सिंचन पद्धत कार्यरत ठेवण्यासाठी कायम कार्य तत्परता ठेवणे आवश्यक आहे. पिकांच्या मुळांशेजारी क्षारांची साठवण होते. पिकांच्या मुळांची ठराविक क्षेत्रात वाढ होते. प्लास्टिकच्या नळ्यांची यांत्रिकी खराबी होते. उंदराचा त्रासही असतो. यावर देखरेख ठेवणे अत्यावश्यक आहे. विशेष म्हणजे, काही पिके अशी आहेत ज्यांना ठिबक संच उपयोग नसतो. उदाहरणार्थ भात पीक. भातासारख्या पिकांना ठिबक पद्धत वापरता येत नाही.
ठिबक सिंचन पद्धतीचे प्रकार
1)भूपृष्ठावरील ठिबक सिंचन (सरफेस पद्धत)
2)भूमिगत ठिंबक सिंचन (सबसरफेस पद्धत)
3)धार स्वरूपात ठिबक सिंचन (मायक्रोट्यूब)
4)सलग पट्टा ठिबक पद्धत
5)इनलाईन (ड्रिपर) पद्धत
ठिबक सिंचन पद्धतीचे वरील पाच प्रकारांत वर्गीकरण होते. ठिबक सिंचन पद्धतीचे वर्गीकरण करताना त्याची बसविण्याची पद्धत, पिकांचा प्रकार, वापरण्याची पद्धत हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.
1)भूपृष्ठावरील ठिबक सिंचन (ऑनलाइन पद्धत)
सदरील पद्धतीत पीक तसेच फळझाडांच्या ओळीनुसार लॅटरल (वितरिका) जमिनीच्या पृष्ठभागावर पसरविल्या जातात. फळझाडांमधील अंतरानुसार आणि प्रत्येक झाडाची पाण्याची पद्धत गरज काढून लॅटरलवर बसवायच्या ड्रिपरची (तोट्या) संख्या ठरविली जाते.
नवीन लागवडीवेळी झाडाजवळ एक अथवा दोन ड्रिपरचा वापर करावा. या प्रकारची पद्धत विशेषतः जास्त अंतराच्या फळबागा, पिकांसाठी वापरली जाते. या पद्धतीमध्ये ड्रिपरमधून पाण्याचा वेग दर तासी चार ते १६ लिटरदरम्यान असतो. या पद्धतीमध्ये ड्रिपर बंद पडल्यास साफ करणे, अधूनमधून पाहणी करणे आणि जमिनीवर पाणी किती पसरते याचा अंदाज घेणे हे फायदे आहेत. झाडांची जशी वाढ होईल तसे प्रत्येक झाडाजवळ ड्रिपरची संख्या वाढवायला हवी.
2)भूमिगत ठिबक सिंचन
सदरील पद्धतीत मुख्यतः इनलाईन ड्रिपरचा वापर केलेल्या लॅटरल जमिनीत १५ सेंटीमीटर खोलीपर्यंत गाडतात. पाणी जमिनीच्या पृष्ठभागाखाली दिले जात असल्यामुळे बाष्पीभवनाचा ऱ्हास कमी होतो. यामुळे मुळांचा फक्त कार्यक्षम थरच भिजविला जातो. या पद्धतीमध्ये काही वेळा पिकांची मुळे ड्रिपरच्या छिद्रातून आत गेल्याचे आढळून आले आहे.
3)धार स्वरूपात ठिबक सिंचन (मायक्रोट्यूब)
काही फळझाडांच्या मुळांची रचना भिन्न असते. त्यामुळे ठिबकद्वारे पाणी देण्याच्या पद्धतीत थोडा बदल करून थेंब थेंब पाणी देण्याऐवजी बारीक धारेने बुंंध्याजवळ पाणी दिले जाऊ शकते.
सदरील पद्धतीत पाणी लॅटरलद्वारे प्रत्येक झाडाच्या ओळीत वाहून नेले जाते. प्रत्येक झाडाजवळ लॅटरलला दुसरी लहान व्यासाची नळी (Microtube) बसवून पाणी झाडाजवळ सोडले जाते. झाडाजवळ पाणी सोडण्याचा वेग सुमारे २५ लिटर प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी असतो. या पद्धतीत पाणी देण्याचा वेग हा जमिनीत पाणी जिरण्याच्या वेगापेक्षा जास्त असतो. त्यामुळे पाणी साचून राहते. यासाठी छोटेसे आळे करावे. काही वेळाने जमीन तृप्त होऊन जाते. या पद्धतीत पूर्ण हवा बाहेर फेकली जाते व काही प्रमाणात मुळांवर हवेचा ताण पडतो. याचा खर्च कमी, देखभाल सोपी व वापरण्यास चांगली, सुटसुटीत आहे.
4)सलग पट्टा ठिबक पद्धत
पिकांच्या दोन ओळींसाठी एक लॅटरल वापरली जाते. लॅटरलवर ठराविक अंतरावर तोट्या बसविल्या जातात किंवा इनलाइन ड्रिपरचा वापर केला जातो. त्या वेळी लॅटरल या जमिनीखाली गाडल्या जातात. पाणी कमी वेगाने कायम जमिनीच्या पोटात कार्यक्षम मुळांच्या थरात सोडले जाते. या पद्धतीमुळे जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक रुंदीची पट्टी ओली राहते. या पद्धतीमध्ये खर्च कमी येतो.
5)इनलाईन (ड्रिपलाईन) पद्धत
इनलाईन पद्धतीमध्ये ड्रिपर हा लॅटरल तयार करताना लॅटरलच्या आत ठराविक अंतरावर जोडला जातो. यामध्ये दोन ड्रिपरमधील अंतर हे १०, २०, ३०, ५०, ६०, ७५, ९० आणि १०० सेंटीमीटर इतके असते. ड्रिपरचा प्रवाह हा २, ४, ८ लिटर प्रतितास इतका असतो. इनलाईन पद्धतीमध्ये ड्रिपरमधील अंतर व ड्रिपरचा प्रवाह निवडताना पिकाची पाण्याची गरज व जमिनीची पाणी धारण क्षमता विचारात घ्यावी लागते. या पद्धतीमध्ये ठिबक संच एकदा बसविल्यानंतर दोन ड्रिपरमधील अंतर बदलता येत नाही. पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. इनलाईनसाठी वाळूचा फिल्टर वापरणे व त्याची योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे.
Published on: 20 February 2022, 11:36 IST