डॉ.स्वाती गुर्वे, डॉ.महेश बाबर, डॉ.पराग तुरखडे
अळिंबी म्हणजे अॅगरिकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी विशिष्ट प्रकारच्या बुरशीचे फळ आहे. या बुरशीची पुर्ण वाढ झाल्यानंतर त्याला फळे येतात व त्या फळांस 'अळिंबी' किंवा 'भुछत्र' असे म्हणतात तसेच इंग्रजीत 'मशरुम' या नावाने ओळखले जाते. निसर्गामध्ये अळिंबीचे विषारी व बिनविषारी तसेच विविध आकार व रंगानुसार असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे त्याचा खाण्यासाठी वापर करण्यापुर्वी ह्या खाण्यास योग्य आहेत किंवा नाहीत याची खात्री करुनच खावेत. अख्या जगाचा विचार केला असता जगभरात अळिंबीचे २००० प्रकार असुन भारतात त्यापैकी २०० प्रकारांची नोंद केली आहे. वेगवेगळ्या देशात मिळून एकुण १०-१२ प्रकारांच्या अळिंबीची व्यावसायिक स्तरावर लागवड करण्यात येते. त्यापैकी भारतात बटण, धिंगरी, दुधी व भाताच्या पेढ्यांवरील अळिंबीची लागवड प्रचलित आहे. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलात कमी खर्चात कमी वेळेत अशी आहारात उपयुक्त ठरणारी धिंगरी अळिंबी उत्पादन करतात. ज्याला शास्त्रीय भाषेत 'ऑयस्टर' म्हणतात. हा प्रकार अळिंबीच्या 'प्लुरोटस' कुळातील आहे. ज्याला शिंपला किंवा पावसाळी छत्री या नावानेही ओळखले जाते.
धिंगरी अळिंबीस आहारात वैशिष्ठपुर्ण स्थान आहे. ओल्या धिंगरी अळिंबी मध्ये २.७८% प्रथिने, ०.६५% स्निग्ध पदार्थ, ५.२% कर्बादके, ०.९७% खनिजे, १.०८% तंतुमय पदार्थ, ९०% पाणी तसेच खनिंजांपैकी पालाश, स्फुरद, कॅल्शियम, लोह, सोडीयम इत्यादी घटक आहेत. जीवनसत्वापैकी ब-१, ब-२, आणि क यांचे प्रमाणही बऱ्याच भाजीपाला पेक्षा जास्त आहे. अळिंबीतील प्रथिनांमद्ये शरीरवाढीसाठी आवश्यक सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती इतर भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्चप्रतिची पचनास हलकी असतात. अळिंबीमधील जीवनसत्व ब-२ मुळे शर्करायुक्त पदार्थांचे पचन रक्तवाहिन्यांचे आकुंचन कमी होणे व लहान मुलांचा बेरीबेरी रोग नियंत्रणास मदत होते. 'क' जीवनसत्वामुळे मुलांना स्कव्हीं रोग, नायसिन व पेटॅथिनिक आम्लामुळे त्वचेचे रोग व हातपायांच्या तळव्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते. अळिंबीमध्ये पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प असल्याने रक्तदाब असणाऱ्यांना गुणकारी व आरोग्यवर्धक ठरते. यामधील विविध औषधी गुणधर्मामुळे प्रामुख्याने लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, इन्फ्लुएझा, पोलिओ, एडस, दमा, फुफुसांचे रोग, वंधत्व विषाणूजन्य व जीवाणूजन्य रोग प्रतिबंधास विशेष उपयोग होतो.
धिंगरी अळिंबीच्या जाती व वैशिष्टे
धिंगरी अळिंबीच्या रंग, रुप, आकारमान व तापमानाची अनुकुलता यानुसार प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसीत केलेल्या भारतात व विशेषतः महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या विविध जाती खालील प्रमाणे आहेत.
१) प्लुरोटस साजोर काजु : या जातीची फळे करड्या रंगाची असतात. ही जात म्हणजे तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे. याला आवश्यक तापमान २०-३० से. व आर्द्रता ८०-९०° से. लागते. या जातीची फळे शिंपल्याच्या आकाराची आकर्षक व चविष्ट असल्याने याला चांगली मागणी आहे.
२) प्लुरोटस इओस : या जातीची फळे गुलाबी रंगाची असुन २०-२५° से. तापमान व ६५ ते ९० % आर्द्रता असलेल्या वातावरणात चांगली वाढू शकते. ही फळे फुलांच्या गुच्छाप्रमाणे दिसत असून शिजवल्यानंतर थोडी रबरासारखी चिवट लागतात.
३) प्लुरोटस प्लोरीडा : या जातीची फळे आकाराने मोठी असुन गुच्छ पद्धतीने उगवते. या अळिंबीचा रंग पांढराशुभ्र असुन फळे काढणीस उशीर झाला तर फळे मऊ होवून काळसर पडतात.
४) प्लुरोटस फ्लॅबीलॅटस: या जातीचा आकार पंख्यासारखा असुन सुरुवातीला फळांचा रंग गुलाबी व नंतर पांढरा होतो. फळांचे देठ आखुड असुन फळे मऊ असतात.
५) हिपसीझायगस अलमॅरीस सुरुवातीला ह्या जातीची फळे निळ्या रंगाची असतात व नंतर फिक्कट होत जातात. फळे गुच्छ पद्धतीने असुन फळांना चांगली चव असल्याने बाजारात चांगली मागणी आहे.
धिंगरी अळिंबीच्या लागवडीची सुधारीत पद्धत :
१) लागवडीसाठी जागेची निवड: धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी अन्न, वारा, पाऊस यापासुन संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. पक्के किंवा कच्चे बांधकाम असलेली खोली किंवा शेड, अच्छादित असलेली झोपडी, बांबुच्या तट्ट्यापासुन तयार केलेली झोपडी किंवा पोल्ट्रीचे शेड वापरता येते. निवडलेल्या जागेस प्रखर सुर्यप्रकाश नसुन हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी
२) लागवडीसाठी माध्यम: या अळिंबीची लागवड कुठल्याही पिष्टमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांवर म्हणजे शेतातील पिकांच्या मळणीनंतर निरुपयोगी अश्या वाळलेल्या काडावर किंवा पालापाचोळ्यावर करता येते. यासाठी मुखतः भात, सोयाबीन, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका याची व पाने, कणसे, भुईमुगाच्या शेगांची टरफले इत्यादींचा वापर करावा.
३) लागवडीसाठी वातावरण: लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २२ ते ३० से. व हवेतील आर्द्रता ८५ ते ९०% असणे आवश्यक असते. म्हणून लागवडीच्या ठिकाणाचे तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण ठेवणेसाठी जमिनीवर तसेच हवेत चोहोबाजूंनी गोणपटाचे आवरण लावून त्यावर स्प्रे पंपाने पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. साधारणः २५ से. तापमानास अळिंबीची वाढ होते.
४) लागवडीची पद्धत: लागवडीस लागणारे काड किंवा पालापाचोळ्याचे २-३ से.मी. लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरुन ६ ते ८ तास थंड पाण्यात बुडवून भिजत ठेवावे काडाचे पोते थंड पाण्यातुन काढुन त्यातील जास्त पाण्याचा निचरा करण्यासाठी १-२ तास तिवईवर ठेवावे.
५) काड निर्जंतुकीकरण: काड निर्जंतुकीकरणासाठी दोन पद्धती वापरल्या जातात. पहिली म्हणजे थंड पाण्यात भिजवलेल्या काडाचे पोते ८०° से. तापमानाच्या गरम पाण्यात १ तास बुडवावे व नंतर गरम पाण्यातुन काढुन त्यातील जास्त पाण्याचा निचरा होण्यासाठी तिवईवर ठेवावे. किंवा काडाचे पोते ८० से. तापमानाच्या वाफेवर १ तास ठेवून निर्जंतुकीकरण करावे. काड थंड करण्यासाठी पोत्यासह सावलीत ठेवावे. दुसरे म्हणजे काड निर्जंतुकीकरणासाठी ७.५ ग्रॅम बाविस्टीन (बुरशीनाशक) व १२५ मिली फॉर्मेलीन (जंतुनाशक) १०० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये वाळलेले काड पोत्यात भरुन १६ ते १८ तास भिजत ठेवावे. द्रावणातील काड पोत्याबाहेर काढून जास्त पाण्याचा निचरा करण्यासाठी ४ ते ५ तास ठेवावे व त्यानंतर हे काड ३५x५५ से.मी. आकाराच्या ५ % फॉर्मेलीनमध्ये निर्जंतुक केलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये थर पद्धतीने भरावे. ५ % फॉर्मेलीनचे द्रावण फवारुन निर्जंतुक केलेल्या बंदीस्त जागेत हे काम करावे. काड भरताना प्रथम पिशवीच्या तळाला अळींबीचे थोडेसे बियाणे टाकावे. नंतर ८-१० से.मी. जाडीचा निर्जंतुक केलेल्या काडाचा थर द्यावा व त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. बियाण्याचे प्रमाण ओल्या काडाच्या वजनाच्या २% असावे. काड व स्पॉन याचे ४ ते ५ थर भरावे. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावे. पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे, पिशवीच्या चहुबाजुने सुईने किंवा टाचणीने ४०-५० बारीक छिद्रे पाडावीत. या पिशव्या निवाऱ्याच्या जागेत ठेवल्यास पिशवीमध्ये पांढरट बुरशीची वाढ दिसुन आल्यावर या पिशव्या फाडुन टाकाव्यात. बुरशीची वाढ होण्यास १५ ते १८ दिवस लागतात. बुरशीमुळे काड एकमेकांना घट्ट चिकटवुन त्याला ठेपेचा आकार प्राप्त होतो. यालाच 'बेड' असे म्हणतात.
६) पिकाची निगा: धिंगरीचे प्लॅस्टिक पिशवीतुन काढलेले बेड योग्य अंतराव रॅकमध्ये ठेवावे अथवा शिंके बांधुन टांगुन ठेवावे. बेडवर दिवसातुन २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी. खोलीमध्ये जमीनीवर भिंतीवर पाणी फवारुन तापमान २५० ते ३०० से व हवेतील आर्द्रता (६५ ते ७५ %) नियंत्रित करावी. ३ ते ४ दिवसात बेडच्या सभोवताली अंकुर (पीनहेड) दिसु लागतात पुढील ३ ते ४ दिवसात त्याची झपाट्याने वाढ होवून फळे काढणीस तयार होतात. ८ ते १० दिवसांनी दुसरे पीक मिळते व त्यानंतर ८-१० दिवसांनी तिसरे पीक मिळते. साधारणपणे १ किलो वाळवलेल्या काडाच्या एका बेडपासुन ८०० ग्रॅम ते १ किलो ताज्या अळिंबीचे उत्पादन मिळते. किडीचा बंदोबस्त करण्यासाठी काढणीनंतर प्रत्येक वेळी मॅलेथिऑन किंवा नुवान ०.०२ % (१० ली. पाण्यात २ मिली) या प्रमाणात फवारणी करावी. बेडवर फळे असताना किटकनाशके फवारु नये.
७) पाणी व्यवस्थापन: प्लॅस्टीक पिशवीतुन बेड काढल्यानंतर धिंगरी आळिंबी वाढीच्या काळात बेडवर दिवसातुन दोन-तीन वेळा पाण्याची लहान नोझल असलेल्या स्प्रे पंपाने हलकी फवारणी करावी. अळिंबीच्या बुरशीच्या वाढीच्या काळात पाणी फवारण्याची गरज नसते.
८) पिक संरक्षण: अळिंबी हे अतिशय नाजुक नाशवंत व अल्पमुदतीचे पिक आहे. सदर पिकावर ग्रीन मोल्ड व काळ्या छत्र्या हे दोन रोग येत असून शिरीड व फोरीड माशी या दोन किडी येतात, रोगांच्या नियंत्रणासाठी रुम व काड व्यवस्थित निर्जंतुक करणे गरजेचे आहे. तसेच किडींच्या नियंत्रणासाठी रुमच्या खिडक्यांना मच्छर जाळी लावणे व रुममध्ये इतरत्र कुठुनही माशी शिरणार नाही याची काळजी घ्यावी.
लेखक - डॉ.स्वाती गुर्वे, डॉ.महेश बाबर, डॉ.पराग तुरखडे
शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा
वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा
शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कणेरी मठ, ता. करवीर, जि. कोल्हापूर
Published on: 23 May 2024, 10:50 IST