फुलांचा रंग पांढरा किंवा फिकट लाला (गुलाबी) असून त्यांचा झुबका असतो. फळ बारीक असून १/५ किंवा १/६ इंच लांब असते. दबलेले असून दोन्ही टोकांना निमुळते असते. फळावर धारा आणि अखोडद केस असतात. काही जातीच्या जिऱ्यावर केस नसतात.
जिऱ्याचे बी मसाल्यासाठी वापरतात. तसेच त्याचे औषधी उपयोगही आहेत. युरोपमध्ये जिऱ्याचे ऐवजी 'कॅरावे' (विलायती जिरे) वापरतात. इंग्रजीत जिऱ्याला 'क्युमीन सीड' म्हणतात. जिऱ्याचे मुळस्थान इजिप्त असले तरी प्राचीन काळापासून भारतात जिऱ्याची लागवड होते. भारताव्यतिरिक्त इराण, अरबस्थान, इलिप्त, मोरोक्को, सिसीली, चीन, जावा इ. देशात जिऱ्याची लागवड करतात. भारतात बंगाल व आसाम व्यतिरिक्त सर्व राज्यात जिऱ्याची लागवड होते. यामध्ये पंजाब, राजस्थान, गुजराथ व उत्तरप्रदेश या राज्यात त्याची लागवड बरीच होते. जबळपूर, रतलाम, जयपूर व गंगापूर ही जिऱ्याची व्यापर केंद्रे आहेत.
जिऱ्याला विशिष्ट मसाल्याचा सुवास असतो. चव किंचित कडवट असते. जिऱ्यामध्ये खालील घटक असतात - पाणी ११.९%, प्रथिने १८.७%, कर्बोदके ३६.६%, तंतू १२%, खनिजे ५.८%, कॅल्शियम १.०८%, स्फुरद ०.४९%, लोह १०० ग्रॅममध्ये ३१ मिलीग्रॅम, कॅरोटीन (अ जीवनसत्व) १०० ग्रॅममध्ये ८७० आंतरराष्ट्रीय एकके, उडणारे तेल २ ते ४%. या तेलाचा वास मनपसंत नसतो आणि चव कडू असते. ताजे तेल रंगरहित किंवा पिवळे असते. जुने झल्यानंतर गडद बनते. या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्यात, मद्यात व कॉर्डियल मध्ये सुगंधासाठी करतात. भारतात जिऱ्याचे उत्पादन सुमारे ६०,००० मे. टन होते. त्यापैकी १०% उत्पादन राजस्थान व गुजराथमध्ये होते.
हवामान :
समुद्र किनाऱ्यापासून १०,००० फूट उंचीपर्यंत जिऱ्याची लागवड होते. मैदानी उष्ण हवामानापेक्षा सौम्य हवामान पिकाला मानवते. हे पीक नाजूक असल्याने बागायती पीक घेतात. माध्यम स्वरूपाचे नियमित पाणी देतात. पैकी काढण्याच्या काळात हलक्या पावसाच्या सरी लागतात. मुसळधार पावसाने पिकाचे नुकसान होते, म्हणून मुसळधार पावसाचे आधी व नंतर या पिकाची लागवड करतात.
जमीन :
जिऱ्याचा लागवडीसाठी खोल, भुसभुशीत, उत्तम निचऱ्याची, सुपीक पोयट्याची जमीन योग्य असते. लागवडीसाठी जमिनीची उत्तम मशागत करून सेंद्रिय खते द्यावी लागतात.
जाती :
जिऱ्याच्या 'आरझेड १९' (युसी १९) या सुधारित जातीची शिफारस राजस्थानकरिता केली आहे. ही जात मर रोगाला प्रतिकारक आहे. या जातीच्या जिऱ्याची प्रत चांगली आहे. बियात उडणाऱ्या तेलाचे प्रमाण २.६% आहे. प्रति एकरी सरासरी २.५ ते ३ क्विंटल जिऱ्याचे उत्पादन मिळते. या जातीचे बी राजस्थान कृषि विद्यापीठ, जोबानेर येथून मिळवावे.
लागवड :
जिऱ्याची लागवड दोन हंगामात करतात. लवकर लागवड एप्रिलच्या मध्यात करतात आणि उशिरा लागवड ऑक्टोबरच्या अखेरीस करतात. पीक ९० दिवसात तयार होते. जमिनीची चांगली मशागत करून चांगल्या पोताची जमीन तयार करावी. प्रति एकरी चांगले कुजलेले शेणखत ३० ते ४० गाड्या आणि सेंद्रिय खत १०० ते १५० किलो जमिनीत मिसळावे. सिंचनासाठी सपाट वाफे तयार करावेत. या वाफ्यात बी फेकून पेरतात. ते हाताने जमिनीच्या पृष्ठभागात समान मिसळतात. प्रति एकरी १४ ते १६ कि. ग्रॅ. बी लागते. वाफ्यांना हलके पाणी द्यावे. बी पाण्यावर तरंगून वाफ्याच्या कोपऱ्यात गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी. पाच दिवसात बी उगवते. दररोज हलके पाणी द्यावे. ७ ते १० दिवसांनी वाफ्यातील तण काढावे. आवश्यकता असल्यास पिकाची विरळणी करावी. म्हणजे पिकाची वाढ झपाट्याने होते. पाण्याची पाळी ३ किंवा ४ दिवसांनी द्यावी.
काढणी :
पेरणीनंतर ७ आठवड्यांनी पीक फुलावर येते. तेव्हा एक आठवड्याचे अंतराने पाण्याची पाळी द्यावी. आणखी ६ आठवड्यांनी बी पक्व होऊन पीक काढणीकरिता तयार होते. त्यावेळी झाडे उपटून खळ्यावर ढिगात गोळा करतात. थोडया दिवसांनी उन्हात पसरून वाळवितात. मोगरीने पेंड्या झोडपून बी वेगळे करतात. बी पाखडून पोत्यात भरतात.
संकलन : प्रविण सरवदे, कराड
Published on: 15 November 2021, 08:22 IST