साधारणपणे, आपल्या भारत देशातील बहुतेक शेतकरी पारंपारिक रबी आणि खरीप पिकांची लागवड करतात. परंतु काही शेतकरी शेतीमध्ये नाना प्रकारचे प्रयोग करतात आणि त्यांचे यश पाहून इतर शेतकरीही असे प्रयोग करण्यास उत्साहित होतात. आजच्या काळात, थोडा कल बदलला आहे आणि शेतकरी अधिकाधिक नगदी पिकांची लागवड करत आहेत. औषधी वनस्पतींपासून तर विविध प्रकारच्या गवतांची लागवड अलीकडे वाढत आहे आणि शेतकरी ह्या सर्व्यातून चांगली कमाई करताना दिसत आहेत.
भारतातील अनेक राज्यांमध्ये बळीराजा आता रोशा गवताची लागवड करताना दिसत आहे. रोशा गवताला रोजा गवत असेही म्हणतात. रोशा गवत एक सुगंधी औषधी वनस्पती आहे आणि तिचे तेल अत्तर, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी वापर केला जातो. एकदा ह्याचे रोप लावल्यानंतर पिकापासून उत्पादन हे 5 ते 6 वर्षे पर्यंत चालू राहते. रोशा गवताची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये केली जाते. रोशा गवत 5 ते 6 वर्षे उच्च उत्पन्न देते, यानंतर मात्र त्यापासून निघणाऱ्या तेलाचे उत्पादन कमी होऊ लागते.
खडकाळ जमिनीत पण केली जाते रोशा गवताची लागवड
रोशा गवतात 10 डिग्री ते 45 डिग्री सेल्सियस पर्यंतचे तापमान सहन करण्याची क्षमता असते. रोशा गवत सरासरी 150 ते 200 सेमी उंच वाढतो. रोशा गवताचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते ठराविक कालावधीसाठी दुष्काळ सहन करू शकतो. याचा अर्थ असा की, अर्ध-शुष्क प्रदेशात, पावसावर आधारित पीक म्हणून रोशा गवताची लागवड करता येते. म्हणजेच हे पिक पडीत जमिनीत देखील घेता येऊ शकते ज्या ठिकाणी पाण्याची अजिबात सोय नाही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत त्या प्रदेशासाठी ह्या गवताची लागवड खूपच किफायतेशीर ठरू शकते.
रोशा गवताचे पिक खडकाळ जमिनीतही घेतले जाऊ शकते कारण त्याच्या मुळाची लांबी जास्त नसते. तरीही, शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्ही अशा जमिनीत लागवड केली तर गवतापासून मिळणाऱ्या तेलाचे प्रमाण आपल्या दुसऱ्या जमिनीपेक्षा नक्कीच कमी असू शकते.
रोशा गवताच्या लागवडीसाठी, जमिनीचा पीएच स्तर 7.5 ते 9 पीएच मूल्यापर्यंत असला तरीही, याचे पीक चांगले येऊ शकते. रोशा गवताच्या लागवडीसाठी जमिनीला कोणत्याही विशेष तयारीची म्हणजेच विशेष पूर्वमशागतीची आवश्यकता नसते, परंतु रोप लावण्यापूर्वी शेत चांगले तयार करणे आवश्यक आहे. यासाठी शेतजमीन कमीतकमी दोनदा नांगराने नांगरली पाहिजे जेणेकरून ती भुसभूशीत होईल.
बाळगा ह्या गोष्टींची सावधानता
»रोशा गवताचे रोप लावले जाते आणि रोप हे रोपवाटिकेत तयार करावे लागते. रोशा गवताच्या बिया ह्या रेतीसोबत मिक्स करून घ्याव्या आणि 10 ते 15 सेमी अंतरावर लावणे योग्य असते.लावलेल्या बि्यांना सतत पाणी घालत राहावे म्हणजेच नेहमी तिथे ओलावा असेल.
»
लागवडीसाठी बियाणे, 1 हेक्टरसाठी 5 ते 6 किलो बियाणे आवश्यक आहे. रोपवाटिकेत बियाणे लावण्याचा सर्वोत्तम वेळ जूनचा आहे. रोपे 4 ते 5 आठवड्यांनंतर पुनर्लावणीसाठी तयार होतात.
»साधारणपणे, रोशा गवताची लागवड 45/30 सेंटीमीटर अंतरावर केली जाते आणि कापणीनंतर लगेच पाणी दिल्याने पीक लवकर वाढते.
»रोशा गवताची लागवड करण्यापूर्वी, शेतात सर्व प्रकारच्या पाला पाचोळा आणि मागील पिकांचे धस, मुळे वेचून घ्यावीत. शेवटच्या नांगरणीच्या वेळी NPK म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हेक्टरी 50, 60 आणि 40 किलो या प्रमाणात लावावे. तसेच 25 टन प्रति हेक्टर जुन शेणखत जमिनीत टाकावे.
Published on: 10 September 2021, 10:36 IST