" तरुणांनो शिवरायांच्या इतिहासातुन उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिका":- प्रा. डॉ. अरविंद देशमुख
सोळाव्या शतकात शिवरायांनी अवलंबिलेले उच्च दर्जाचे व्यवस्थापन युगानुयुगे सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे असून जागतिक स्पर्धेच्या या कालखंडात तरुणाईने शिवरायांचे इतिहासातून उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिकत वेळेचे व्यवस्थापन, अखंड कार्य करण्याची शक्ती, प्रसंगी पराभव पचविण्याचे धैर्य, नियोजन, आउट ऑफ बॉक्स थिंकींग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वृद्धिंगत करीत समाजहीत जोपसावे असे भावनाप्रधान विधान कला व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा जिल्हा अमरावतीचे प्राचार्य तथा शिवजयंती उत्सवाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अरविंद देशमुख यांनी केले. विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला द्वारा कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित शिवजयंती उत्सवात उपस्थित तरुण वर्गाला ते संबोधन करीत होते. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची, मावळ्यांची आणि एकंदरीतच समाजाची घेतलेली निगा
शत्रूला नामोहरम करण्यासाठी अवलंबिलेले गनिमी काव्याचे अनेकानेक दाखले देत प्राध्यापक देशमुख यांनी शिवरायांचे चरित्र अवलंबित आजच्या युगात सचोटी, व्यवहार कुशलता व प्रसंगी वापरावयाच्या रणनीती आणि राष्ट्रहित तरुणाईला अनेकानेक दाखले देत पटवून दिले.आपल्या अतिशय ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि वास्तवतेला धरून केलेल्या मार्गदर्शनात प्रा. देशमुख यांनी तरुणाईच्या काळजाचा ठाव घेत आजच्या परिस्थितीत कर्तव्य आणि निष्ठा यांची येथे योग्य सांगड घालण्याचे कळकळीचे आवाहनही केले. विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ.विलास खर्चे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या अतिशय दिमाखदार आणि तितक्याच भावपूर्ण सोहळ्याचे प्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री विठ्ठल सरप, संचालक विस्तार शिक्षण डॉ.राजेंद्र गाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांचेसह विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.किशोर कुबडे यांची विचार मंचावर विशेष उपस्थिती होती.
तर विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. धनराज उंदीरवाडे, सहयोगी अधिष्ठाता शिक्षण डॉ. नितीन कोष्टी यांचेसह वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी -कर्मचारी,विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने सभागृहात उपस्थित होते. आपल्या दैनंदिन आचरणातून शिवरायांचे आदर्श तथा जिजाऊ मातोश्रींचे बाळकडू आणि संस्कार सिद्ध व्हावेत अशा आचरणाचा स्वीकार करण्याचे आवाहन संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केले. शेती आणि ग्रामविकासासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी राबवित असलेल्या विविध उपक्रमांना सुद्धा डॉ. खर्चे यांनी आपल्या मार्गदर्शनात उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थी प्रतिनिधी मयुर बोरगावकर यांनी शिवचरित्र अभ्यासत युवकांनी इतिहासाचा सकारात्मक दृष्टिकोनातून समाज हितासाठी वापर करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण संदेशही दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी श्री. शिरीष तराळे यांनी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी मानसी सोनवणे हिने उपस्थितांचे आभार मानले
या कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यार्थ्यांनी साकारलेली शिवरायांची, सईबाईंची तथा जिजाऊ मातोश्रींची भूमिका, भगवे फेटे घातलेले मावळे आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची मशाल मिरवणूक यासह विद्यार्थ्यांनी सादर केलेला पोवाडा आणि अफजल खान वधाचा जिवंत देखावा सर्वांना तृप्त करून गेला मुख्य सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम आणि इतर वाद्यांसह मिरवणूक काढत शिवजयंती उत्सव साजरा केला.
आज साजरा झालेल्या शिवजयंती उत्सवाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त केलेले रक्तदान होय. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत आपले राष्ट्रीय कर्तव्य सुद्धा पार पडले. या सर्वच उपक्रमात कृषी महाविद्यालय अकोला चे सहयोगी अधिष्ठाता तथा त्यांचे संपूर्ण प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्गाने मोलाची भूमिका पार पाडली.
प्रतिनिधि- गोपाल उगले
Published on: 19 February 2022, 05:13 IST