणे. आता हे पाणी परत गाळून घेणे. आता जेवढं हे पाणी आहे, त्याच्या पाच पट "देशी गाईचं" दूध घेणे. या दुधात हे पाणी मिसळावे. हे मिश्रण एका मोठं तोंड असलेल्या प्लास्टिकच्या बरणीत भरून, गच्च झाकण लाऊन सूर्यप्रकाश आणि थेट उष्णता पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवणे.

दिवसातून दोनदा झाकण हळुवार काढावे आणि त्यातील गॅस बाहेर जाऊ द्यावा. ५ - ८ दिवसानंतर, दुधाचे तीन ठळक थर तयार होतील. सगळ्यात वरचा आणि सगळ्यात खालचा पांढरा थर आणि मधला पातळ पाण्याचा थर असेल. हा वरचा पांढरा थर हळूच काढून घेणे. हे खाण्यायोग्य असते, त्यामुळे आपण खाण्यात वापरू शकता. त्यानंतर नंबर दोनचा, मधला थर म्हणजे ताकासारखं पांढरं पाणी, हे पाणी एका चाळणीने गाळून घेणे आणि बॉटल बंद करून फ्रीजमध्ये ठेवून देणे. ह्या पाण्याला फ्रिज बाहेर ठेवता येत नाही. हे आहे तुमचं मदर कल्चर (मातृ द्रावण). याला EM1 पण म्हणतात. जर हे द्रावण फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर त्यात समप्रमाणात चांगला किसलेला गूळ मिसळावा आणि चांगलं ढवळून झाकण लावून बॉटल थंड सावलीच्या जागी ठेवावी. साधारणतः एक वर्षापर्यंत हे द्रावण आपण वापरू शकतो.

 

भाग २

आता या "मदर कल्चर" पासून इ. एम. सोलुशन बनवण्यासाठी १लिटर पाण्यामध्ये ५० ग्रॅम गूळ आणि १०० एम एल मदर कल्चर मिसळून उबदार परंतु सूर्यप्रकाशापासून दूर जागी ठेवावे. गरजेप्रमाणे दिवसातून दोन ते चार वेळेस बॉटलचं झाकण अतिशय हळूवार काळजीपूर्वक ढिल्लं करावं. त्यातून गॅस बाहेर पडल्यावर दहा मिनिटांनी झाकण पुन्हा गच्च बंद करावं. साधारणतः दहा ते वीस दिवसानंतर त्यातून गॅस येणे बंद होईल. हे झालं आपलं वापरण्या योग्य इ. एम. सोलुशन किंवा EM2. याचा गंध किंचित दारू सारखा असेल. सामू (PH) ३ ते ४ पर्यंत असतो. आणि चव आंबट असते.

उपयोग-

● मुख्यतः कंपोस्टिंग साठी बोकाशी पावडर बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. बोकाशी कल्चर किचन वेस्ट पासून दुर्गंधी रहित प्रक्रियेने कंपोस्ट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

● जेवणानंतर १० ते २० एम एल इ. एम. सोल्युशन पाण्यात मिसळून पिणे (डॉ च्या सल्ल्याने). यामुळे खाल्लेलं अन्न चांगलं पचतं, पचनशक्ती सुधारते, शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढते, तसेच छोटे-मोठे त्वचाविकार, पोटाचे विकार, लघवीचे विकार इत्यादी नष्ट होतात. (Pro Biotic)

● पाळीव पशु आणि पक्षांच्या पिण्याच्या पाण्यात १ लिटर ला १एम एल औषध टाकणे. आपल्या सारखेच फायदे आहेत. 

(वि. सु. - पिण्यासाठी बनवलेलं ProBiotic नेहमी झाकण असलेल्या काचेच्या बरणीत ठेवावं. अॅसिडीक गुणधर्म असल्यामुळे प्लास्टिक मधे ठेउ नये. ते आरोग्यास हानिकारक असते.

● ई. एम. सोल्युशन चे शेतीसाठीचे फायदे गारबेज एंझाईम प्रमाणेच आहेत.

 

- संतोष गोरे

English Summary: E. M. Solutions are beneficial for dairy bacteria farming, learn methods
Published on: 12 March 2022, 03:18 IST