रताळे हे एक फळ म्हणुन भारतात अनेक प्रांतात खाल्ले जाते. रताळे बटाट्यासारखेच असते, रताळे हे उपवासात फराळ म्हणुन देखील खाल्ले जाते. रताळे हे औषधीगुणांनी भरपूर असल्याने ह्याचे सेवन आरोग्यासाठी लाभकारी ठरते.ह्यामुळे रताळे हे भारतीय आहारात एक महत्वाचे स्थान ठेवते, त्याचे एवढे फायदे बघितले तर त्याची शेती शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न कमवून देऊ शकते.
कमी खर्चात आणि कमी वेळेत रताळ्याचे पिक तयार होते आणि इतर फळांपेक्षा व भाजीपालापेक्षा रताळ्याचे दाम हे जास्त असतात. तसेच, ह्याची मागणी ही कायम बनलेली असते. म्हणुन रताळ्याची लागवड ही शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदा ठरू शकते. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणुन घेऊया रताळ्याच्या लागवडिविषयी.
रताळ्याविषयी अल्पशी माहिती
रताळ्याचे शास्त्रीय नाव हे Ipomoea batatas (ईपोमोइया बटाटाज) असे आहे. रताळ्याची पांढरी, लाल, जांभळी आणि तपकिरी साल देखील असते. रताळे जर नियमित खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट होते. रताळे ही त्वचा ग्लो करण्यासाठी उपयोगी ठरते. रताळे हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन बी-6 असते जे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सांगितले जाते. 100 ग्राम रताळ्यामध्ये जवळपास 90 ग्राम कॅलरिज असतात. रताळ्याच्या सेवणाने लठ्ठपणा नियंत्रित होतो,मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्यासाठी रताळ्याचे सेवन खुपच लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.
रताळ्याच्या लागवडीसाठी कोणती जमीन चांगली असते बरं
रताळ्याच्या लागवडीसाठी सुपीक जमीन निवडली पाहिजे मग त्यामध्ये लोममाती (वाळू, गाळ आणि थोड्या प्रमाणात चिकनमाती याचे मिळून बनलेली) ही रताळे लागवडीसाठी योग्य मानली जाते. रताळ्याच्या लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य 5.8 ते 6.7 दरम्यान असावे असं कृषी शास्त्रज्ञ सांगतात. रताळ्याची लागवड मैदानी आणि डोंगराळ भागात अशा दोन्ही ठिकाणी करता येऊ शकते.
रताळे लागवडीसाठी हवामान कसे असावे
रताळ्याच्या लागवडीसाठी 20 ते 28 अंश सेल्सिअस तापमान मानवते असं सांगितले जाते. शीतोष्ण आणि समशीतोष्ण असे दोन्ही प्रकारचे हवामान असलेल्या प्रदेशात रताळ्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. रताळ्याच्या लागवड 75 ते 150 सेंमी पर्यंतचा पाऊस पडणाऱ्या ठिकाणी करता येऊ शकते. रताळे लागवड आपण ज्या वावरात करणार आहात तिथे पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी कारण वावरात पाणी साचले तर रताळे सडू शकतात आणि परिणामी उत्पादनात घाटा येण्याची शक्यता असते. जर आपणांस रबी हंगामात रताळ्याची लागवड करायची असल्यास पाण्याची गरज भासते.
रताळ्याच्या काही सुधारित जाती
»श्री कनक: 110 दिवसात तयार होणाऱ्या ह्या जातीच्या पिकाचे उत्पादन सुमारे हेक्टरी 20 ते 25 टन असते. ह्या जातीच्या रताळ्याची साल दुधाळ रंगाची असते.
»गौरी: 120 दिवसांत तयार होणाऱ्या या जातीच्या रताळ्याच्या पिकाचे उत्पादन हेक्टरी सुमारे 25 टन पर्यंत असते. ह्या जातीच्या रताळ्याच्या सालीचा रंग हलका जांभळा असतो. ह्या जातीच्या रताळ्याची खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात लागवड करता येते.
»ST 13: रताळ्याच्या या जातीचा आतला भाग म्हणजे गेदू हा जांभळा काळा असा असतो. ह्या जातींचे रताळे कापल्यावर बीटरूटसारखे दिसते. यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स इतर जातीच्या रताळ्यापेक्षा जास्त असतात. ह्या जातींचे रताळे हे सुमारे 110 दिवसात परिपक्व होतात आणि जर उत्पादनचा विचार केला तर हेक्टरी 15 टन पर्यंत उत्पादन ही जातं देऊ शकते.
रताळ्याची लागवड नेमकी कधी करतात बरं
रब्बी हंगामात रताळ्याची लागवड ही ऑक्टोबर महिन्यात केली जाते. तसेच, उत्तर भारतात रब्बी, खरीप आणि उन्हाळी या तीनही हंगामात रताळ्याची लागवड करता येते. खरीप म्हणजेच पावसाळी हंगामात रताळ्याची लागवड जून ते ऑगस्ट दरम्यान करता येते. त्यावेळी रताळ्याच्या पिकाला फारशी पाण्याची गरज भासत नाही. फक्त पाऊस पडलाच नाही तेव्हा मात्र पिकाला पाणी द्यावे लागते. रब्बी हंगामात रताळ्याची लागवड करण्याचा विचार असेल तर ह्या हंगामात लागवड ही ऑक्टोबर ते जानेवारी पर्यंत केली जाऊ शकते, ह्या हंगामात लागवड केलेल्या रताळ्याला मात्र पाण्याची आवश्यकता असते.
वावर कसं तयार करावे
सर्व्यात आधी, वावर नांगराने नांगरुण घ्या. त्यानंतर, देशी नांगर किंवा कल्टीव्हेटरने माती भुसभूशीत करून घ्यावी. यानंतर कमीत कमी सहा महिने जुने शेणखत वावरात टाकावे. शेणखत वावरात प्रति हेक्टर 200 क्विंटल ह्या प्रमाणात टाकावे. त्यानंतर रोटाव्हेटर मारून घ्यावा.
रताळ्याच्या लागवडीआधी रोपवाटिका तयार करावी
रताळ्याची लागवड ही वेलींचे तुकडे लावून केली जाते. रताळ्याचे वेल आधी रोपवाटिकेत तयार केले जाते. शेतकरी मित्रानो लागवडीच्या दोन महिने आधी रोपवाटिका तयार करण्याची शिफारस केली जाते. जर आपणांस एक हेक्टर रताळ्याची लागवड करायची असेल तर 100 वर्गमिटर जागेवर रोपवाटिका तयार करावी. या रोपवाटिकेत कीडमुक्त व निरोगी कंद 60 x 60 सेमी अंतरावर लावावेत आणि गादा ते गादा 20 x 20 सेमी अंतर ठेवावे. एक हेक्टरच्या रोपवाटिकेसाठी 100 किलो कंद लागतात. कंद लागवडीच्या वेळी दीड किलो युरिया लावावा. जेव्हा गरज असेल तेव्हा वेळोवेळी पाणी दिले पाहिजे.
अशा प्रकारे पहिली नर्सरी दीड महिन्यात तयार होते. तयार केलेल्या वेली सुमारे 25 सेमीच्या कापल्या जातात. यानंतर, दुसऱ्या नर्सरीसाठी 500 चौरस मीटर जमीन आवश्यक असते. यामध्ये गादे ते गाद्यापर्यंतचे अंतर 60 सेमी आणि झाडांपासून झाडांचे अंतर 25 सेमी ठेवावे. रोपवाटिकेची लागवड केल्यानंतर 15 दिवस आणि 30 दिवसांनी 5 किलो युरिया फवारणे आवश्यक आहे आणि ओलावाची विशेष काळजी घ्यावी. अशाप्रकारे, जेव्हा दुसरी रोपवाटिका तयार होईल, तेव्हा वेलींच्या मध्यभागी 25 सें.मी. च्या वेली कापून मुख्य वावरात लागवड करावी.
वेली लावताना काळजी घ्या
रताळ्याच्या वेलीचा खालचा भाग कधीही लागवडीसाठी घेऊ नये. नेहमी वेलीचा मधला आणि वरचा भाग लागवडीसाठी घ्या. रोपवाटिकेतून वेली कापल्यानंतर, ते दोन दिवस सावलीत ठेवावे आणि बोरेक्स किंवा मोनोक्रोटोफॉस औषधाचे द्रावणात दहा मिनिटे बुडवावे. मग ते शेतात लावा.
Published on: 25 September 2021, 09:05 IST