Agripedia

विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते.

Updated on 29 June, 2022 12:16 PM IST

विद्राव्य खते ही घनरुप स्वरूपात असून या खतांची पावडर पाण्यामध्ये मिसळून वापरण्यायोग्य खतांचे द्रावण तयार केले जाते. ही खते पाण्यामध्ये १०० टक्के विरघळणारी असतात.विद्राव्य खते ही घनरुपाप्रमाणे द्रव्ररूपातसुद्धा उपलब्ध आहेत.पिकांना ठिबक संचाद्वारे विद्राव्य खतांचे द्रावण पाण्याबरोबर दिले जाते. या पद्धतीत पिकांच्या मुळांशी गरजेप्रमाणे रोज किंवा दिवसाआड खते दिली जातात. विद्राव्य खते सर्वसाधारणपणे फवारणीद्वारे, सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विरघळवून दिली जातात.भाजीपाल्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे विद्राव्य खतांच्या द्रावणात बुडवून लावली जातात.अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेचच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात. विद्राव्य खते प्रामुख्याने सकाळी किंवा सायंकाळी पिकांवर फवारणीद्वारे दिल्यास जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. विद्राव्य खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात.

प्रमुख विद्राव्य खते :- १९:१९:१९, २०:२०:२० ः या खतांना स्टार्टरग्रेड म्हणतात. यात नत्र अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा उपयोग प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो. १२:६१:० :- या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. यात अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो. यात पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे अधिक प्रमाण असते. नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढ, फुलांची योग्य वाढ आणि पुनरुत्पादनासाठी या खतांचा उपयोग होतो.०:५२:३८ : या खतास मोनो पोेटॅशियम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये भरपूर आहेत. फुले लागण्यापुर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेसाठी तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.१३:०:४५ :- या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्या नंतरच्या अवस्थेत आणि पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वाहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

०:०:५०:१८ :- या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात. पालाश बरोबरच या खतांमध्ये उपलब्ध स्वरुपातील गंधकही असतो. पक्वतेच्या हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे नियंत्रण होऊ शकते. या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.१३:४०:१३ :- कपाशीला पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फूलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.  कॅल्शियम नायट्रेट - मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरवातीच्या काळात ठोंबे किंवा शेंगा वाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.४:२८:०: यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.फर्टिगेशनचे फायदे :-मजूर, यंत्रसामग्री, इंधन, वीज, पाणी व खतांची बचत होते. पिकाच्या गरजेनुसार योग्य ते अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात योग्य वेळी देता येते.विद्राव्य द्रवरूप खते बहुतांशी आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम व क्लोरीन मुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकते, उत्पादनात चांगली वाढ होते.

विद्राव्य खते ठिबक सिंचनामुळे पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्यामुळे त्यांचे शोषण कार्यक्षमरीत्या होते.पिकांची वाढ जोमाने होते, रोगास बळी पडत नाही, साहजिकच बुरशीनाशकावरील खर्च कमी होतो.पिकाच्या वाढीनुसार खते देता येतात. खतांची कार्यक्षमता वाढल्याने उत्पादनात वाढ होते.खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.विद्राव्य खते ठिबक सिंचन आणि फवारणीद्वारे देता येतात.विद्राव्य खतांची फवारणी:- पाण्यात विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी करता येतो. साधारणत: पानांत असलेल्या अन्नद्रव्यांच्या पातळीवर पिकांची उत्पादन क्षमता ठरते. योग्य उत्पादनासाठी पानांतील अन्नद्रव्याची ही पातळी पुरेशी असणे आवश्यक असते. त्यासाठी संतुलित प्रमाणात ही अन्नद्रव्ये पीकवाढीच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेच्या गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे. 

 

हा मूळ लेख डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६(मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

English Summary: Do this using soluble fertilizers and then see the result
Published on: 29 June 2022, 12:16 IST