माधवरावांचा जन्म यवतमाळ येथे ८ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. शिक्षण चाळीसगावात झाले. घरातून देशप्रेमाचे तर शिक्षकांकडून सद्विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. शासकीय सेवेत असताना १९६१ साली पुण्याला पाणीपुरवठा करणारी पानशेत व खडकवासला ही दोन धरणे फुटली आणि पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद पडला होता. चितळे यांनी त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावून अत्यंत कमी अवधीत म्हणजे १२० दिवसांत पुण्याचा पाणीपुरवठा पूर्ववत केला.महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे योजनांचे प्रमुख अभियंता आणि नंतर सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र जल आयोगाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. माधवराव १९७४-७५ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठात पर्विन फेलो म्हणून अभ्यासासाठी गेले होते. १९८४ साली चितळे यांची नद्यांवर बांधलेल्या धरण प्रकल्पांचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. १९८५ साली ते केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष व पदसिद्ध सचिव झाले. १९८९ साली चितळे भारत सरकारच्या जलसंपत्ती मंत्रालयाचे सचिव झाले. त्यांनी केंद्रीय जलधोरण तयार केले. १९९३ ते १९९७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय सिंचन व निस्सारण आयोगाचे पूर्णकालीन महासचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९८ ते २००२ या काळात चितळे ‘विश्वजलसहभागिता’ या आंतरराष्ट्रीय कार्यसंस्थेच्या दक्षिण आशिया समितीचे अध्यक्ष होते.
डॉ.माधव चितळे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारा दिल्या जाणाऱ्या स्टॉकहोम पुरस्कार या ‘जल पुरस्काराने’ सन्मानित पहिले भारतीय जलतज्ज्ञ आहेत. हा पुरस्कार नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. चितळे यांना हा पुरस्कार १९९३ साली मिळाला. चितळे यांच्या या बहुआयामी कामगिरीमुळे १९८९ मध्ये हैदराबादच्या जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाने व १९९५ साली कानपूरच्या कृषी आणि तंत्रविज्ञान विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. डॉ. चितळे नॉर्वेमधील ऑस्लो येथील जलप्रबोधिनी या संघटनेचे सदस्य आहेत.
डॉ.माधव चितळे मराठी विज्ञान परिषदेचे माजी विश्वस्त तसेच १९९० साली झालेल्या २५ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते. २०१५ साली मराठी विज्ञान परिषदेने डॉ. माधव चितळे यांना सन्मान्य सभासदत्व प्रदान केले डॉ. चितळे म्हणजे अभियांत्रिकीबरोबरच पाण्याच्या सामाजिक-आर्थिक-राजकीय पैलूंचे भान असणारा योजक होते, असे म्हणायला हरकत नाही.
office@mavipamumbai.org
प्रसारक : दिपक तरवडे
संकलक : प्रविण सरवदे, कराड
संदर्भ - दैनिक लोकसत्ता
Published on: 06 May 2022, 01:04 IST