गोड ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. ज्वारीच्या ताटाच्या रसापासून काकवी गूळ आणि इथेनॉल बनविता येते. या प्रकारच्या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारी सारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून त्याचा फायदा दूध उत्पादन वाढण्यात होईल.गोड ज्वारी लागवडीचे तंत्रज्ञान हे रब्बी आणि खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्याने गोड ज्वारीची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. या लेखात आपण गोड ज्वारीच्या सुधारित तंत्रज्ञान बद्दल माहिती घेऊ.
गोड ज्वारीची लागवड तंत्र
गोड ज्वारीची लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना पुढील बाबींचा तंतोतंत अवलंब करावा. जमीन ही मध्यम ते भारी असणे आवश्यक आहे. हलक्या जमिनीवर गोड ज्वारीची लागवड करू नये. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस दोन नांगरणी बरोबर एक किंवा दोन वखराच्या पाळ्या मारून जमीन समपातळीत आणावी. ही ज्वारी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात येते. खरीप हंगामात गोड ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर 15 दिवसाच्या आत करावे. आणि उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणे आवश्यक आहे.
खत आणि बीजप्रक्रिया
एकरी अडीच किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. खोड माशीच्या नियंत्रणासाठी बियाण्यास तीन ग्रॅम थायमेथोक्साम (70 टक्के)प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी जमिनीत 50 किलो नत्र,40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश व शेवटच्या नांगरणी वेळेस दहा टन प्रति हेक्टरी शेणखतद्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रति हेक्टरी पीक कांडे धरण्याच्या कालावधीत पेरणीनंतर एक महिन्याने कोळप्याच्यामागे मोग्यानेद्यावे. ज्वारीची वाढ चांगली होण्यासाठी दोन ओळीतील अंतर 60 सेंटिमीटर व दोन झाडांमधील अंतर 12 ते 15 सेंटिमीटर ठेवावे. त्यामुळे झाडांची संख्या एक लाख दहा हजार प्रति हेक्टरी राहील. जोमदार एक रोप ठेवून बाकीची झाडे जमिनीलगत वाकवून काढून टाकावीत.
योग्यप्रकारे पाण्याचा पुरवठा मूलस्थानी पाण्याचे व्यवस्थापनासाठी एक ते दोन कोळपण्या, कोळपणी करताना कोळप्याच्या खाली दोरी बांधून केले असता तणाचा बंदोबस्त होतो तसेच जमिनीतील पाणी टिकवून राहण्यास मदत होईल. गोड ज्वारीची योग्य व्यवस्थापन ठेवल्यास गोड ज्वारीपासून एकरी 12 ते 15 टन हिरवा चारा मिळतो. गोड ज्वारीच्या रसापासून आपणास हेक्टरी 2000 ते 2500 लिटर इथेनॉल तयार करता येते.
गोड ज्वारीचेवाण
एस एस व्ही – 84, फुले अमृता, शुगर ग्रे ऊर्जा, सीएसएच -22, आयसीएसव्ही– 93046 आयसीएसवि – 25274
गोड ज्वारीचे फायदे
- हे पीक चार महिन्यात येते त्यामुळे दरवर्षी दोन पिके घेता येतात.
- हे जिराईत पीक आहे. हे पीक सर्वात अधिक जमिनीतील पाण्याचा उपयोग घेणारे पीक म्हणून ओळखले जाते.
- याच्या लागवडीचा खर्च कमी आहे.
- यामध्ये कमी होणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यातील रस इथेनॉल साठी योग्य आहे.
- याच्या चोथ्याचा जनावरांच्या खाद्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो.
- काही प्रमाणात धान्याचे उत्पादन मिळते.
- आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून या ज्वारी पासून मिळणाऱ्या इथेनॉल मूळे वातावरणातील होणारे प्रदूषण कमी होते.
संदर्भ- ज्वारी संशोधन प्रकल्प, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
Published on: 20 October 2021, 01:25 IST