मिरची आणि ढोबळी मिरची लागवड प्रामुख्याने बरेच जण आता शेडनेटमध्ये करतात. परंतु योग्य व्यवस्थापन आणि नियोजनाने ढोबळी मिरचीचे उत्पादन हे खुल्या शेतात देखील चांगल्या प्रकारे करता येते. व्यवस्थित व्यवस्थापन आणि तंत्रशुद्ध पद्धत वापरली तर शेडनेट शिवाय देखील ढोबळी मिरचीचे उत्पादन चांगले घेता येते.या लेखात आपण शेडनेट शिवाय ढोबळी मिरचीचे उत्पादनकसे घ्यावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
ढोबळी मिरचीची रोपे तयार करणे(Plant making)
- सगळ्यात अगोदर रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. जमिनीची व्यवस्थित मशागत करताना ती नांगरून आणि कुळवाच्या पाळ्या देऊन भुसभुशीत करावी
- तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 15 सेंटिमीटर उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे.
- गादी वाफ्यावर दोन सेंटीमीटर खोलीच्या दहा सेंटीमीटर अंतरावर रुंदीला समांतर अशा रेघा ओढून घ्याव्यात. त्यामध्ये प्रथम फोरेट (10 जी ) कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बियांची पेरणी करावी.
- प्रति वाफा 10 ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्टर ढोबळी मिरचीची लागवड करायची असेल तर सुमारे 400 ते 500 ग्रॅम बियाण्याची गरज असते.
- रोपे लागवडीनंतर सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर त्यांची पुनर्लागवड करावी.
रोपे तयार करण्याची प्रो ट्रे पद्धत
- कंपोस्ट आणि बारीक रेती हे 1:1 या प्रमाणात मिश्रण करावे व ट्रेमध्य भरावे. एका ट्रेमध्ये सर्वसाधारणपणे तीन ते चार ग्रॅम बी लागते. ट्रे मधील माती भिजवून घ्यावी व त्यावर कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यानंतर गोळी तयार करून अर्ध्या इंचावर बियाणे टोकून, त्यावर झाकून द्यावे.ट्रे वर प्लास्टिक कागद झाकला तर उबमिळून चार ते पाच दिवसांत बियाणे उगवते.
- त्याच्यानंतर प्लास्टिक कागद काढून ट्रे उन्हात ठेवावेत. ट्रे उन्हात राहतील याची काळजी घ्यावी.
- दहा ते पंधरा दिवसांनी ट्रे मधीलरोपेप्लास्टिक पिशवी मध्ये भरून ठेवावे. तीन ते चार आठवड्यांनंतर ही रोपे लागवडीसाठी वापरावीत.
ढोबळी मिरचीची लागवड
रोपांची लागवड करताना दोन ओळींतील अंतर 60 सेंटिमीटर म्हणजे दोन फूट आणि दोन रोपांमधील अंतर 45 सेंटिमीटर ठेवल्यास एका एकर मध्ये सर्वसाधारणपणे 14520 झाडे लागतात.रोपांची लागवड शक्य असल्यास संध्याकाळी करणे उत्तम असते.जमीन हलकी असेल तर सरीमध्ये लागवड करावी आणि जमीन जर चांगल्या प्रकारचे असेल तर सरीच्या एका बाजूस लागवड करावी.
आंतरमशागत
एका महिन्याच्या अंतराने खुरपणी करावी. खते द्यावीत व झाडांना भर द्यावी
खतांचे व्यवस्थापन
- हेक्टरी 15 ते 20 गाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे.
- माती परीक्षण करून दीडशे किलो नत्र, दीडशे किलो स्फुरदआणि 200 किलो पालाश पिकाला द्यावे.
- संपूर्ण पालाश, स्फुरदआणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे.
ढोबळी मिरचीचे पाणी व्यवस्थापन
- मिरची लागवडीपासून सुरूवातीच्या वाढीसाठी नियमितपणे पाण्याची गरज असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
ढोबळी मिरची काढणी आणि उत्पादन
फळे हिरवेगार व संपूर्ण वाढलेली असल्यास मिरचीची काढणी करावी. सर्वसाधारणपणे दर आठ दिवसांनी मिरचीची काढणी करावी. अशा चार ते पाच काढण्यात सर्व पीक निघते. ढोबळी मिरचीचे हेक्टरी 17 ते 20 टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळते.
ढोबळी मिरचीचे पीक संरक्षण
- मररोग- रोपे सुरुवातीपासूनच कीड व रोगमुक्त असावीत. बी पेरताना बियांना थायरमची प्रक्रिया करावी. वाढलेली रोपे उपटून काढावीत व 0.6 टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण झाडांना ओतावे.
- चुरडा मुरडा रोग- विषाणूजन्य रोगांचा प्रसार रसशोषक कीटकांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच तापमानात वाढ झाल्यावर लाल ठिपक्यांच्या कोळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यासाठी पाण्यात विरघळणारे गंधक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
Published on: 19 November 2021, 09:04 IST