Agripedia

बीज प्रक्रिया किड व रोग प्रतिबंधक करिता तसेच अन्नद्रव्य उपलब्धते करता रामबाण उपाय आहे. म्हणून बीज प्रक्रियेला कमी लेखून टाळू नका तसेच पूर्वनियोजन करून आगामी रबी पिकात खाली निर्देशित बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा. या बीज प्रक्रियेविषयी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated on 26 September, 2021 11:15 AM IST

(A) बीज प्रक्रिया म्हणजे काय?

शेतकरी बंधूंनो पेरणीपूर्वी एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून विशेषता अन्नद्रव्य उपलब्धतेत वाढ करणे, पिकामध्ये कीड व रोग प्रतिबंध करणे यासारखा महत्त्वाचा उद्देश ठेवून केलेली जैविक खताची, जैविक बुरशीनाशकाची किंवा रासायनिक बुरशीनाशकाची किंवा किटकनाशकाची बियाण्याला शिफारशीप्रमाणे पेरणीपूर्वी केलेली प्रक्रिया म्हणजे बीजप्रक्रिया होय.

(B) पिकात बीज प्रक्रिया केल्यामुळे कोणते महत्त्वाचे फायदे होतात?

(१) द्विदल धान्याच्या पिकात उदाहरणार्थ हरभऱ्या सारख्या पिकात संबंधित पिकात शिफारशीत रायझोबियम या जैविक खताची बीजप्रक्रिया केल्यास हवेतील नत्र स्थिर होतो व नत्राची उपलब्धता होते व रासायनिक खतातून द्यावयाच्या नत्राच्या मात्रेत कपात करता येते. 

(२) शेतकरी बंधूंनो गहू, ज्वारी, करडी, जवस किंवा इतर एकदल पिकात अॅझटोबॅक्टर या सारख्या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे असहजीवपद्धतीने जमिनीतील नत्र स्थिरीकरण होऊन नत्राची उपलब्धता होते व नत्राच्या रासायनिक खताच्या रूपा द्यावयाच्या मात्रेत कपात करता येते पीएसबी या जिवाणू संवर्धकाच्या बीजप्रक्रियेमुळे जमिनीतील रासायनिक खताच्या रूपा दिलेला स्फुरद विरघळून पिकाला मिळवून देण्याचे काम केलं जातं.

(३) शेतकरी बंधुंनो शिफारशीप्रमाणे व लेबल क्‍लेम प्रमाणे प्रत्येक पिकात संबंधित त् रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशक यांची प्रक्रिया केली तर शिफारशीप्रमाणे संबंधित पिकातील संबंधित कीड रोगाचा प्रतिबंध मिळतो व नंतर होणारा रासायनिक कीडनाशकाचा वापर कमी होऊन उत्पादनखर्चात कपात होते व पर्यावरण निष्ठ पीक संरक्षण करता येते. बऱ्याच रोगात बऱ्याच पिकात जमिनीतून प्रादुर्भाव करणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी केव्हा केव्हा बीजप्रक्रिया हाच रामबाण उपाय असतो व नंतर रासायनिक बुरशीनाशकाच्या फवारण्या म्हणजे साप गेल्यानंतर काठी मारणे होय.

(४) याव्यतिरिक्त काही पिकात उगवण चांगली करणे पेरणी सुलभ करणे किंवा बियाण्याची सुप्तावस्था कमी करणे या व इतर कारणासाठी बीजप्रक्रिया केली जाते.

(C) प्रमुख रबी पिकात आगामी रबी हंगामात कोणत्या जैविक खताची व किती प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?

(१) हरभरा व रबी भुईमूग : यासारख्या पिकासाठी संबंधित पिकाचे रायझोबियम हे जिवाणू खत व पीएसबी हे जिवाणू खत प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास या प्रमाणात किंवा या खताची उपलब्धता द्रवरूप स्वरूपात असेल तर रायझोबियम व पीएसबी प्रत्येकी 250 ते 300 मिली द्रवरूप प्रति तीस किलो बियाण्यास म्हणजेच आठ ते 10 मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात प्रक्रिया करून घ्यावी. ही बीजप्रक्रिया केली तरच हवेतील नत्राचे स्थिरीकरण होते व स्फुरदाची उपलब्धता वाढते. ही खत बीज प्रक्रियेच्या रुपात आगामी रबी हंगामात आपण वापरली नाही तर वेळ निघून गेल्यावर इतर कोणत्याही रासायनिक खतातून किंवा द्रवरूप फवारणीच्या खात्यातून या जैविक खताचे मिळणारे फायदे हे संबंधित पिकात मिळणार नाहीत.

(२) गहू, ज्वारी, करडी, जवस: यासारख्या पिकात अझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास किंवा द्रवरूपात उपलब्ध असल्यास प्रत्येकी आठ ते दहा मिली प्रति किलो बियाण्यास या या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.

(D) आगामी रबी हंगामात प्रमुख रबी पिकात कोणत्या रासायनिक बुरशीनाशकाची, जैविक बुरशीनाशकाची व किटकनाशकाची व कशा प्रमाणात बीजप्रक्रिया करावी?

(१) हरभरा,करडी व जवस: शेतकरी बंधूंनो हरभरा पिकात मर व मूळकुजव्या या रोगाचा प्रतिबंध करिता तसेच करडी व जवस या पिकात मर या रोगाच्या प्रतिबंध करता ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. 

(२) गहू: गहू पिकात काजळी व कानी या रोगाचा प्रतिबंध करता Carboxin 37.5 टक्के + Thiram 37.5 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.

(३) रबी ज्वारी : रबी ज्वारीवरील खोडमाशी च्या प्रतिबंध करण्याकरिता इमिडाक्लोप्रिड 48% बारा मिली प्रति किलो बियाण्यास या प्रमाणात बीज प्रक्रिया व नंतर पंधरा दिवसांनी क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी ची शिफारस करण्यात आली आहे. ज्वारीवरील दाण्यातील बुरशी या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी थायरम 75% डब्ल्यू एस तीन ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी

(४) रब्बी भुईमूग: रबी भुईमुगावरील मुळकुज व खोडकुज या रोगाचा प्रतिबंध करण्याकरिता Carboxin 37.5 टक्के + Thiram 37.5 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी.

(E) पिकात बीज प्रक्रिया करताना कोणती पद्धत अवलंबावी व कोणती काळजी घ्यावी?

(१) शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करताना रासायनिक बुरशीनाशके कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया प्रथम करावी व नंतर अर्ध्या तासानंतर जैविक खत व जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक निविष्ठा व जैविक निविष्ठा यांच्या बीजप्रक्रिया एकत्र मिश्रण करून करू नये व त्यांचा क्रम प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया व नंतर जैविक निविष्ठांची बीज प्रक्रिया असाच ठेवावा.

(२) शेतकरी बंधूंनो घरचे घरी बीज प्रक्रिया करताना हातात हॅन्ड ग्लोज किंवा पॉलिथिन पिशवी हॅन्ड ग्लोज म्हणून वापरावी बीज प्रक्रिया करताना 100 ग्राम गूळ एक लिटर पाणी या प्रमाणात पाणी कोमट करून थंड होऊ द्यावे व निविष्ठा बियाण्यावर चिटकून राहण्याकरता गुळाच्या थंड पाण्याचा शिडकावा द्यावा कोणतेही बियाणे पाण्याद्वारे ओलेगच करू नये.

(३) शेतकरी बंधूंनो भुईमूग व इतर पिकात बीज प्रक्रिया करताना विशेष काळजी घ्यावी व बियाला हाताने चोळू नये व ओले गच करू नये तसेच बियाण्याची टरफले निघणार नाहीत याची काळजी घ्यावी.

(४) शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया करताना कृषी विद्यापीठ यांनी शिफारशीत केलेल्या तसेच लेबल क्‍लेम शिफारशीत असलेल्या निविष्ठांचा वापर बीजप्रक्रियेसाठी तसेच फवारणी साठी करावा व अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळावा

(E) जैविक खते जैविक बुरशीनाशके कुठे उपलब्ध होतात?

शेतकरी बंधूंनो जैविक खत,जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशक यांच्या उपलब्धतेसाठी सर्वप्रथम कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रयोग शाळेत संपर्क साधावा त्यांच्याकडे उपलब्धतेनुसार खरेदी करताना अशा प्रकारच्या निविष्ठा खरेदी करताना प्राधान्य द्यावे. शेतकरी बंधूंनो याव्यतिरिक्त भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या इतर मान्यताप्राप्त कंपन्या किंवा अधिकृत विक्रेते व अधिकृत उत्पादक यांच्याकडूनच जैविक निविष्ठा खरेदी कराव्यात.

 शेतकरी बंधूंनो रबी हंगामात शिफारशीत बीजप्रक्रिया करूनच पेरणी करा व पुढे रासायनिक निविष्ठावर होणारा अनावश्यक खर्च टाळा व पर्यावरण निष्ट अन्नद्रव्य व रसायनाचे व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात कपात करा 

 

लेखक - राजेश डवरे 

कीटक शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

प्रतिनिधी- गोपाल उगले

 

English Summary: do the sowing by seed treatment in rabbi season
Published on: 26 September 2021, 11:15 IST