Agripedia

आधुनिक जग झपाट्याने बदलत चालले असताना शेतीमध्येही बदल अपेक्षित आहे आणि तो होत असल्याचे आपल्यालाही दिसत आहे.

Updated on 31 March, 2022 11:32 AM IST

सध्याच्या घडीला आपण ज्या भाजीपाल्यांचे सेवन करत आहोत. त्यामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळ भाज्या आहेत आणि त्यामधून आपल्याला जीवनसत्त्वे, विविध खनिजे, कर्बोदके मिळतात.जी आपल्याला निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे असतात. अशीच एक रोजच्या आहारातील सर्वांची आवडती भाजी म्हणजे भेंडी. ह्याच आवडत्या भेंडी ने आपला रंग बदललेला आहे.

 हिरवी भेंडी तुम्हाला लाल रंगाची भेंडी म्हणून जर बाजारात मिळाली तर तुम्ही आश्चर्यचकित होणार पण ही गोष्ट खरी आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात कांद्याचे सलग पाच दिवस बंद राहणार लिलाव, काय असेल यामागील कारण

भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था, वाराणसी (उत्तर प्रदेश ) च्या माध्यमातून नवीन वाणाचे  संशोधन केले आहे. ज्यामध्ये भेंडीच्या फळाचा रंग लाल आहे. त्यामागे कारण हे की तुम्ही जी भेंडी खाता त्या भेंडी मधून जर तुम्हाला जास्तीचे पोषक घटक मिळाले तर तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. या लाल भेंडी मध्ये अँथोसायानीन नावाचे अँटीऑक्सीडंट खाण्यास मिळते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

 या नवीन भेंडीची जर शेतकऱ्याने लागवड केली तर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो. तसेच शेतकरी या वाणाची परदेशी निर्यात सुद्धा करू शकतो. तर चला या नवीन वाणाच्या लागवडी संदर्भात माहिती घेऊयात…

नक्की वाचा:ज्याची शेतकऱ्यांना भीती होती तेच झाले, आता लाखाचे होणार बारा हजार; केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांना धक्का

1) जमीन हवामान :

 उष्ण व समशीतोष्ण वातावरण पोषक, पोयट्याची जमीन उत्तम

2) वाण :- काशी -  लालिमा

3) संशोधन केलेली संस्था :

भारतीय भाजीपाला अनुसंधान संस्था,वाराणसी (उत्तर प्रदेश)

4) संशोधन पूर्ण झालेले वर्ष :- 5 फेब्रुवारी 2019

5) फळातील अँथोसायनिन चे प्रमाण :- 3-3.6 मिली ग्रॅम / 100 ग्रॅम वजन ( हिरव्या भेंडी फळांमध्ये खूप कमी असते )

6) फळातील मिनरल/ खनिज द्रव्य उपलब्धता प्रमाण:

 लोह: 51.3 पी. पी. एम,झिंक :- 49.7 पी. पी. एम,

 कॅल्शियम :- 476.5 पी. पी. एम

7) लागवड :

 खरीप- जुलैचा पहिला आठवडा ( 15 जून ते 15 जुलै )

 उन्हाळी - जानेवारी चा तिसरा आठवडा ( 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी)

8) बियाणे प्रमाण :- 12-15 किलो / हेक्टर

9) बीज प्रक्रिया :- पेरणीपूर्वी 1-2 ग्रॅम कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम थायरम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा + 25 ग्रॅम अझोस्पिरिलम ब्रासिलेन्सी किंवा ॲप्सरजीलम अवमोरी प्रतिकिलो बियाण्यास चोळावे.

10) लागवड अंतर :- 30 × 15 सें.मी.

11) खतमात्रा :- शेणखत 20 टन प्रति हेक्टर पूर्वमशागत करताना रासायनिक खताची मात्रा 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, व 50 किलो पालाश प्रति हेक्‍टर द्यावी.

12) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :-

1) सेंद्रिय खते :- 20 टन शेणखत प्रति हेक्‍टर

2 जिवाणू खते :- अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळणारे जिवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.

3) खते देण्याची वेळ :-1) सेंद्रिय खते पेरणीपूर्वी: 15 दिवस अगोदर द्यावे.

4) रासायनिक खते :-10:50:50 नत्र: स्फुरद: पालाश किलो प्रति हेक्टर. अर्ध नत्र: संपूर्ण स्फुरद: पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 50 किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये विभागून 30, 45 व 60 दिवसांनी द्यावे.

5) जिवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

6) माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीत फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी 20 किलो प्रति हेक्टर + बोरॅक्स 5 किलो प्रति हेक्‍टर पेरणीच्या वेळी जमिनीतून किंवा फेरस सल्फेट + झिंक सल्फेट 0.5 टक्के बोरिक ऍसिड 0.2 टक्के पेरणी नंतर 30 ते 45 दिवसांनी फवारावे.

13) संजीवकांचा वापर :

1) जिब्रेलिक एसिड 10 पी.पी.एम. फवारल्यास हिरव्यागार व लुसलुशीत भेंडी मिळतात.

2) फळ तोडणीच्या एक दिवस अगोदर एन. ए. ए. 20 पी. पी. एम. व अल्ट्राझाईम 100 पी.पी.एम. फवारल्यास दूरच्या बाजारपेठेत पाठवितांना भेंडी लुसलुशीत राहते.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो खिशातले पैसे नका खर्च करू, आता शेतीसाठी उपकरणे खरेदी करायला सरकार देतंय अनुदान

14) आंतर मशागत :

 दोन ते तीन वेळा खुरपणी करून झाडांना भर द्यावी. मजुरांची टंचाई असल्यास बासालिंन तणनाशक 2-2.5 लिटर 500 लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे. तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. तणनाशकाचा फवारणीनंतर सात दिवसांनी पेरणी करावी. फळे येण्याच्या वेळेस रोपांना भर द्यावी. सरीमध्ये गवताचे किंवा भाताच्या पेंढ्या यांचे किंवा पालापाचोळ्याचे किंवा रंगीत प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे जमिनीतील ओलावा जास्त दिवस टिकून राहतो व तणाचा  त्रास कमी होतो.

15) पाणी व्यवस्थापन :- खरीप हंगामामध्ये लागवड असल्याकारणाने पाण्याची गरज भासत नाही. जर पुसणे टोन दिलाच तर दोन पाण्याच्या पाळ्या बसायला हव्यात.

16) काढणी :- पेरणीनंतर 30 ते 45 दिवसांनी फुले येतात. व त्यानंतर 5 ते 6 दिवसांनी फळे तोडणे योग्य होतात.कोवळ्या फळांची तोडा काढणी सुरू झाल्यास दोन ते तीन दिवसाच्या अंतराने करावी. तोडणीसाठी म. फु. कृ. विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या भेंडी हार्वेस्टचा वापर करावा. निर्यातीसाठी 5 ते 7 सेमी लांब कोवळी एक सारखी फळांची तोडणी करावी. काढणी सकाळी लवकर करावी. काढणीनंतर 0 ऊर्जा शीत कक्षामध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे.

17) उत्पन्न :- 15 ते 20 टन प्रति हेक्‍टर.

 लेखक

 प्रदीप बाळासो भापकर

 एम एसी ( उद्यान विद्या)

 वरिष्ठ संशोधन छात्र   

 कृषी विज्ञान केंद्र बारामती

English Summary: cultivation of red okra is so important this method is profitable for farmer
Published on: 31 March 2022, 11:32 IST